आपली बाजू योग्य असूनही वादाच्या ठिकाणी नेहमी शांत रहा, कारण…
मेराज बागवान
आपला अनेक माणसांशी संबंध येतो.प्रत्येकाचे विचार,स्वभाव निरनिराळे असतात. प्रत्येकाचे एखाद्या गोष्टीविषयी एक मत असतेच असे नसते.आणि मग कधी कधी ह्या विविधतेमुळे वाद निर्माण होतात.पण अशा वेळी आपली बाजू जरी योग्य असली तरी देखील वादाच्या ठिकाणी नेहमी शांत राहा.कारण, वेळ खूप बलवान आहे आणि ही वेळच काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवून देते.पण त्यासाठी लागतो तो संयम.
प्रत्येक व्यक्ती विभिन्न असते. काही व्यक्ती खूप हट्टी असतात.मी जे म्हणेल तेच योग्य असे त्यांना वाटत असते.दुसरे काय म्हणत आहेत याकडे त्यांचे लक्ष नसते ,मग ती गोष्ट योग्य असली तरी देखील त्यांना ती अयोग्यच वाटते.म्हणून अशा वेळी आपण जरी योग्य असलो तरी देखील ते साबीत करून देण्याचा नादात पडू नका. कारण यामुळे गोष्टी बिघडतात,गैरसमज निर्माण होतात आणि नातेसंबंध बिघडतात.आणि ह्या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर नेहमी वादाच्या ठिकाणी शांत राहा.
एजमेकांशी संवाद साधत असताना वाद निर्माण होणे साहजिक आहे. भिन व्यक्तीमत्वामुळे दोन व्यक्तींमध्ये वाद निर्माण होऊच शकतो.प्रत्येक व्यक्ती एकमेव असते, कोणीच कोणासारखे नसते. त्यामुळे तुम्ही जर कोणाशी संवाद साधत असाल आणि एखाद्या गोष्टीविषयी तुमचा मुद्दा अगदी योग्य असेल तरी देखील समोरचा दुसऱ्या कोणत्यातरी दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघत असतो .त्यामुळे तुम्हाला जर का तुमची आत्मिक शांतता भंग करायची नसेल तर शांत राहणेच योग्य असते.कधी ना कधी योग्य गोष्टी काय आहेत हे जगासमोर येतेच.त्या व्यक्तीने जरी तुमच्याकडे हे बोलून दाखविले नाही, तरी देखील योग्य गोष्ट कायम योग्यच राहते, ती बदलत नाही.
त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही योग्य आहात तेव्हा तेव्हा फक्त समोरच्या व्यक्तीचे ऐकून घ्या, अगदी शांतपणे ऐका आणि वादग्रस्त परिस्थिती वाटत असेल तर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका आणि विषय बदलून टाका.ही एक प्रकारची मानसिकता आहे, जिथे काही व्यक्तींना वाटत असते की मीच बरोबर, समोरचा काही तरी वेगळेच बोलतो आहे.किंवा त्या व्यक्तीचा तुमच्यावर विश्वास नसतो.आणि प्रत्येक व्यक्तीने ही मानसिकता समजून घेतली पाहिजे आणि हे समजणे देखील एक आरोग्यदायी मानसिकतेचे लक्षण आहे.
जर तुम्ही वाद करीत राहिलात ते काहीच निष्पन्न होणार नाही.उलट अनेकजण तुमच्या सत्य गोष्टींवर देखील संशय घेतील.आणि तुमची मानसिकता यामुळे खराब होईल.आत्मिक शांतता हरवून जाईल. त्यामुळेच शांत राहणे योग्य असते. वाद वाढवून काहीच उपयोग नसतो.उलट अनमोल वेळ वाया जातो.
जेव्हा वाद उत्पन्न होईल असे वाटत असते तेव्हा कोणतेही स्पष्टीकरण देऊ नका.त्याकडे कोणी लक्ष देखील देणार नाही, मग तुम्ही बरोबर असलात तरी देखील.काही गोष्टींवर वेळ हेच उत्तर असते. तुम्ही-मी काहीच करू शकत नाही.काही गोष्टी आपल्या हातात नसतात.नियतीने काही गोष्टी योजलेल्या असतात.आणि नियती आपले वेळापत्रक कधीच बदलत नाही.
‘नशीब’,’निसर्ग’,’काळ’,’योग’ अनेक गोष्टी ठरवीत असतात.मग आपण कितीही कोणत्याही गोष्टींच्या मागे लागलो तरी देखील काहीच उपयोग होत नाही.म्हणून मग कायम संयम बाळगून ठेवणे शहाणपणाचे ठरते.काळ अनेक अनुत्तरित गोष्टींची उत्तरे देऊन जातो. त्यामुळे आपण बोलून वाद वाढविण्यापेक्षा शांत राहणे योग्य असते.
जर का तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य कायम जपायचे असेल तर शांत राहायला शिका.जर मानसिक आरोग्य चांगले असेल तर आणि तरच तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्टीत यशस्वी होऊ शकतात.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
