आपल्याला राग येण्याचं मूळ कारण काय असतं ? का आपण ते न शोधता आणखीन चिडचिड करतो?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
श्रवण आणि श्रेया दोघही जुळी भावंडं आणि घरात सर्वांची लाडकी. लहान असताना तर एकमेकांची कॉपी वाटायचे ते दोघं. त्यामुळे कपडे एकसारखे, खेळणी पण बऱ्यापैकी सारखीच. त्यांना कोण लागायचं नाही. त्यांची ती दोघं खेळत बसायची. जस जशी मोठी होऊ लागली तशी वस्तुमध्ये जरा तरी का होईना फरक पडत गेला. कारण अगदी सारख्या वस्तू मिळत पण नव्हत्या. कपड्यांमध्ये पण जरा तरी फरक असायचाच. पण तरी आई बाबा घेऊन यायचे. ही दोघं जरी जुळी भावंडं असली तरी स्वभावात फरक मात्र होताच. श्रेया तशी समजूतदार होती, शांत होती. तिच्या उलट श्रवण होता.
हट्टी, आग्रही. त्यातही त्याचा आग्रह काय तर ताईला जशी वस्तू आणली, तिच्याकडे जसं जे काय आहे तसच मला पाहिजे. ती त्याच्याहून मिनिटांच्या फरकाने मोठी होती. त्यामुळे तो तिला ताई म्हणायचा. बरं हे आई बाबांपुरत मर्यादित असत तर ठीक होत. कारण ते काहीतरी adjust करून आणू शकले असते. पण नातेवाईक असतील, बाहेरचे कोणी पाहुणे असतील त्यांच्याकडे तसा हट्ट करून कसं चालणार होत? जुळी भावंडं म्हणून लोक वस्तू त्याच हिशोबाने आणायचे. पण तरीही मुल मोठी झाली की आपल्याला हवं त्या प्रकारचं मिळेल अस नसत.
श्रेया ही गोष्ट समजून घ्यायची. तिला तिची आवडीची वस्तू, तिला हवी असलेली गरजेची वस्तू मिळाली तेव्हढ पुरेस ठरायच. श्रवणला मात्र ते चालत नसायचं. तो लगेच रुसायचा. का? तर ती ताईच्या वस्तुसारखी दिसत नाही म्हणून. मग गाल फुगवून बसणे, आई बाबांवर राग काढणे अस सर्व व्हायचं. एक दिवस असच झालं. त्यांची आत्या घरी आली. येताना तिने दोघांनाही जीन्स आणि शर्ट आणला होता. आजकाल मुल मुली एकाच फॅशनचे कपडे घालतात त्यामुळे तिला हे जोड मिळायला काही त्रास पडला नाही. पण त्यातही शर्टवरची डिझाईन जरा वेगळी होती. बाकी सर्व सेम होत.
आत्या आल्याबरोबर दोघंही एकदम खुश. तिने आणलेले कपडे कधी एकदा पाहतो अस दोघांना झालेलं. तिने दोघांच्याही हातात बॅग दिल्या व खोलीत जाऊन पाहायला सांगितले. दोघंही गेली. श्रेया येताना कपडे घालूनच आली आणि खूप खुश देखील होती. पण श्रवणने मात्र कपडे घातले नाहीत. तो ते कपडे तसेच हातात घेऊन आला. ते पाहून आत्याला आश्चर्य वाटलं. तिने त्याला जवळ बोलवून विचारलं, “श्रवू बाळ कपडे आवडले नाहीत का? घातले का नाहीस?”त्यावर तो गाल फुगवून म्हणाला, “आत्या तु दोघांनाही वेगळा शर्ट घेऊन आलीस. माझ्या शर्टवर ताईच्या शर्ट सारखी डिझाईन नाही.” अस म्हणून तो ते कपडे ठेवून तसच खोलीत निघून गेला.
या गोष्टीत श्रवणच्या रागाचं कारण खरच आत्याने सारखे कपडे न आणणं हे होत का? आणि मग हेच कारण असेल तर श्रेयाला का बरं राग आला नाही? कारण पाहायला गेलं तर तिचा ही शर्ट त्याच्या शर्टशी मॅच होत नव्हता. तरी ती खुश होती आणि श्रवण मात्र रागावला. त्याची जी दर वेळी चिडचिड व्हायची त्याच कारण खरच हे होत का?
कारण दोघंही भावंडं एकाच प्रसंगात असून वागणं मात्र वेगळं होत. मग काय होत खर कारण? त्यांचा स्वभाव, त्यांचा दृष्टिकोन. श्रेयाचा स्वभाव हट्टी, आग्रही नव्हता याउलट श्रवणचा होता. त्याला जे पाहिजे तेच पाहिजे असायचं. त्यात जरासुद्धा कमी जास्त झालेलं चालायचं नाही आणि म्हणून हा राग निर्माण व्ह्यायचा. त्याच्या रागाचं कारण दुसऱ्याच वागणं नसून त्याचा हट्ट होता.
लहान मुलांच्या या वागण्याला आपण हट्ट म्हणतो, रागामागे असणारे कारण देखील मानतो. पण मग आपल्याला राग येतो त्यामागचं कारण काय असत? तर त्यामागचं कारण देखील आपला हट्टच असतो. फरक इतकाच की लहान मूल हट्ट सरळ सरळ दाखवून देतात आणि आपला हट्ट अदृश्य पातळीवर आधी असतो आणि तो पूर्ण होत नाही तेव्हा त्याचं रूपांतर रागात होत. तो आपल्या विचारांमध्ये असतो ज्याला डिमांड अस म्हणतात.
आपण असंख्य प्रकारच्या डिमांड करत असतो. कधी स्वतःकडून, कधी इतरांकडून तर कधी परिस्थितीकडून. कधी विचार केलाय, ऑफिस मधून बाहेर पडताना अचानक जोरात पाऊस पडला आणि आपल्याकडे छत्री वगैरे नसेल तर आपली खूप चिडचिड होते. आताच पडायचं होत का याला? मला आता जायला उशीर होणार अस बोलत आपण पावसाच्या नावाने लाखोली वाहतो. तेच आपल्या बाजूला आपली मित्र/मैत्रीण शांतपणे उभी राहून पाऊस कधी कमी होईल याची वाट पाहत असते.
आपल्यालाच आश्चर्य वाटत की हा माणूस इतका शांत कसा? काय उत्तर येत त्यावेळी? बऱ्याचदा हे उत्तर असत की आता आपल्या हातात आहे का पाऊस येणं न येणं? उगाच चिडचिड करण्यापेक्षा वाट पाहिलेले चांगल नाही का? आपल्याला जरी हे उत्तर casual वाटत असलं तरी खरच त्यात तथ्य असत. कारण डिमांड मध्ये आपण आपल्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींना कंट्रोल करायला पाहतो आणि त्या जेव्हा होत नाहीत तेव्हा आपल्याला राग येतो, आपली चिडचिड होते.
अनेक जण अस सांगतात की राग कमी करायचा असेल तर तर एक तर तो एक्स्प्रेस करायचा किंवा मग दाबून टाकायचा. पण हे त्यावरच खर उत्तर नाही. दोघामध्येही नुकसान आहे. राग प्रोसेस करावा लागतो. तो कसा? तर त्यामागचे विचार बदलून. पण ते बदलायचे असतील तर आधी हे समजलं पाहिजे की आपल्या रागाचं कारण बाहेरच्या गोष्टी नसून आपले विचार आहेत. कारण याच प्रसंगात आपल्या सारखी व्यक्ती वेगळं वागत आहे. त्यामुळे प्रसंग आपल्याला काही करायला लावत नसून आपले विचार आपल्याला ती गोष्ट करायला लावतात. ते बदलले पाहिजेत. रागामागे काय असते? तर डिमांड! तिचं आपल्याला कमी करायची आहे. ही डिमांड आपण कमी केली की आपोआप आपला राग देखील कमी होऊ शकतो.
आपल्याला खूप वाटत आपल्याला पाहिजे तस व्हावं पण तसच व्हावं असा हट्ट आपण नाही केला तर आपला राग कमी होईल. Rather तो येण्याचं प्रमाण कमी होईल. हे असे वैचारिक बदल करून आपण आपल्या बऱ्याच समस्या सुधारू शकतो. त्यासाठी पाहिजे थोड आत्मपरीक्षण आणि थोड चिंतन!!
