आपल्या वाईट वागण्याचा सर्वात जास्त त्रास हा कालांतराने आपल्यालाच होतो.
मेराज बागवान
आपली ‘वागणूक’ खूप महत्त्वाची असते.स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील.अनेकदा बिकट परिस्थिती असते.खूप आव्हाने आपल्यासमोर उभी ठाकलेली असतात.अशा वेळी, नकळत आपण वाईट वागतो.चुकीचे वागतो.ज्यामुळे इतरांना तास होतो, त्यांची मने दुखावली जातात.पण आपल्या ह्या वाईट वागण्याचा सर्वात जास्त त्रास हा कालांतराने आपल्यालाच होतो.
सुमनताई एक पन्नाशीतील महिला.त्यांच्या मुलीने प्रेमविवाह केला.सुमनताई ह्या खूप शिस्तप्रिय आणि नियमांवर चालणाऱ्या होत्या. मुलीने मात्र त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले.यामुळे सुमनताई तिच्यावर खूप रागावल्या. तिच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी त्या तिच्याशी बोलत नव्हत्या.इतकेच नाही तर त्यांनी तिच्याशी कोणताही संपर्क ठेवलेला नव्हता.कालांतराने त्यांना हीच गोष्ट आठवून आठवून खूप मानसिक त्रास व्हायला लागला.त्या स्वतःलाच दोष देऊ लागल्या,”अरे मी इतकं रागावण्याची गरज खरच होती का ? मुलीने जरी माझ्या मनाविरुद्ध लग्न केलेले असले तरी तिची निवड मात्र चुकलेली नव्हती.
पण मीच मनात अहंकार बाळगून राहिले आणि आई-मुलीच्या नात्याला मुकले.थोडे त्यावेळेस समजून घेतले असते.तिची बाजू ऐकून घेतली असती तर आज मी एकटी पडले नसते.ती बिचारी, मी तिच्याशी इतकी वाईट वागले तरी देखील माझ्या प्रत्येक वाढदिवशी मला भेटवस्तू पाठवून देते, घरातील इतर जनांजवळ वारंवार माझ्या तब्येतीची चौकशी करते.पण मी मात्र समजुतदारपणा दाखवत नाही”.असे सर्व विचार करून सुमनताईंना खूप त्रास होत होता.
वरील उदाहरणातून हेच सांगायचे आहे की, आपण जेव्हा जेव्हा वाईट वागतो तेव्हा तेव्हा त्या गोष्टीचा त्रास इतरांपेक्षा जास्त आपल्याला होतो.काही जणांना खूप राग येतो.त्यांचे रागावर नियंत्रणच राहत नाही.आणि मग त्याच रागाच्या भरात ते आपल्या जवळच्या व्यक्तींना नको तसे बोल बोलतात आणि त्या व्यक्तीला दुखावतात.मात्र कालांतराने राग शांत झाल्यानंतर , त्या व्यक्ती स्वतःला खूप अपराधी समजू लागतात.
कधी कधी उगाचच आपण जवळच्या मित्र -मैत्रिणीला वाईट बोलतो.”तू माझं कधीच ऐकत नाहीस, तू मला कधी मदतच करीत नाही, तू माझी खरी मैत्रीण नाहीस, तू माझा मित्र म्हविण्याच्या लायक नाहीस”, असे कित्येकदा छोट्या छोट्या कारणांवरून मित्रांशी भांडणे होऊन , त्यांच्याशी वाईट वागले जाते.पण कालांतराने जेव्हा हेच मित्र-मैत्रीण नकळत आपल्या उपयोगी पडतात तेव्हा आपल्याला मागचे आठवून खूप त्रास होतो.
शिक्षक देखील आपल्या विद्यार्थ्यांना अनेकवेळा शिक्षा करतात मात्र मनातून नंतर खूप रडत असतात.त्यांनाच याचा त्रास जास्त होतो.कार्यालयीन जीवनात देखील अनेकदा असे होते की , आपण सहकाऱ्यांना उगाचच वाईट बोलतो.कधी कधी बॉस आपल्याशी वाईट वागतात.पण ह्या सगळ्याचा त्रास वाईट वागणाऱ्या व्यक्तीलाच जास्त होतो.
कोणतीच व्यक्ती मूळतः वाईट नसते.पण आजूबाजूची परिस्थिती ,अडचणी, राग, इर्षा, अहंकार, दडपण,ताण-तणाव, जबाबदारी, भीती,शंका, अविश्वास,एकटेपणा,नकार अशा काही गोष्टींमुळे आणि मानसिकतेमुळे माणूस वाईट वागतो.पण ही सगळी कारणे असली तरी त्रास मात्र त्या व्यक्तीलाच जास्त होतो जो असे वागतो.
आपला कस ह्या अशा आव्हानात्मक परिस्थितीतच लागतो.अशा वेळीच आपली खरी परीक्षा असते.म्हणूनच आपल्या शब्दांपेक्षाही ,आपली वागणूक खूप महत्त्वाची असते.त्यामुळे लक्षात असू द्या, ज्या ज्या वेळी, आपण कोणाला दुखावतो, उगाच बोलणे टाकतो,राग-राग करतो, खोटे बोलतो,फसवतो ,अन्याय करतो ,त्या त्या वेळेस कालांतराने ह्या सर्व गोष्टींचा त्रास हा फक्त आणि फक्त आपल्यालाच होतो.
ही मानसिकता आपण सर्वांनी समजून घेऊन त्यानुसार आपले आचरण ठेवले पाहिजे.कारण उत्तम ‘मानसिक आरोग्य’ ही आनंदी, सुखी, शांतीमय आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे’.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला