आपल्यामुळे कोण दुखावलंय का.. हा प्रश्न अपवादानेच पडतो आता.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“रिया हल्ली साक्षी येत नाही घरी? काही भांडण वैगरे झालय का तुमच्यामध्ये?” नेहाने तिच्या मुलीला, रियाला नाश्ता करायला बसलेले असताना विचारलं. “ए आई असं काही नाही ग, अस का विचारतेस तू?” रिया जरासा त्रागा करतच बोलली. “अग सहज विचारलं ती अलीकडे आली नाही ना घरी, आधी वरचेवर यायची नाहीतर फोन तरी करायची. तु देखील काही बोलत नाहीस.” रियाला या विषयावर काहीच बोलायचे नव्हते. तिने पटपट नाश्ता केला व ती कॉलेजला जायला निघाली. नेहाला समजल की यांचं काहीतरी झालेलं आहे. कारण रिया अस कधीच करत नव्हती.
रिया आणि साक्षी आधीपासूनच खूप घट्ट मैत्रिणी होत्या. त्यांचं चांगल जमायचं. आणि मुल चांगली मित्र असली की घरच्यांची पण एकमेकांशी ओळख असतेच. येणं जाण असत. या दोघी एकमेकांच्या घरी जायच्या. फोनवर बोलायच्या, कुठे बाहेर जायचं असल तरी ठरवून जाणार. आई बाबा पण त्या दोघी सोबत असतील तर त्यांना बाहेर पाठवायचे. इतका त्यांचा विश्वास होता. पण अलीकडे अस झालं की त्या दोघांचं काही बोलण होताना दिसत नव्हत. तोंडातून साधं नाव पण येत नव्हत. येणं जाण तर दूरच. घरातली त्यांच्या कामात म्हणून आधी काही लक्ष गेलं नाही पण नंतर त्यांना पण जाणवू लागलं.
आज जेव्हा रियाला नेहाने विचारलं तेव्हा तिने पण तिचे प्रश्न उडवून लावल्यासारखे केले. म्हणून नेहाने ठरवलं की साक्षीच्या आईला फोन करून विचारायचं. रिया कॉलेजला गेल्यावर आपली काम आवरून नेहाने भावनाला, साक्षीच्या आईला फोन केला. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून नेहाने या दोघांचा विषय काढला. ती म्हणाली, “साक्षी हल्ली येत नाही अग घरी, रिया पण तीच काही सांगत नाही. साक्षी बरी आहे ना? तिने काही सांगितल का तुला?” त्यावर भावना म्हणाली, “मीपण तुला हेच विचारणार होते. कारण मी देखील एक दोनदा साक्षी समोर रियाचा विषय काढला पण ती काही बोलली तर नाहीच उलट रडू लागली.
मी खूपदा विचारलं पण ती काहीच बोलली नाही. मला वाटलं यांचं काहीतरी भांडण झाल असाव. एक दोन दिवसात मिटवून बोलू लागतील. पण अस काही होताना दिसत नाही. कारण आता रीयाच नाव काढल तरी साक्षी उठून जाते. मलाच काही समजत नाही काय झाल आहे.” दोघींनाही प्रश्न पडला की काय करायचं. पण नेहाला काहीतरी सुचलं. ती म्हणाली, “भावना मी एक काम करते. मी तुमच्या घरी येते आणि साक्षीला भेटते. कदाचित माझ्याशी बोलताना ती सांगेल काय झालं आहे ते.” भावनाला पण ही गोष्ट पटली.
त्याप्रमाणे एक दिवस वेळ काढून नेहा त्यांच्या घरी गेली. साक्षी घरी होतीच. पण खोलीत होती. नेहा आणि भावना बोलत बसले. थोड्या वेळाने साक्षी बाहेर आली तेव्हा तिने नेहाला पाहिले व तिच्याकडे पाहून हसली. पण तिच्याकडे पाहून समजत होत की ती पूर्वीसारखी नाही. या पाहून नेहा बोलू लागली, “साक्षी कशी आहेस बाळा, आम्हाला विसरलीस वाटत, हल्ली येत नाहीस घरी.” “त्यावर साक्षी म्हणाली, नाही काकू अस काही नाही. हल्ली कॉलेज मध्ये खूप assignment देतात ना त्यामुळे वेळच नाही मिळत.” नेहाने तिला आपल्याजवळ बसायला बोलवले. ती येऊन बसली. भावना किचन मध्ये निघून गेली. या दोघी बोलू लागल्या.
नेहा म्हणाली, “अग हो माहीत आहे assignment असतात पण आधी तुम्ही दोघी मिळून सर्व करत होतात ना म्हणून म्हटल. फोन पण नसतो तुझा. रिया पण काही सांगत नव्हती. म्हणून विचार केला की आपणच भेटून यावं. कसं काय चाललय तुझ कॉलेज? काय काय चालू आहे आणि?” त्यावर साक्षी बोलू लागली. पण रियाच नाव काढल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलेलं नेहाने पाहिलं होत. पण थेट न विचारता ती स्वतः हुन काही सांगते का याची नेहा वाट पाहत होती. साक्षीच्या बोलण्यात पण रियाचा कुठेच उल्लेख नव्हता. म्हणून मग नेहाने फिरवून विचारलं, “रियाला दुसरा काही प्रोजेक्ट दिला आहे का? नाही कॉलेज मध्ये वेगेवगळे ग्रुप करतात ना! आणि तू पण काही रियाचं नाव घेत नाहीये ना म्हणून विचारते. बाकी काही नाही.”
रियाच नाव परत ऐकताच साक्षी रडूच लागली. नेहाचा संशय खरा ठरला. नक्कीच त्या दोघींमध्ये काहीतरी झालं होत. तिने आधी साक्षीला शांत केलं आणि नंतर विचारलं की नेमक काय झालं आहे. सुरवातीला ती काही बोलेना पण नंतर ती सांगू लागली, “त्या दिवशी नेहा आली नव्हती कॉलेजला. मला एकटीला अजिबात करमत नव्हत. पण लेक्चर पण महत्त्वाची होती. एरवी रीया असली की आम्ही लेक्चर झाल्यावर जरावेळ कॅन्टीन मध्ये बसायचो, चहा कॉफी काहीतरी घेऊन घरी यायचो.
पण त्या दिवशी मी एकटीच होते म्हणून मी लगेच घरी येणार होते. मी शेवटचं लेक्चर संपवून निघत होते तोपर्यंत आमच्या वर्गात लीना म्हणून आहे तिने मला कॅन्टीनला येणार का विचारलं, तिला माहित होत की मी जायचे आणि आज तिला काहीतरी खायला म्हणून जायचं होत पण सोबत कोणीही नव्हत. एकट का जावं म्हणून तिने मला विचारलं. मी रीया शिवाय कधी गेलेच नव्हते. सुरुवतीला मी नाही बोलले पण ती सुद्धा एकटी होती आणि तिला भूक देखील लागली होती म्हणून मी तिच्यासोबत गेले. थोडावेळ बसुन आपण निघायचं अस मी विचार केला. गेल्यावर आम्ही खाऊन पिऊन आपापल्या घरी आलो.
दुसऱ्या दिवशी रीया आली. आम्ही बोलत बसलो होतो तेवढ्यात तिथे लीना आली आणि तिनं मला थँक्यू म्हटल. रिया आणि मला देखील समजलं नाही तिने का अस म्हटल. विचारल्यावर ती म्हणाली काल मी एकटी असताना तू माझ्या सोबत आली याच मला फार बर वाटलं. माझ्या लक्षात आल की ती कॅन्टीनचा विषय बोलत होती. पण रियाला काही समजल नाही. तिने पुन्हा विचारल तेव्हा लिनाने सर्व सांगितल. मी तिच्या सोबत गेले होते. आम्ही नाश्ता केला सर्व. ती पुढे म्हणाली देखील, मला वाटलं तू नाहीस म्हणून साक्षी येणार नाही अस मला वाटल होत पण ती आली. त्यावर रीया लगेच म्हणाली, अग नाही लीना साक्षीला ना मीच पाहिजे अस काही नसत. सोबत कोणीही असल तरी तिला चालत. माझी काही गरज नसते प्रत्येक वेळी. ती अस बोलून थांबली नाही तर तिथून निघून पण गेली. त्यानंतर ती एकदा सुद्धा माझ्याशी नीट बोलली नाही. मी ती नसताना गेले याच तिला वाईट वाटलं असेल कदाचित. पण तिने लीना समोर अस बोलल्यावर मला खूप वाईट वाटलं. रागाने ती त्यावेळी बोलून पण गेली असेल.
पण इतके दिवस झाले तिच्या या बोलण्याने मला दुःख झालं याची तिला जाणीव सुद्धा होऊ नये ही गोष्ट मला जास्त त्रास देते. कारण ती आपण काहीच चुकीचं बोललो नाही असच अजून वागते. माझी इतकी चांगली मैत्रीण, तिला माझ दुःख जाणवू नये का? मी कशी बोलू तिच्याशी?” साक्षीच्या बोलण्यातून सरळ सरळ जाणवत होत की ती किती दुखावली गेली आहे. तिने साक्षीला जवळ घेतल व समजावलं. तसच तिने रियाला पण मी समजावून सांगेन आणि ती तुझ्याशी नीट बोलेल अशी खात्री दिली. घरी आल्यावर नेहाने तेच पाहिले कमी केले. तिला माहित होत रीया अशी बोलली कारण ती साक्षीला आपलं मानत होती. ती नसताना पण साक्षी गेली याचं तिला वाईट वाटलं आणि म्हणून ती रागात बोलली ते तिला माहित होत. पण तिने बोलताना आपण आपल्या मैत्रिणीला दुःखावत नाही ना याची जाणीव ठेवायला हवी होती.
समजा त्या क्षणी जरी ते समजलं नसल तरी नंतर निदान त्यावर विचार केला पाहिजे होता. जो रियाने नाही केला. तिने रियाला बसवून या सर्व गोष्टी सांगितल्या. तिला सांगितल की त्या प्रसंगात आपण काहीतरी वागून बोलून गेलो असलो तरी त्यावर नंतर आपण विचार केला पाहिजे. तितकं आपण संवेदनशील असल पाहिजे. समोरच्या माणसाच्या सुख दुःखाचा आपल्याला फरक पडत असेल तर आपली नाही चांगली राहतात, ती करता येतात. हेच माणूसपणाचा लक्षण आहे. रियाला पण तिची चूक जाणवली. तिच्या नकळत तिने साक्षीला दुखावले होते आणि ती आता माफी मागायला देखील तयार होती कारण शेवटी तिला देखील तिची मैत्रीण हवीच होती.
आपण काय करतो कोणत्याही प्रसंगावर रिस्पॉन्स द्यायचं
सोडून रिॲक्ट होऊन मोकळे होते. आणि रिअँक्शन मध्ये फारसा विचार केलेला नसतो. समोरच्याला काय वाटेल, त्याला दुःख होईल हा हे न पाहता आपण काहीतरी अस वागतो ज्याने ती व्यक्ती दुखावते. सुरवातीच्या काळात झालेल्या गोष्टींवर जे चिंतन केल जायचं तेही आता होत नाही. अगदी सहजपणे आपण गोष्टी विसरून जातो. अगदी अपवादाने हा प्रश्न पडतो की आपण कोणाला दुखावलं का? खरच अस आपण काही वागलो असलो तर आपल्याला तो प्रश्न पडला पाहिजे आणि तस असेल तर माफी मागायची आपली तयारी पाहिजे कारण शेवटी माफी मागून कोणी लहान होत नाही. त्यातून जे काही चांगल निर्माण होणार आहे त्याकडे आपलं लक्ष पाहिजे. अस केल तर आपण चांगले नाते संबंध तयार करू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

सुंदर ‘असे लेख पाठवावे. धन्यवाद