आपले विचार उपयोगी, फायदेशीर आहेत की नाही हे कसं ठरवाल?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
दिवसभरात आपल्याला वेगवेगळ्या भावना येत असतात, आपल्या डोक्यात काही ना काही विचार चाललेले असतात. हे विचार, ह्या भावना एखाद्या विशिष्ठ प्रसंगाशी निगडित असतात. काहीतरी घडत असतं किंवा घडून गेलेलं असत किंवा घडणार असत त्यातून याची सुरुवात झालेली असते.
उदा. सध्या पाऊस खूप मोठा येत आहे त्यातून काही जणांना जुन्या गोष्टी आठवतील व त्यातून काही वाईट झालेलं असेल तर ते आठवून दुःख होईल. काहींच्या चांगल्या आठवणी ही असू शकतात ज्या मनात आल्यावर चेहेऱ्यावर हसू येईल. परीक्षा सारखी लांबणीवर चालली आहे यातून परीक्षा कधी होणार, नीट होईल की नाही असा विचार करून मुलांना चिंता येईल.
या आणि अश्या प्रकारच्या अनेक भावना, विचारांमधून आपण जात असतो. आपल्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होत त्यातून एखादी भावना आपल्याला जाणवू लागते आणि त्याला अनुसरून आपण काहीतरी करून बसतो किंवा तसा प्रयत्न करतो. त्या त्या वेळी ती कृती आपल्याला बरोबरच वाटते. योग्यच वाटते. चिंतेने ग्रासलेला एखादा मुलगा कदाचित परीक्षा द्यायचं पण टाळेल. पोटात गोळा येऊन आजारी पडेल. हे सर्व का? ते तो प्रसंगात जायचं नाही म्हणून. त्या वेळी अस करणच त्याला बरोबर वाटत. पण खरच हे अस विचार करण, अस वागणं योग्य आहे का? उपयोगी आहे का हे कसं ठरवाल?
तर त्या विचाराला तपासून. त्या विचारांमधली विवेकता म्हणजेच rationality तपासून. Rebt चे जनक अल्बर्ट एलिस यांनी आपले विचार रॅशनल आहेत की नाही हे तपासून पाहण्यासाठी काही प्रश्न सांगितले आहेत. ते आपल्याला स्वतःला विचारता आले पाहिजेत. ते कोणते?तर आपल्या डोक्यात
•जो काही विचार येत आहे तो मला कार्यक्षम ठेवत आहे का?
•माझा हा विचार त्यातून जे मी वागत आहे ते वास्तवाला धरून आहे का?
•हा माझा विचार तर्काला धरून आहे का म्हणजेच लॉजिकल आहे का?
•तसच यातून मला काही मदत होत आहे का?
उदा. आपल्याला कोणीतरी चिडवल, काहीतरी बोललं तर अनेकांना राग येतो. खरतर ही एक भावना आहे पण या आधी राग देणारे विचार आलेले असतात. ज्यात जास्त कडून डिमांड असते अस एलिस म्हणतो. कसे विचार असतात? तर मला अस कोणी बोललच नाही पाहिजे. माझ्याशी सर्वांनी नीटच बोललं पाहिजे. हा “च”आहे तो आपल्याला जास्त राग देतो. ज्यातून अनेकदा भांडण होतात, प्रसंगी मारामाऱ्या होतात. त्यावेळी आपल्याला अपमान केला म्हणून हे सर्व करण योग्य वाटत पण त्याचे परिणाम वाईट होतात. म्हणून आधी आपण त्या रागाच्या विचारांना वर सांगितल्याप्रमाणे प्रश्न विचारले पाहिजेत.
म्हणजेच समोरच्याने व्यक्तीने माझ्याशी नीटच बोललं पाहिजे आणि तो तस करत नाही म्हणून मला राग येत आहे पण त्यातून मी कार्यक्षम होत आहे का? तर नाही. मी काहीतरी चुकीची कृती करत आहे. याला चांगल काम करण म्हणत नाहीत.
माझा हा विचार वास्तवाला धरून आहे का? म्हणजेच मी अशी कोणाकडून डिमांड करण वास्तविक आहे का? नाही कारण माझा कोणावरही कंट्रोल नाही. मी फक्त चांगल्या प्रकारे प्रभाव टाकू शकतो.
तर्काला धरून या करता नाही कारण ही गोष्ट आधीच घडून गेलेली आहे. आणि जी गोष्ट झाली त्यावर त्याने अस बोललच नाही पाहिजे असं म्हणणं illogical आहे.
शेवटी हे सर्व मी काही करत आहे, हा विचार, यातून मला येणारा इतका राग या सगळ्याची मला काही मदत होते आहे का? आता मला बर वाटेल पण त्याचे परिणाम चांगले नसतील.
अश्या पद्धतीने जेव्हा जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येतील काहीतरी चुकीचं करत आहोत अशी जाणीव होईल तेव्हा थोडावेळ शांत होऊन, दीर्घ श्वास घेऊन हे प्रश्न स्वतः ला विचारले पाहिजेत. जेव्हा त्या विचारामध्ये किती विवेकता आहे, किती अविवेकता आहे हे समजेल तेव्हा आपण तो प्रसंग जास्त चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. हे प्रश्न म्हणजेच आपली coping cards आहेत जी तुम्ही कुठेही नेऊ शकता. त्याचा वापर करू शकता.
शेवटी आपण आता काय वागतो याचे परिणाम आपल्याला पुढे दिसतात त्यामुळे आता काय फायद्याचं आहे हे पाहण्यापेक्षा कधीही दीर्घकालीन काय फायद्याचं आहे ते पाहिलं तर जास्त चांगल ठरेल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
