आपली चांगली वेळ त्यांना देऊया जे वाईट काळात सोबती बनले.
रोहिणी राधाकिसन
‘जीवन सुख दु:ख का संगम है|’ या ओळींप्रमाणेच आपलं आयुष्य आहे. कधी सुख तर कधी दु:ख आहे. कधी ऊन तर कधी सावली आहे. फरक फक्त एवढाच आहे की प्रत्येक प्रसंगात आपल्या सोबत कोण आहे. सुखाचे सोबती कोण आणि दु:खाचे भागीदार कोण हे प्रत्येक प्रसंगात आपल्याला कळतात.
आपण म्हणतो की, सुखात सगळेच असतात, नाही! सुखातही खूप असतात ज्यांना आपल सुख बघवत नाही पण ते तोंडावर हसू ठेऊन अस दाखवतात की ते आपल्या सुखात खुश आहेत. आणि आपण अश्याही खूप लोकांनी घेरलेले असतो, जे दु:खात दु:खी असल्याचा दावा करतात, आणि आपल्यामागे आपल्या अवस्थेवर हसतात. आपल्या मागे आपली टिंगल उडवतात.
खूप वेळ असही होतं की आपण ज्यांना कधी ओळखतही नाहीत. पाहिलेलही नाही ना कधी बोललेलो असतो, त्यांना आपण अनोळखी म्हणतो. तरीही ती प्रसंगी आपली मदत करतात. आणि जे आपले जवळचे असतात ते ऐन वेळेला आपली परिस्थिति बघून हात सोडतात.
मग आता तुम्हीच सांगा की आपण अश्या लोकांना आपली चांगली वेळ का द्यावी? जे आपल्याला आपल्या अवस्थेवर सोसायला सोडून निघून गेले. आपला विचार नाही केला.
मग अश्यावेळी आपण खचून जातो परिस्थिति पेक्षा जास्त. ज्या अडचणीत आपण असतो त्यापेक्षा जास्त आपण या लोकांचा विचार करायला लागतो. मी त्यांच्यासाठी एवढं केल, त्यांची साथ दिली त्यांच्या पडत्या काळात. त्यांना आधार दिला जेव्हा कोणी त्यांच्यासाठी पुढे सरसावत नव्हते तेव्हा मी होतो त्यांच्या बरोबरीने उभा. आणि आज मला गरज आहे, मी अडचणीत आहे तर त्यांनी माझी साथ सोडली.
या विचारांनी आपण आपली अडचण, समस्या सोडवण्यापेक्षा आपल्याशी कोण कसं वागतय याचा विचार करायला लागतो. आपलं मानसिक आरोग्य, शांतता गमावतो. आणि आणखीनही अडचणींनी घेरले जातो.
ज्यांनी आपली वेळ बघून आपल्याला निवडलं, त्या लोकांना आपणही आपल्या आयुष्यात वेळ घेऊन, आपल्या परक्याची ओळख करून निवडायला पाहिजे म्हणजे आपल्याला अश्या प्रसंगांना तोंड नाही द्यावा लागणार.
प्रत्येक व्यक्ति जो दावा करतो तो आपला नसतो. प्रत्येक व्यक्ति हा वेगळा आहे. काहींची वागणूक त्यांच्या स्वभावाशी मेळ नाही खात. स्वभाव दाखवतात वेगळा पण आचरण वेगळे, विचार वेगळे, हेतु वेगळा. आपण नेहमी ऐकतो पण आणि बोलतो पण “दिसतं तस नसतं म्हणून जग फसतं.” बरोबर ना! आणि आपणही तिथेच फसतो. एका भेटीत आपण माणसांन विषयी धारणा बनवतो. ज्याला judgemental होणे अस म्हणतो.
एका भेटीत किंवा एखाद्याशी दोन मिनिट संवाद साधून आपण ती व्यक्ति कशी आहे, तिचा हेतु काय आहे किंवा तिचे विचार कसे आहेत हे नाही ओळखू शकत. कोणी भेटून आपल्याशी दोन शब्द प्रेमाने बोललं किंवा आपली स्तुति केली. याचा अर्थ असा नाही होत की ती व्यक्ति खूप चांगली आहे किंवा ती आपली हितचिंतक आहे.
मदत ही अशीही असो आर्थिक, मानसिक, उत्तेजनार्थ, सामाजिक ती मदत असते जेव्हा आपण अडचणीत असतो. त्या वेळी प्रेमाचा एक शब्दही आपल्यासाठी खूप मोलाचा असतो. कोणी आपल्यासोबत नसताना, एखाद्या नवख्या, अनोळखी व्यक्ति ने दिलेला सल्ला किंवा मार्गदर्शन आपल्याला लाख मोलाचं वाटत.
त्यावेळी आपल्याला ते चूक की बरोबर ही नाही कळत. आणि जर अश्या कळात आपल्याला कोण पाठपुरवणी करते. योग्य मार्गदर्शन करते. स्वतःवर विश्वास ठेवायची हिम्मत देते. परत नवीन सुरवात करण्याची जाणीव करून देते. तर ती व्यक्ति आपल्यासाठी आपल्यापेक्षा जास्त जवळची वाटते. त्यावेळी ती आपल्यासाठी माणूस रूपी देव असते.
अश्या लोकांची गर्दी असते आपल्या आयुष्यात जी सुखाच्या वेळी न बोलवता येतात. आणि वेळेला आपण आवाज देऊन थकतो पण त्यांचा काही ठावठिकाणा नसतो. ती फक्त आपल्याला लुबाडणारी असतात.
दुसरे जे सुखात भलेही आपल्या सोबत नसतील पण वेळेला जेव्हा आपल्याला गरज भासते तेव्हा आपल्या सोबत उभे राहतात. चुकीच्या मार्गावर पाऊल जाऊ नये म्हणून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतात.
आपलही कर्तव्य असलं पाहिजे त्यांच्या पडत्या काळात आपण त्यांच्या सोबत असलं पाहिजे. जे आपल्या वाईट वेळेत आपले सोबती बनले तेच खरे आपले आहेत. आणि त्यांचाच आपल्यावर, आपल्या यशावर आणि आपल्या वेळेवर अधिकार आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
