आपल्या आयुष्यात असणारी माणसं आपला स्ट्रेस कमी करणारी असावी , नाही की वाढवणारी !
गीतांजली जगदाळे
(समुपदेशक)
जीवनात खूप वेगवेगळी , तऱ्हेतऱ्हेची माणसं भेटतात. अगदी आपल्याच कुटुंबातील व्यक्ती घ्या ना! सगळ्यांचे स्वभाव , व्यक्तिमत्त्व वेगळं. आपल्या दोन मुलांना कितीही एकसारखे वातावरण , संस्कार द्या , शिक्षण , वागणूक सगळं सारखं असुद्या तरीदेखील ती दोन मुले कधीच सारखी नसतात. काही सवयी किंवा आवडीनिवडी जुळल्या तरी जास्तीत जास्त गोष्टी त्याच्यात भिन्न च आढळतात.
प्रत्येक माणूस हा unique म्हणजेच अद्वितीय असतो. त्याचासारखा तोच असतो या जगात. आणि तो असा unique असल्यामुळेच त्याची प्रॉब्लेम्स हॅन्डल करण्याची पद्धत , आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन , आचार-विचार , त्याच्या लेखी नात्यांचं महत्व सगळंच कसं वेगळं असतं . आणि अशा भिन्न-भिन्न स्वभावाच्या लोकांमध्ये वावरताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात.
काही माणसांची स्ट्रेस हॅन्डल करण्याची पद्धत अशी असते की त्यांचा आणि त्यांच्या आसपासच्या माणसांचा स्ट्रेस वाढायची कामे होतात. पण काही माणसे मात्र आपला स्ट्रेस , टेन्शन खूप चांगल्या पद्धतीने हॅन्डल करतात जेणेकरून स्ट्रेस हँडलिंग ची त्यांची क्षमता वाढते आणि त्याचा त्यांना पुढे फार उपयोग होतो. प्रत्येक माणूस तणावाखाली असला की वेगळ्या पद्धतीने वागत असतो , रिऍक्ट करत असतो.
मनुष्य जातीत जी नात्यांची , मैत्रीची भावना आहे ती इतर प्राण्यांमध्ये सापडणार नाही. मैत्रीची , नात्यांची भावना आपल्याला खूप काही देते. आपले जवळचे मित्र , जवळची माणसे ही आपल्याला सुख , समाधान , शांती देतात , म्हणजे त्यांच्या सहवासात आपल्याला या सगळ्याची अनुभूती होते. संकटे , आव्हानं , दुःखं हे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस हा अटळच आहे.
आपल्याला स्ट्रेस असेल प्रॉब्लेम असतील तर आपण कसेही वागून चालत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आज त्यातून जात आहे. कोणी वरवर कितीही मजेत दिसलं तरी त्याच्या आयुष्यात स्ट्रेस नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण संकटे कधीच भेदभाव करीत नाहीत. श्रीमंत- गरीब , जातपात असा कोणताच भेद न करता ती सर्वांच्या वाट्याला येतात.
फक्त मला स्ट्रेस आहे म्हणून माझी चिडचिड होते तर इतरांनी मला सहन केलं पाहिजे ,सांभाळून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या जवळची माणसे हे सगळं सहन करतात ही . पण त्यांच्याही आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. स्ट्रेस असणारा , अनुभवणारा प्रत्येक माणूस दुसऱ्याला त्रास होईल असा वागत नाही .
पण काही लोक असे वागतात जसं की , सगळ्या जगभराचा स्ट्रेस त्यांनाच असतो. त्यांना तो नीट हॅन्डल करता येत नाही. पण त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा स्ट्रेस वाढायला मदत होते. मला असं अजिबात म्हणायचं नाहीए की , प्रत्येक माणसाला स्ट्रेस हॅन्डल करता आलाच पाहिजे. पण प्रत्येकाने तो हॅन्डल करायला शिकावे किंवा तसा प्रयत्न तरी नक्की करावा.
आपण ज्या युगात , जगात वावरत आहोत ते ताण-तणावाचे आहे. आपल्या इच्छा , अवास्तव अपेक्षा , जगापेक्षा मागे न राहण्याची खटपट या सगळ्यातून येणाऱ्या स्ट्रेसच प्रमाण जास्त आहे आणि बेसिक गरजा भागवण्यासाठी येणाऱ्या स्ट्रेसच प्रमाण फार कमी आहे. पण आपल्याला होणाऱ्या त्रासामुळे आपण इतरांना त्रास देता काम नये. कधी-कधी तो नकळतही होऊ शकतो आणि त्यामुळेच चांगल्या स्ट्रेस coping techniques काय आहेत यावर आपण विचार करावा , मदत घ्यावी आणि प्रयत्न करावा. कारण आपलं एकमेकांशी असणाऱ्या नात्याने तो स्ट्रेस कमी होणं , मानसिक सुख , शांती , समाधान मिळणं अपेक्षित आहे , ना की आपल्याच माणसामुळे आपल्या स्ट्रेस मध्ये भर पडणं.
कोणामुळे तुमच्या स्ट्रेस मध्ये भर पडत असेल तर त्या व्यक्तीला प्रेमाने , नम्रपणे हे नक्कीच समजावून सांगा , आणि त्या व्यक्तीची स्ट्रेस हॅन्डल करण्यासाठी मदत करा. आणि आपणचं ती व्यक्ती असाल जिच्यामुळे इतरांचा स्ट्रेस वाढतो तर आपल्या जवळच्या माणसांची मदत घेऊन असं नक्की का होतं , आपली कोणती सवय यला कारणीभूत आहे हे शोधायचा प्रयत्न करा . आणि गरज लागल्यास मदत मागायला लाजू नका.
आपण आपले आयुष्य त्यातील प्रॉब्लेम्स , स्ट्रेस इत्यादी हे जेवढं सोडवायचा प्रयत्न करून एक आशावादी , सकारात्मक दृष्टीकोन ठेवू तेवढं आयुष्य जगणं सोप्प होईल आणि ते जगायला मज्जाही येईल. स्ट्रेस असो वा संकटे त्यांचीही जीवनात गरज असते. नाहीतर आपल्याला प्रेरणा मिळत नाही आणि सुखाची मजा ही येत नाही. पण त्या स्ट्रेस खाली दबून न जाता स्ट्रेस हॅन्डल करायला शिकुयात आणि आपल्या माणसांना ही मदत करूयात.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
