आपल्या अवतीभवती तितकेच लिमिटेशन्स असतात जितके आपण आपल्या मनात निर्माण केलेल्या असतात.
मेराज बागवान
काही मर्यादा म्हणजेच लिमिटेशन्स ह्या सामाजिक असतात. ज्या सर्वांनाच लागू असतात. तसेच मर्यादा ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळया देखील असतात. जसे की मी इकडे नाही जाऊ शकत, मी अमुक एका व्यक्तीशी इथपर्यंतच बोलू शकतो.अमुक एका व्यक्तीशी एखादी गोष्ट संपली की मी संपर्क नाही ठेवू शकत, माझी मर्यादा इथपर्यंतच आहे.
म्हणजेच काय, आपल्या अवतीभवती तितकेच लिमिटेशन्स असतात जितके आपण आपल्या मनात निर्माण केलेल्या असतात.पण प्रत्यक्षात मात्र तसे नसते देखील.त्या पलीकडे देखील काही गोष्टी असू शकतात.पण आपली मानसिकता खूप मोठी भूमिका बजावते.आणि ही मानसिकताच, आपले मनच ठरवत असते की आपली लमिटेशन्स किती आहेत.
मी नोकरीला जाते/जातो, तिथे फक्त मी काम आणि काम च करणार.माझे काम आणि मी इतकेच.ही झाली स्वतःवर स्वतःच्या मनाने घातलेली मर्यादा. पण थोडे सहकाऱ्यांशी हितगुज साधणे, संवाद साधणे, त्यांना कामात मदत करणे , तसेच आजूबाजूचे ऑफिस मधील वातावरण याचे निरीक्षण करणे ह्या गोष्टी देखील पुढे समावलेल्या असतात. पण आपले मन ह्या गोष्टींचा विचार करीत नाही.आणि मग आपल्या लीमिटेशन्स देखील त्याप्रमाणेच राहतात.
मला समाजात मिसळायला आवडत नाही, किंवा मी आत्मकेंद्रित’ आहे असे म्हणून काही जण स्वतःवर मर्यादा घालतात.मग त्यांचे मन नेहमी त्यांच्यावर हेच बिंबवते की मला जास्त कोणाशी बोलायचे नाही आहे. कोणापाशी व्यक्त व्हायचे नाही आहे.पण खरे पाहायला गेले तर जग इतके मर्यादित नाही ना,पण स्वतःच्या ह्या घालून घेतलेल्या मर्यादा त्या व्यक्तीला त्या पुढे जाऊ देत नाहीत.
काहीही झाले तरी मी माझे वेळापत्रक बदलणार नाही.मी इतक्याच वाजता जेवण करणार, मग काहीही होवो.त्यात थोडाही बदल होता कामा नये.मग त्यांचे मन तसेच वागू लागते.कोणी इतर जण जेवायला येणार असतील तरी देखील ते त्यांच्या मर्यादा सोडून वागत नाहीत.
कधी कधी एखादे काम कठीण असते.पण काही जण स्वतःच्या मनाला सांगतात की, मी इतकेच करू शकतो.इतके वाजले की मी हे काम काही करणार नाही.पण काम जर खऱ्या अर्थाने यशस्वी करायचे असेल तर अशा मर्यादा घालून कसे चालेल.कामाला तर तशी कोणतीच मर्यादा नसते.ते जर यशस्वी करायचे असेल तर मर्यादेपालिकडे जाऊन काम करणे गरजेचे असते.
एखाद्या मुलीला एखादा मुलगा खूप मनापासून आवडतो, ती त्याच्या प्रेमात पडते.पण तिचे मन तिला सांगते की , तो इतका हुशार, देखणा आहे, मग तो मला कसे बरे हो म्हणेल? आणि मग ती मुलगी स्वतःवरच अशी मर्यादा घालते आणि पुढे पाऊल टाकायला धजावते. पण वास्तविकपणे सांगायचे तर , ती तिची ही मर्यादा बाजूला ठेवून त्या मुलाकडे व्यक्त होऊ शकते, जे होईल ते होईल,पण ती नक्कीच हे करू शकते.मात्र तिच्या मनाने घातलेल्या मर्यादा तिला ते करून देत नाहीत.
असा विषय आहे, लीमिटेशन्स आणि आपल्या मनाचा.मन दिसत नसले तरी ते खूप ताकदवान असते, अगदी शरीरापेक्षा देखील.मी तर असे म्हणेन, मन जे विचार करते तेच शरीर कृतीत आणते. म्हणून मन आणि मानसिकता ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनाची वाट ठरवीत असतात. त्यामुळे तुमचे मन जसे सांगेल तसेच तुम्ही कृती करीत राहणार.
सर्व काही मनाच्या हातात असते.तुम्ही मनात विचार आणला की, ही व्यक्ती माझा तिरस्कार करते तर तुम्हाला कृती देखील तशीच घडताना दिसेल, पण वास्तविक तसे नसेल देखील.असेच मर्यादांचे आहे.तुम्ही जितक्या मर्यादा स्वतःच्या मनावर घालाल तितक्याच तुम्हाला अवतीभवती दिसतील.
ह्या लेखाचा मतितार्थ एवढाच की , तुम्ही मनाला इतके घट्ट, कणखर,बळकट आणि सकारात्मक बनवा की प्रत्येक गोष्ट ही अशी घडली पाहिजे ज्यामध्ये तुमचे आणि तुमच्या अवतीभवती असणाऱ्या सर्वांचे भलेच झाले पाहिजे.
यशाला कोणतीच मर्यादा नसते.त्यामुळे आयुष्यात प्रत्येक गोष्टीत यश मिळवायचे असेल तर तुमच्या मनाला किती आणि कशा मर्यादा, लीमिटेशन्स घालायच्या हे प्रत्येकाने तपासून अवलंबले पाहिजे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
