Skip to content

या ८ प्रकारच्या गोष्टींची सुरुवात करून आपली मेंटल हेल्थ सुधारुया.

एका गावात एक माणूस राहत होता. ठीक ठाक परिस्थिती होती. थोडी शेती, छोट घर, आणि दोन बैल. असा त्याचा संसार. पाहायला गेलं तर त्याचा हा संसार त्याच्या दोन बैलांच्या आधारावर चालत होता. शेतीला त्यांचा उपयोग, कुठल्या गावात जायचं असल त्यांना गाडीला जुंपल की निघालं. त्याचा पण आपल्या बैलांवर खूप जीव होता. त्यांची काळजी घ्यायचा.

पण त्याच पोट पाणीच त्यांच्यावर असल्याने कधी कधी काही गोष्टीत त्याचा नाईलाज होई. म्हणजे मनात नसताना पण त्याला बैलांना कामाला लावावं लागे. एक दिवस असच झालं. शेजारच्या गावात त्याला काही सामान पोहोचवायच होत. गाडी काढावी लागणार होती. पण समस्या अशी होती की रंगा म्हणून त्याचा जो बैल होता तो जरा आजारी होता.

शेतकऱ्याला काय करावं सुचेना. कारण ज्यांना सामान नेऊन द्यायचं होत ते मोठे प्रस्थ होते. जम बसला असता तर कदाचित वरचेवर काम मिळाले असते. त्याने विचार केला रंगाला जरा बरं नाही, पण तिरंगा त्याचा दुसरा बैल चांगला आहे. त्याने जरा जास्त भार घेतला तरी चालू शकत. हळू हळू करत आपण गावी जाऊ शकतो. म्हणून त्याने दोन्ही बैलांना गाडीला जुंपल.

रंगाला बर नसतानाही बांधलं आणि त्याचा भार तिरंगावर पडला. कारण गाडी त्यालाच ओढावी लागत होती. कसेतरी करत ते गावी जाऊन पोहोचले. सामान दिलं आणि येताना पण तसच करत आले. याचा परिणाम असा झाला की रंगा बैल अजून आजारी पडला आणि त्याचा भर घेऊन तिरंगापण आजारी पडला. एकाची काळजी घेण्याच्या नादात दोघेही बैल आजारी पडले आणि ज्या एका

कामासाठी त्याने हे सर्व केल ते काम झालं पण नंतर दोन्ही बैल आजारी पडल्याने पुढचे काही दिवस त्याच बाकीचं काम ठप्प झाल. एकाकडे नीट लक्ष न दिल्याने दुसऱ्याला पण ताप झाला. आणि त्याचा संसार कमकुवत पडला.

मित्रांनो, या गोष्टीतले हे दोन बैल म्हणजे आपलं आरोग्य आहे. आणि आरोग्य फक्त शारीरिक असत नाही तर मानसिक पण असत. त्या आधारावर आपला संसार म्हणजेच आपलं आयुष्य चालत असतं. जर मानसिक आरोग्य कमकुवत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केल तर शारीरिक आरोग्य बिघडत.

त्याच पद्धतीने जर शरिराकडे दुर्लक्ष केलं तर मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दोघांचीही तितकीच काळजी घ्यावी लागते. दुर्दैवाने शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतली जाते, त्याबाबत जितकी जागरूकता दाखवली जाते तितकी अजूनही मानसिक आरोग्याबाबत दाखवली जात नाही. सोयीस्कररीत्या तिथे दुर्लक्ष केलं जातं.

फक्त काही पूर्वग्रह असतात म्हणून. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मानसिक या शब्दाचा अर्थ फक्त अपसामान्य गोष्टींशी जोडलेला नाही. त्या पलीकडे जाऊन त्याची खूप मोठी व्याप्ती आहे. आपल्या एकंदरीत विकासामध्ये मानसिक आरोग्याचा खूप मोठा वाटा आहे. त्याच्या व्याख्येतून ही गोष्ट अजून स्पष्ट होईल.

“Mental health is the state of well-being in which the individual realizes his or her own abilities, can cope with the normal stresses of life, can work productively and fruitfully, and is able to make a contribution to his or her community”.

अशी सुअवस्था ज्यामध्ये व्यक्तीला त्याच्या क्षमतांची जाणीव असते, जी सक्षमपणे रोजच्या जीवनात येणाऱ्या ताणतणावांना सामोर जाऊ शकते, उत्तमरित्या काम करू शकते आणि जिचा चांगला समाज घडविण्यात वाटा असतो, तसे योगदान ती देत असते. या सर्व गोष्टी व्ह्यायला हव्या असतील तर आपलं मानसिक आरोग्य चांगल असण गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी आपण नव्याने सुरू केल्या पाहिजेत. पुढील काही गोष्टी करून, त्यांची सुरुवात करून आपण आपले मानसिक आरोग्य सुधारू शकतो.

१. स्वतःबदलची जागरूकता वाढवा: आपण जितकं स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकू तितकं आपल्यासाठी परिस्थिती हाताळणे सोप्प जात. स्वतः विषयी जागरूक राहणे म्हणजे काय? तर मला काय जमत, माझ्या क्षमता काय आहेत? एखाद्या प्रसंगी मी कसा वागतो? त्यामागे काय कारण असतील? नेमकी काय कमी पडत असेल? माझ्यात मला अजून कोणते बदल व्हायला पाहिजेत? माझ्या भविष्याबद्दल मी जे काही योजल आहे त्या दिशेने मी योग्य रीतीने जात आहे का?

या सर्व प्रश्नांची उत्तरं मला देता येत आहेत का? ती देता आली पाहिजेत. त्यासाठी आपल्या बद्दलची जाणीव वाढवली पाहिजे. सेल्फ ऑब्सरवेशन वाढलं पाहिजे. पुढे जाऊन मी काय वागू शकतो याची जाणीव मला आता होत असेल तर मी त्यासाठी काहीतरी करू शकतो. म्हणून मी कोण आहे याच उत्तर आपल्याला शोधायचं आहे.

२. भावनिक व्यवस्थापन करायला शिका: आताच्या काळात शैक्षणीक बुध्दीमत्तेसोबतच भावनिक बुद्धिमत्तेला महत्त्व प्राप्त झाले आहे. किंबहुना त्याहून जास्त महत्त्व आले आहे. कारण व्यक्ती कितीही शिकली, कितीही गोष्टी कमावल्या तरी स्वतःच्या भावना जर तिला नीट हाताळता येत नसतील, जीवनात येणाऱ्या चढ उताराना समोर जाता येत नसेल, खाली पडून परत वर उठता येत नसेल तर ते शिक्षण कमी पडत.

म्हणून भावनिक व्यवस्थापन यावं लागत. आपल्या व इतरांच्या भावनांची नीट जाणीव असणे, त्या त्या प्रसंगात योग्य प्रकारे त्या व्यक्त करता येणे, समाजात नीट वावरता येणे या सर्व गोष्टी यामध्ये येतात. ज्या आपल्याला विकसित करायला पाहिजेत. कारण त्याची आत्ता खूप गरज आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी देखील.

३. विचारांवर काम करा: म्हणजेच काय, तर चांगले विचार करणे. आता इथे बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो. चांगले विचार म्हणजे सकारात्मक विचार नाहीत. २४*७ माझं चांगलच होणार आहे अस म्हणून कोणाचं चांगल होत नाही. ही स्वतःशी केलेली फसवणूक आहे. त्यामुळे चांगले विचार म्हणजे विवेकी, उपयुक्त असे विचार. जे आपल्या बुद्धीला चालना देतील, आपल्याला चांगल काम करण्याला, आपला आत्मविश्वास वाढवायला मदत करतील, वास्तवात ठेवतील असे विचार करायला शिका. कारण विचारांना खूप मोठा प्रभाव भावनेवर पडतो. त्यामुळे भावनिक व्यवस्थापन करायचं असेल तर विचार तसे असले पाहिजेत.

४. संगत चांगली बनवा: आपण ज्यांच्या सहवासात आपला बराच वेळ घालवतो, त्यांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. म्हणूनच आपला मित्रपरिवार असेल, अजून कोणी असेल त्याच्यासोबत वावरताना ती व्यक्ती कशी आहे? हे पाहणं गरजेचं आहे. आपली संगत चांगली असली पाहिजे. ज्याच्यामुळे आपला माणूस म्हणून विकास होऊ शकतो. जर ते होत नसेल आपण चुकीच्या गोष्टींकडे वळत असू तर ते आपल्या आरोग्यासाठी नुकसानीचे आहेच पण इतरांसाठी पण घातक आहे.

५. निसर्गावर प्रेम करा, त्याच्या सानिध्यात राहा: मानसिक आरोग्य म्हटल की ही गोष्ट कायमच येते. त्याला कारण देखील आहे. आपण जितकं निसर्गात फिरू तितकं आपल्याला फ्रेश वाटत. का? कारण आपल्या मेंदूमध्ये जे neurotransmitters असतात त्यामध्ये काही बदल होतात. त्यांचा स्त्राव होतो. ज्यामुळे आपला मुड छान होतो. जसे की सेरोटनिन. त्यामुळे मोकळ्या हवेत चालायला जाणं, फिरणं आपल्या आयोग्याला चांगल ठरतं.

६. चांगली नाती बनवा: आपण समाजशील आहोत. एकमेकांच्या सानिध्यात राहून, चांगले नाते संबंध तयार करून आपण आपलं आयुष्य अजून सुखकर करतो. एकट राहायला कोणाला आवडत नाही. प्रेम, जिव्हाळा आधार लागतोच. त्यासाठीच चांगल्या मनाने लोकांशी वागणं, त्यातून चांगली नाती तयार करण, ती जोपासणे आपल्याला मानसिक आधार देत.

७. सजग रहा: आपण आपला बराच वेळ होऊन गेलेल्या गोष्टीत किंवा न झालेल्या गोष्टीत विचार करून घालवतो व स्वतःला थकवतो. क्षीण करून टाकतो. ज्याचा आताचा कामावर, आपल्या राहणीमानावर परिणाम होतो. म्हणून जितकं होईल तितकं आताच्या क्षणात राहायचा प्रयत्न करणं, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे लक्ष असण, आहे त्या गोष्टीचा आनंद घेणं हे सर्व केल पाहिजे.

८. शारीरिक आरोग्याची काळजी घ्या: जसं आधी म्हटल या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत. दोघांचाही एकमेकांवर परिणाम होतो. म्हणूनच मानसिक आरोग्य सुधारायचे असेल तर शरिरकडे पण लक्ष द्यावे लागते. आताच्या घाईगडबडीत लोकांना ना खाण्याची शुद्ध असते ना नीट झोपण्याची. यातून अनेक मानसिक आजार निर्माण होतात. म्हणून चांगला पोषक आहार, वेळेवर पुरेशी झोप, व्यायाम, रिकाम्या वेळात काहीतरी छंद, मित्रासोबत वेळ घालवणे या सर्व गोष्टी पण केल्या पाहिजेत.

याचबरोबर वेगवेगळी कौशल्य जी आपल्याला एकंदरीत आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायला मदत करतील ती पण आत्मसात करता आली पाहिजेत जी सरावाने येतात.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!