आता स्वतःसाठी हसायचं, इतरांसाठी पुष्कळ रडून झालं!!
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
साजिरी एकटीच नदीकाठी बसली होती. विचार करत होती, आपण काय मिळवलं इतकं सर्व करून? लहानपणी बाबा गेल्यावर मोठी म्हणून घरची सर्व जबाबदारी आली. खेळायच्या बागडायाच्या वयात पोक्त होऊन गेले. लहान असून मोठी म्हणून राहिले. सर्वांचं मन जपलं. पण वाट्याला काय आलं? “हे तुझ कर्तव्यच आहे. तू नाहीतर कोण करणार?” हे बोलणं. आई लहान असताना घरात एकट सोडून जायची तेव्हा मलाही रडू यायचं तिच्या आठवणीने. मीही हट्ट करायचे, की मला सोडून जाऊ नको. आईसाठी इतकी रडले पण “तू रडलीस तर ती दोघं पण हट्ट करणार, त्यांना सांभाळायला पाहिजे” हेच नेहमी ऐकायला मिळाल.
कसं बसं शिक्षण करून काम करत होते, घर चालवत होते. यात माझी आवड होती का मी करणं भाग होत हे द्वंद मनात नेहमी चालूच होत. अखेरीस त्याच उत्तर भाग आहे असच आलं. मला हे सर्व करण भागच होत. माझ्याशिवाय होत तरी कोण माझ्या माणसांना. पण तो मायेचा, आपुलकीचा हात डोक्यावर कधी फिरला नाही. माझ्या डोळ्यात त्यांच्यासाठी असलेलं ते पाणी, त्यांच्या डोळ्यात कधी आला का नाही ठाऊक नाही. कदाचित माझ्या बाबतीत आईला कठोर होण्यामागे काहीतरी कारण असतील. तिला मला कमकुवत बनवू द्यायचं नव्हत. तिचा तिचा वेगळा असा संघर्ष असणार. पण या सगळ्यात माझ्या वाट्याला कोरडेपणा आला.
पण हा कोरडेपणा जयच्या येण्याने कमी झाला. आमची कामाच्या ठिकाणीच ओळख झाली. खूप बोलका होता तो. गप्पा मारायला त्याला खूप आवडायचं. आमची चांगली ओळख झाली तेव्हा त्याला माझी परिस्थिती पण माहीत झाली. मला नेहमी म्हणायचा, “इतक्या लहान वयात तू हे सर्व सांभाळते, मला फार कौतुक वाटत तुझ.” एक दोनदा घरी पण येऊन गेला होता. आपल्या कामाची कोणीतरी दखल घेत, आपली चौकशी करत माझ्यासाठी याच गोष्टी खूप मोठ्या होत्या. आमची मैत्री चांगली फुलत होती. आज माझा वाढदिवस होता. तस एरवी या दिवसाने माझ्या आयुष्यात काही मोठा फरक पडत नसे.
रोजच्या दिवसांसारखा हा एक दिवस अस मी म्हणायचे. पण जय ने आग्रह करून हॉटेल मध्ये बोलवलं होत. मला म्हणाला होता आजचा दिवस खूप खास आहे. मी तयार होऊन गेले. अनेक अनपेक्षित घटना आज घडत होत्या. माझा वाढदिवस, हे सेलिब्रेशन आणि सर्वात खास गोष्ट. जय ने मला प्रपोज केलं होत. त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्याला माझ्यासोबत त्याच आयुष्य घालवायचं होत. लहानपणापासून स्वतःच्या माणसांच्या प्रेमासाठी आसुसलेली मी; त्याच्या या बोलण्याने जणू माझ्या आयुष्यात नवीन फुल उमलून आली. इतके दिवस आमच्या मध्ये जे एक नात होत त्यात अजून वाढ झाली. मी खूप खूष होते. आपल्यावर पण प्रेम करणार कोणतरी आहे, आपलं हसण, रडणं याने कोणालातरी फरक पडणार आहे, अशी व्यक्ती आपल्याकडे आहे ही भावना खूप सुखावह होती. एकंदरीत माझं आयुष्य आता चांगल चाललं होत. आता लवकरात लवकर लग्न करून स्थिर व्हायचं होत. जयपण तयार होता.
पण या सुंदर स्वप्नाचा पण शेवट वाईटच झाला. दोन दिवस झाले तरी जय ऑफिसला आला नाही. त्याचा फोन लागत नव्हता. मला काही समजेना म्हणून घरी जायचं ठरवलं. माझं जाणच कदाचित चुकीचं झालं. कारण जी बातमी समजली ती ऐकुन नेमकं कोणावर, कोणासाठी रडाव हे समजेना. जयच लग्न झालं होत. ज्याच्यासोबत अख्ख आयुष्य काढायची सुंदर स्वप्न मी पाहिली होती ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून अचानक काही न सांगता निघून गेली. मी तशीच घरी आले. कोणत्याच प्रश्नांचं उत्तर मला मिळली नव्हती. अस काय झालं होत की जयला मला साधं सांगावस पण वाटलं नाही. असा काय प्रॉब्लेम होता जो आम्ही सोडवू शकत नव्हतो? असा काय नाईलाज होता म्हणून त्याने माझा फोन ही उचलला नाही? मला काहीही समजत नव्हते. नंतर ही मी त्याला फोन करून पाहिले पण मला काहीच उत्तर मिळाले नाही. दिवसरात्र मी रडून काढले. आई सुरुवातीला जरा चिडली, मला समजावलं पण ती नंतर परत नॉर्मल झाली. माझ्या आयुष्यात झालेली ही उलथापालथ त्यांच्या पर्यंत पोहोचली होती का नाही हाच प्रश्न.
अनेक दिवस घरात रडून काढल्यानंतर, कसतरी कृत्रिम पण काम करत दिवस रेटून आज नदीकाठी येऊन बसले होते. खूप विचार केला. इतके दिवस जो माझ्या सुख दुःखाचा रिमोट कंट्रोल मी दुसऱ्या कोणाला दिला होता, त्याच्यासाठी जी मी इतकी रडली होते त्याने काय झालं? मला फक्त त्रास मिळाला. म्हणून आता हे खूप झालं. मी ठरवलं, इतके दिवस मी जे इतरांसाठी रडले ते बंद करायचं. यापुढे स्वतःसाठी जगायचं आणि स्वतःसाठी हसायचं.
शेवटी हे माझं आयुष्य आहे. हे मलाच जगावं लागणार. आणि ते जगण्यासाठी मी दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही. तो आनंद मलाच मिळवायला पाहिजे. मलाच तयार करता आला पाहिजे. माझा आयुष्याचं सुंदर चित्र हे मलाच रेखाटलं पाहिजे. त्यात रंग मीच भरू शकते. तो कंट्रोल फक्त माझ्याकडेच आहे. आणि तो चालवायचा कसा हे मी पण मीच ठरवणार. मी हसणार, हसण्याचे नवनवीन क्षण मी आता तयार करणार, शोधून काढणार.
संध्याकाळ झाली होती. बाहेर अंधार झाला असला तरी साजिरीच्या चेहेऱ्यावर मात्र एक तेज आले होते जे कधी मावळणार नव्हते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

मस्त आहे..छान वाटला