आपल्या मनात आवडत्या व्यक्तीचं जे चित्र उमटतं, त्या चित्राला अंत नसतो.
हर्षदा पिंपळे
ऑक्टोबर महिना चालू होता.संध्याकाळची वेळ होती. आणि त्याच दिवशी कोजागिरीही होती.हलकासा पाऊस पडत होता.वातावरण तसं उत्साहाच,आनंदाचच होतं.त्याच वातावरणाची मुग्धा आणि अमेयला भूरळ पडली. [मुग्धा आणि अमेय दोघेही नव्या पालवीसारखच संसारात रमलेलं नवं जोडपं होतं.जेमतेम तीन वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला.]त्या वातावरणामुळे दोघेही चांगलेच सुखावले होते.घरात बसून राहणं त्यांना काही जमत नव्हतं.
म्हणून पटकन आवरून दोघेही बाहेरच्या वातावरणाचा आस्वाद घ्यायला बाहेर पडले. घराच्या जवळच असलेल्या एका सुंदर लेकवर ते गेले. त्या लेकवर जाऊन त्यांनी बराच वेळ गप्पा मारण्यात घालवला.आणि गप्पा मारता मारता अचानक मुग्धा म्हणाली.”आणि त्याचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून कधी हरवलाच नाही.आजही मला त्याचा तो चेहरा हुबेहूब आठवतोय.एखादं चित्र कसं पाहताक्षणी डोळ्यात भरतं तसच तोही माझ्या डोळ्यात कायमचा बसला होता. अजूनही आहे. तो म्हणजे माझ्या आयुष्यातील एखादं मनाला स्पर्शून जाणारं चित्रच जणू…!
त्याच्या सहवासाने,त्याच्या काळजीने, त्याच्या निखळ प्रेमाने माझ्या मनात त्याच्याविषयी एक सुंदर सुबक चित्र केव्हा तयार झालं कळालच नाही.” मुग्धाच बोलणं थांबतच नव्हतं. पावसाचा जोर जसजसा वाढत चालला होता तसतसं मुग्धाचे शब्दही जोमाने बरसत होते.मुग्धाच बोलणं अमेयला नेहमीच काहीतरी नवं नवं सांगून जायचं.त्यामुळे तो मुग्धाच बोलणं नेहमीच मनापासून ऐकायचा.अर्थात त्यादिवशीही त्याने मुग्धाच ते बोलणही अगदी मनापासून ऐकलं होतं.
खरं तर मुग्धा जे काही बोलत होती ते तिच्या जुन्या प्रियकराबद्दल (नचिकेतबद्दल) बोलत होती.आणि अमेयलाही याची कल्पना होती.त्यामुळे तो तिच्या या अशा बोलण्याने बिलकूल दुःखावला नव्हता.कारण मुग्धा ही अमेयशी तितकीच प्रामाणिक होती.तरीही तितक्यात “अमेय,तुला वाईट तर नाही नं वाटलं..? आय एम सॉरी पण मला आज राहवलं नाही म्हणून मी बोलून गेले.वन्स अगेन सॉरी.” असं मुग्धा म्हणाली.
“अगं वेडाबाई…. नाही आला मला राग आणि वाईटही नाही वाटलं.आणि मला माहित नाही का आपलं रिलेशन किती हेल्दी आहे ते…? आणि नचिकेतच काय गं…? तो तर खरच खूप चांगला होता.वन ऑफ माय फेवरीट लिस्टमध्ये नचि तर टॉपला होता आणि आजही आहे.तो गेला पण त्याच्या आठवणींचा ओलावा आजही तितकाच टिकून आहे.
एखादी गोष्ट आवडली की ती आपल्याला सारखी डोळ्यासमोर दिसत राहते. आणि नचि तर दोन पायांचा चालता- बोलता सजीव होता.त्याला विसरणं शक्यच नाही.मुग्धा, काही चित्र इतकी बोलकी असतात की त्यांच्याशी आपला संवाद कधीच संपत नाही.आपल्या आवडीच चित्र एकदा का मनात रेखाटलं गेलं की त्याला पूर्णविराम हा नाहीच. त्याला अंत हा नाही. दिवसागणिक ते चित्र अधिकाधिक सुंदर होत जातं गं…..आणि नचिकेत त्या सुंदर चित्रापैकी एक होता.”अमेय म्हणाला.
अमेय आणि मुग्धाचा संवाद घरी येईपर्यंत चालूच राहिला.त्या संवादालाही त्या दिवशी शेवट नव्हता.
आपल्याही मनात असच एखाद्या आवडीच्या व्यक्तीच चित्र अनेकदा उमटतं.मग ती व्यक्ती कोणतीही असो.आपली मैत्रिण,आपल्या शेजारचे वा प्रवासात भेटलेला एखादा अनोळखी.त्या आवडीच्या व्यक्तीच चित्र मनातून काही जात नाही.सगळीच चित्र ही मनात भरणारी नसतात. काही मोजकीच असतात जी क्षणात आपलीशी होऊन जातात. कोणत्याही बाजूने बघितलं तरीही ते चित्र सुंदरच वाटतं.कारण त्या चित्राचा प्रवासच हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
आणि हा अनुभव,ते चित्र उमटताना लागलेला वेळ कधीच विसरण्यासारखा नसतो.एका एका आठवणीने रेखाटलं गेलेलं हे चित्र कधीच जुनं होत नाही. त्या चित्रात कधी हास्याचे रंग तर कधी आसवांचे रंग मिसळलेले असतात. आठवणी इतक्या त्या चित्रात मुरलेल्या असतात की चित्रातील रंग कधी फिके होतच नाहीत.आपला श्वासांसोबत त्या आवडीच्या व्यक्तीच चित्रही जिवंत राहतं.त्या चित्राला अंत हा नसतो.किमान आपण जिवंत असेपर्यंत तरी !
त्या पावसाची ती पहिली भेट
मनात अजूनही स्मरते आहे,
जुन्या आठवांच्या गर्द राईत
मी पुन्हा नव्याने रमते आहे.
त्या चित्राचही तसच असतं.पहिल्या भेटीपासूनचा ते शेवटच्या भेटीपर्यंतचा प्रवास त्या चित्रात उमटत असतो.चित्र जुनं होऊनही कधीच जुनं होत नाही. उलट ते नव्याने जुन्या आठवणींच्या प्रेमात पाडायला लावतं.
आयुष्यात अशी चित्र मनाच्या मखमली भिंतीवर खूप सुंदर दिसतात. त्यांना पाहिलं की चित्र खरच सुंदर असतं याची जाणीव होते.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
