आपल्या वागणुकीनेच होतं आपलं आयुष्य अधिक सुंदर…
सोनल इंगळे
आपल्या प्रत्येकाला शांत, सुंदर, संपन्न आयुष्य जगायचं असतं. वाद, भांडणं, कटकटी कोणालाही आपल्या आयुष्यात नको असतात. पण काहीवेळा आपली वागणूकच अशी असते की त्यामुळे आयुष्यात कटकटी निर्माण होतात. आपल्या सवयी अशा असतात की ते आपलं आयुष्य उद्ध्वस्त करुन टाकतात. म्हणून कसं वागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याचविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख.
अहंभाव बाजूला ठेवून सर्वांना आपलंसं करा आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपला अनेक लोकांशी संपर्क येत असतो. वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी माणसं आपल्याला भेटत असतात. आपलं कुटुंब, शेजारी, शिक्षक, मित्र, सहकारी, व्यापारी अशा सगळ्यांचा त्यात समावेश असतो.
या प्रत्येकाशी काही ना काही नातं आपलं तयार होत असतं. मग ते अगदी काही वेळासाठी असू शकतं किंवा आयुष्यभरासाठीही. त्यातली अनेक माणसं आपल्या आयुष्यातून जातात आणि अनेक आपल्या आयुष्यात नवीनही येतात. या सगळ्यांशी योग्य पद्धतीने नातेसंबंध तयार करुन आपल्याला जगता आलं पाहिजे.
कोणावर सतत टिका करु नये, खचलेल्याला धीर द्यावा, एखाद्याने काही चांगलं साध्य केलं तर त्याचं भरभरुन कौतुक करावं, प्रोत्साहन द्यावं, कोणाचीही हेटाळणी करु नये, कोणाला कमी लेखू नये. आपण इतरांपेक्षा वरिष्ठ स्थानी असलो तर आपल्या वागणुकीतून समोरच्याला कमी लेखलं जाण्याची शक्यता असते. तिथे आयुष्य जगताना माणूस म्हणून आपण हरतो. लोकांच्या नजरेतून उतरतो. कितीही काही साध्य केलं असलं तरी आपली वागणूक आपल्याला छोटंच ठरवते. त्यामुळे आयुष्य जगताना सर्वसमावेशक पद्धतीने, सर्वांना आपलंसं करत, अहंभाव बाजूला ठेवत आपण जगलो तर परिपूर्णता आपल्याला लाभू शकेल.
आयुष्याचे ध्येय ठरवा. ध्येयहीन आयुष्य जगण्यात कोणतीही मजा नसते. प्रत्येक माणसाचं जगणं तेव्हाच सार्थकी लागतं जेव्हा त्याच्या आयुष्यात काही ना काही ध्येय असतं. हे ध्येयच जगण्याला अर्थ प्राप्त करुन देत असतं.
तुम्ही लोकांशी चांगल्या वागणुकीतून कितीही चांगले संबंध प्रस्थापित केले तरी लोकांच्या नजरेत तुमची किंमत तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही काही साध्य करता. ध्येय पूर्ण करता. त्यामुळे परिपूर्ण आयुष्य जगताना ध्येय ठरवणं देखील महत्त्वाचं आहे. ते पूर्ण करण्यासाठी मग स्वतःला वेळ निश्चित करुन देणं महत्त्वाचं असतं. मला काय करायचंय, काय व्हायचंय, आयुष्यात कशात यश मिळवायचं आहे या सगळ्याची स्पष्टता आपल्यात असेल तर आपण ते ध्येय पूर्ण करु करतो.
जसे बोलाल तसे वागा
आपल्या आयुष्याची म्हणजेच आपली ओळख इतरांना आपल्या वागण्या – बोलण्यातूनच होत असते. त्यामुळे आपले शब्द जपून वापरावेत, जे काही आपण चांगलं बोलत आहोत त्याची कृती करण्यावर भर दिला तर आपण शब्दाला जागणारे आहोत अशी आपली प्रतिमा तयार होऊ शकते. या प्रतिमेचे आपल्याला वैयक्तिक आयुष्यात तसेच व्यावसायिक आयुष्यातही यश मिळवण्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.. हे वचन लक्षात ठेवून त्यानुसार कृती करणं आपल्याला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवू शकतं.
इतरांना दोष देणं आणि तुलना करणं टाळा. प्रत्येक माणूस कधी ना कधी इतरांवर टिका करतच असतो. लोकांच्या वागण्यावर बोलत असतो. ही सवय देखील एका चांगल्या व्यक्तिमत्वासाठी घातक ठरु शकते. दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी आपण स्वतः परिपूर्ण आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि मगच टिका करण्याची गरज आहे की नाही हे बघावं. या सगळ्याबरोबरच, तुलना करण्याची सवयही आपल्याला घातक ठरु शकते.
आपल्या आयुष्यातला आनंद ही सवय हिरावून घेऊ शकते, तसंच आपलं मनःस्वास्थ्यदेखील त्यामुळे बिघडतं. म्हणून आपली इतरांशी कधीही तुलना करु नये.
कालपेक्षा आजचे आयुष्य सुंदर बनवा आपलं आयुष्य कालपेक्षा आज अधिक सधन, सुंदर, संपन्न कसं असेल यावर आपण लक्ष द्यायला हवं. नकारात्मकत विचारांना, नकारात्मक माणसांना दूर ठेवून केवळ सकारात्मक विचारांना आपल्या आयुष्यात जागा करुन दिली तर कल्पनेपलीकडे सुंदर आयुष्य आपल्याला जगता येऊ शकतं.
नैतिकता, आत्मविश्वास, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, सहनशील, धाडसी या गुणांचा अवलंब करुन आयुष्य आनंदात जगण्याला प्राधान्य द्या. आपल्या आयुष्याचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील रहा. स्वतःचा वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक सर्व स्तरावर विकास करण्यासाठी झटत रहा. हे सगळं केलं तर आयुष्य निश्चितच सुंदर होईल यात शंका नाही. तुम्हालाही असं वाटतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
