Skip to content

आपल्यातल्या खऱ्या चुका जर आपल्याला जाणवत नसतील तर याचा खरा अर्थ काय?

आपल्यातल्या खऱ्या चुका जर आपल्याला जाणवत नसतील तर याचा खरा अर्थ काय?


रोहिणी राधाकिसन


आपल्या प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं आहे. आपण अंगकाठीने वेगळे आहोत, आपले गूण वेगळे आहेत, आपले स्वभाव वेगळे आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या सवयी देखील वेगळ्या आहेत. आणि याच वेगळेपणामुळे खूपदा आपले मतभेद देखील होतात,तक्रारी होतात , वाद होतात आणि या सगळ्यांमद्धे आपला प्रयत्न हा फक्त आपण स्वतः कितपत योग्य आहोत हे सिद्ध करणे हाच असतो हो ना!

आशा आणि मोहन यांच्या सोबतही असचं काही तरी होत होतं, आशाला वाटायचं की ती बरोबर आहे आणि मोहन ला वाटायचं की तो त्याच्या जागी बरोबर आहे. मग नेमकं कुठे आणि कुणाचं चुकत होत ते त्या दोघांना ही कळत नव्हतं. मोहनच्या मते लग्नाआधी जशी त्याची लाईफ होती ती तो तशीच एन्जॉय करणार , लग्नाचा अर्थ असा नाही की मी माझे मित्र सोडेन किंवा माझी स्वतंत्रता नष्ट झाली.

आणि आशाच म्हणणं होत की आता आमचं लग्न झालं आहे. मोहन ची काही जिम्मेदारी आहे माझ्याकडे, मला वेळ देणं त्याचं कर्तव्य आहे. त्याने आता त्याचं बाहेर फिरणं कमी केल पाहिजे. मित्र, पार्ट्या कमी करून घराकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मला सांगा या दोघांच म्हणणं ऐकल्या नंतर तुम्हाला दोघांचेही म्हणणे पटेल आणि पटण्यासारखेच आहे. कारण दोघेही त्यांच्या जागी बरोबर आहेत. पण समस्या सुरू होते ती मी माझ्या जागी बरोबर आहे म्हणण्या पासून, दोघेही फक्त स्वतःचा विचार करत आहेत, स्वतःच्या जागी राहून. आणि इथूनच मतभेद सुरू होतात. अश्या परिस्थितीमध्ये आपल्याला गरज असते ती तिसऱ्या अपक्षपाती व्यक्तीची जो दोघांचीही मते एकूण, दोघांनाही समुपदेशन करेल.

या दोघांनी जर स्वतःचा वाद सोडून दुसऱ्याच म्हणणं एकदा एकूनही घेतलं असत तरी, त्यांना एकमेकांच्या भावनांची जाणीव झाली असती. बऱ्याचदा आपण दुसऱ्यांच्या चुकांना गिरवण्यात एवढे व्यस्त करतो स्वतःला की स्वतः आपण चुकतोय , खरंच चूक आपली आहे ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि जरी एखाद्याने ती आपल्या नजरेत आणून दिली तरी आपण ती मान्य करत नाही.

अनेकदा आपण अश्या व्यक्ति ही बघतो ज्यांना त्यांच्या चुकांची जाणीव असूनही ते मान्य करत नाहीत. पण यामध्ये ते स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत, हे ही त्यांच्या लक्षात येत नाही. आपल्याला अश्या लोकांच्या आसपास राहणे ही आवडत नाही जे नेहमी चुकतात, माझी चुक नाही म्हणत आपल्या चुकेच खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडून रिकामे होतात.

कालांतराने अश्या व्यक्ति एकट्या पडतात , आणि तेव्हा त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होऊ लागते पण तो पर्यंत लोकांचा आपल्यावरचा विश्वास आपण गमावलेला असतो. आणि विश्वास एक अशी गोष्ट आहे जी कमवण्यासाठी आयुष्य खर्ची होतं. आपण चुकलो! हीच गोष्ट सिद्ध करते की आपण एक मनुष्य आहोत. आपणच चुकणार आणि चुकांमधूनच शिकणार ,पण केलेली चूक सुधारणं त्याहूनही ती मान्य करणं जास्त महत्वाच आहे. नाहीतर आपण या आयुष्य रूपी भवसागरात एकटे पडू. तेव्हा आपल्याला समजेल की एक चूक आपल्या चुका न स्विकारण्याची आपल्या आयुष्याला चुकीच्या दिशेला घेऊन जाऊ शकते.

आपण जेव्हा चुकतो तेव्हा आपण आपल्या चुकेवर पांघरून घालण्यासाठी खोटं बोलतो. त्या खोट्याला लपवण्यासाठी आणखी एक खोटं बोलवं लागत. आणि एकदा का आपण खोटं बोलण्याच्या स्वाधीन झालो की मग आपण खोटं बोलत आहोत हे माहीत असूनही आपलंच बोललेल खोटं आपल्यालाच खरं वाटायला लागत. आणि तेच खोटं अगदी आपण स्वाभिमानाने बोलतो. खोटं बोलून ,चुकांना नजर अंदाज करून आपण जरी दुसऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला तरी आपण स्वतःच्या मनाला फसवू नाही शकत आणि ती गोष्ट सतत आपल्या मनात सलत राहते. आपलं मन आपल्याला खात राहतं. आणि आपण स्वतःच्याही नजरेतून उतरायला लागतो.

आपल्यातल्या खऱ्या चुका आपल्याला जाणवत नाहीत कारण आपण त्यांना जाणून बुजून इगनोर करत असतो. आपला अहंकार एवढा आहे की मी चुकलो / चुकले यासाठी माफी मागणं या गोष्टी आपल्याला सहनच नाही होत बरोबर ना? पण जर आपण आपली चूक मान्य केली, माफी मागितली तर यातून आपला कमीपणा नाही तर कृतज्ञता दिसते. आपला अपमान नाही तर आपला नम्र स्वभाव आणि आपल्याकडे असलेले संस्कार दिसतात.

फक्त कोणाची नजर आपल्यावर आहे म्हणून आपण खरं वागणं योग्य नाही. काही गोष्टी आपण स्वतः साठी करण गरजेच आहे. आपल्यातल्या खऱ्या चुका जर आपल्याला जाणवत नसतील तर आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज आहे. स्वतःच चारित्र्य पारखून पाहण्याची गरज आहे.

आपल्याला कोणीही पकडणार नाही, याची खात्री असतानाही आपण कसे वागतो , हाच कोणत्याही व्यक्तीचं खरं चारित्र्य जाणून घेण्याचा निकष असतो. – थॉमस मेकॉले


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपल्यातल्या खऱ्या चुका जर आपल्याला जाणवत नसतील तर याचा खरा अर्थ काय?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!