Skip to content

आपल्यांना जाऊ देणं खूप कठीण असतं, आणि आपण खूप वेळ रोखूनही ठेऊ शकत नाही.

आपल्यांना जाऊ देणं खूप कठीण असतं, आणि आपण खूप वेळ रोखूनही ठेऊ शकत नाही.


मेराज बागवान


मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे.म्हणजेच तो एकटा राहू शकत नाही.वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात कुठे ना कुठे प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते. आपली संस्कृती तर कुटुंब व्यवस्थेवरच आधारलेली आहे.जिथे अनेक नाती निर्माण होतात.आई-वडील,बहीण-भाऊ,पती-पत्नी अशी अनेक नाती असतात. तसेच काही बिन रक्ताची नाती असतात, जसे की ,मित्र-मैत्रिणी, शिक्षक-गुरू,कार्यालयीन कर्मचारी इत्यादी.तर असे हे आपले जीवन अनेक नात्यांनी, नातेसंबंध यांनी भरलेले असते. पण जरी असे असले तरी देखील, एक वास्तव कायम प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे आणि ते म्हणजे ,’कोणीच आपल्या आयुष्यात कायम नसते’.

कधी आयुष्यात काही नाती आपोआप निर्माण होतात.कोणतेतरी निम्मित होते आणि ती माणसे आपल्या आयुष्यात येतात.आणि कधी आपलीशी वाटतात हे लक्षात देखील येत नाही.एक प्रकारचे ऋणानुबंध तयार होऊ लागतात.एक प्रकारची ओढ, भावनिकता त्यांच्या प्रति आपल्या मनात तयार होते.आणि मग हळूहळू ती ‘आपली’ होतात.असे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत कधी ना कधी घडते.ही ‘आपली’ वाटणारी माणसे कधी तुमचे मित्र-मैत्रीण बनतात, तर कधी ‘प्रेयसी-प्रियकर’ तर कधी ‘गुरू-मार्गदर्शक’ देखील.

तुम्हाला त्या व्यक्तींबद्दल प्रेम, काळजी वाटत असते. कधी त्यांनाही तुमच्याप्रति त्याच भावना असतात. नाते रुजत जाते.सहवास वाढतो, विश्वास निर्माण होऊ लागतो आणि ही माणसे तुमच्या मनात घर करू लागतात, तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात.कधी तुम्ही त्यांच्या गरजेला उपयोगी पडतात, तर कधी ते तुम्हाला खूप मदत करतात. कधी तुम्ही एकमेकांना आयुष्याची योग्य दिशा दाखवून मार्गदर्शन करतात आणि मग आयुष्ये योग्य मार्गाला लागतात.ही माणसे तुमच्या मनात खूप आदराचे स्थान मिळवून जातात.तसेच त्यांच्या आयुष्यात देखील तुमचे नकळत काही ना काही स्थान निर्माण होत राहते. आणि मग नाती फुलू लागतात.

पण ही झाली आयुष्याची एक बाजू. कधी अचानक काही तरी घडते.काही तरी संकेत मिळतात आणि ही माणसे तुमच्यापासून दूर जाऊ लागतात.कधी मृत्यू, तर कधी काळाची गरज, कधी नियती तर कधी विधात्याची मर्जी यामुळे ही माणसे तुमच्यापासून कायमची दूर होतात.तुमच्याशी ते संपर्क तोडतात.तुमचा आणि त्यांचा सहवास संपतो.मग तुम्ही दुःखी होऊ लागतात.रडू कोसळते.त्यांच्याशिवाय तुमचे जगणे मुश्किल होते.तुम्हाला ते दूर गेल्यानंतर देखील त्यांचीच ओढ लागून राहते.ती व्यक्ती आज येईल, उद्या येईल ह्या आशेवर तुम्ही जगत राहतात आणि मनामध्ये सतत त्यांचेच विचार करू लागतात.तुमच्यासाठी आपल्यांना जाऊ देणं अगदी कठीण होऊन बसतं.

मात्र आपण खूप वेळ त्यांना रोखुनही ठेवू शकत नाही.कारण प्रत्येकाचे आपले असे आयुष्य असते. काही तरी निमित्त होऊन आपली त्या माणसाशी गाठ-भेट होते.पण काही कारणास्तव हा प्रवास काही काळापूरताच मर्यादित असतो आणि आपण हेच सत्य स्वीकारायला घाबरतो.प्रत्येक माणूस स्वतंत्र असतो. प्रत्येकाला आपले विचार, स्वतःची मते असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.कोणी कोणावर जबरदस्ती करू शकत नाही.म्हणूनच आपण देखील कोणालाच रोखून ठेवू शकत नाही.

काही वेळेस काही कालांतरानंतर माणसे आपल्यापासून दुरावतात.त्याला कारण असते की ,आपल्या जशा त्या व्यक्तीच्या प्रति भावना आहेत तशाच त्या व्यक्तीच्या आपल्याप्रति नसतात. आपण कधी त्यांच्याकडे व्यक्त होतो तर कधी ते देखील व्यक्त होतात.त्यांना कदाचित तुम्हाला सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात. आणि ‘माझ्या मनात तुझ्याविषयी त्या भावना नाहीत ज्या तुला माझ्याविषयी आहेत’ हे ते स्पष्टपणे बोलूनही दाखवीत नाहीत.का ,तर कदाचित तो त्यांचा स्वभाव नसतो, ते स्वकेंद्रित असू शकतात किंवा त्यांना तुम्हाला दुखवायचे नसते. म्हणून मग ते काही न बोलता हळूहळू तुमच्या आयुष्यातुन जात असतात. तुम्ही मात्र अनेकदा विचार करीत बसतात की , त्याने/तिने मला हे का सांगितले नाही.मला उत्तर का दिले नाही, किंवा आता ती/तो माझ्याशी का बोलत नाही.

पण ‘नकार’ प्रत्येकवेळी शब्दात व्यक्त होत नाही.तो व्यक्त होतो कृतीतून, वागणुकीतून आणि अनेकदा मुकसंवादातून.आणि नेमके हेच आपल्या लक्षात येत नाही.आपण समजत राहतो, जसे आपण आहोत तशीच समोरची व्यक्ती आहे. पण वास्तविकता तसे नसते. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा मार्ग निवडलेला असतो.तर कधी परिस्थिती अशी येते की ,कायमचे दूर जाणे हाच उपाय एकमेव राहतो.

हे अशा प्रकारचे नातेसंबंध खासकरून प्रेम-संबंध ,एकतर्फी प्रेम यामध्ये अनुभवयास मिळतात.आणि आजकाल वैवाहिक जीवनात देखील पहावयास मिळतात. घटस्फोट, विभक्त होणे ही काही त्यांची नावे.कारण काहीही असो, व्यक्ती दुरावतात.आज सर्वात जवळचे वाटणारे नाते कायमचे दूर जाते.माणूस भावनांनी बनलेला आहे.त्यामुळे त्याला दुसऱ्या माणसाविषयी प्रेम,आपुलकी ,काळजी वाटणे साहजिक आहे.आणि त्यामुळेच जवळची व्यक्ती जाऊ देणं खूप अवघड वाटत असते. पण ‘अट्याच’ होत असताना ‘डीटयाच’ देखील होता आले पाहिजे.

नियती, नशीब ,विधाता आपल्या आयुष्यात अनेक व्यक्तींना आणतो ,त्यांना आपलेसे बनवतो.पण एक क्षण येतो तेव्हा हेच नशीब, हीच नियती आणि हाच विधाता त्या व्यक्तींना आपल्यापासून दूर करतो.ह्यात वेगळे असे काही नाही.हा तर निसर्गाचा नियम आहे. आणि मग निसर्गाचा नियम का मोडायचा.आणि मोडलाच तर त्यातून काहीच साध्य होऊ शकत नाही.कारण जिथे विधात्याची, त्या अदृश्य शक्तीची मर्जी नसेल तिथे कोणतेच यश मिळणार नाही. आणि अति तिथे माती.मग आपण का हे समजून घेऊ शकत नाही?

भावना माणसाला गुंतवून ठेवतात.त्यामुळे आपली वाटणारी व्यक्ती जेव्हा दूर होते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, एक प्रकारची भीती कायम वाटत राहते.मन सुन्न होते.हे देखील नैसर्गिक आहे.पण जशा भावना माणसाला माणसामध्ये गुंतवून ठेवतात, तशाच प्रकारे त्याच भावना माणसाला जीवनाची योग्य दिशा देखील दाखवत असतात.जे तुमचे नसते ते कधीच नसते आणि जे तुमचे असते ते तूमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, मग काहीही झाले तरी.त्यामुळे कोणाला तुम्ही जबरदस्ती तुमच्या आयुष्यात रोखून ठेवू शकत नाही.वेळ खूप अनमोल आहे, तो कोणासाचीच थांबत नाही,तसेच प्रत्येक गोष्टी साठी देखील एक वेळच यावी लागते.

मग आपण काय करू शकतो? तर सोपे आहे. आपण वर्तमानात जगू शकतो.कोण ,का आपल्याला सोडून गेले याचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.आणि आपण खरेच त्या व्यक्तीवर प्रेम करत असू तर नेहमी त्याच्या आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करू शकतो.यातच आपले आणि त्या व्यक्तीचे हीत असते.

आज अनेक तरुण-तरुणी प्रेम-भंग झाल्यामुळे, घटस्फोट झाल्यामुळे नैराश्यात गेलेले दिसतात.ते सतत भूतकाळात रमून बसतात आणि वर्तमान हरवून बसतात.त्या तरुणाईला ह्या लेखाच्या निमित्ताने इतकेच सांगायचे आहे की ,’कोणामुळे कोणाचे आयुष्य थांबत नाही.तुमच्या भावना ,प्रेम वाईट नाही,पण ते तुम्ही पूर्णच होईल ही अपेक्षा कदापि ठेवू नका.कारण विधात्याने प्रत्येकासाठी कोणी ना कोणी बनवले आहे. आणि योग्य वेळ आली की तो त्यांची तुमच्याशी गाठ घालून देणारच आहे.त्यामुळे तुम्ही कधीच कोणी तरी मला सोडून गेले याचे वाईट वाटून घेऊ नका.स्वतःच्या भावना मनात जागृत ठेवा, त्या अनमोल आहेत ,पण त्या भावना कायम तिथेच ठेवून पुढे वाटचाल करीत राहा.कारण पुढे जात राहणे हेच जीवन आहे’.

प्रत्येक व्यक्ती बरोबरचा आपला प्रवास आधीच ठरला गेलेला असतो. आणि जिथे ‘प्रवास’ असतो तिथे ‘थांबा’ देखील कायम असतोच असतो.त्यामुळे वेळेला आव्हान देण्याऐवजी वास्तव स्वीकारणे हेच आरोग्यदायी मानसिकतेचे लक्षण आहे. त्यामुळे वेळेचा आदर करा, जी वेळेची गरज आहे तेच करा.आयुष्यात बदल केवळ कायम असतो बाकी काहीच नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!