Skip to content

परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो? या मागचं सायन्स काय?

परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो? या मागचं सायन्स काय?


रोहिणी राधाकिसन


लहानपणापासून आपल्या कानावर नाती, आपले, परके असे शब्द पडत आलेत पण आपण आजही कोण आपले आणि कोण परके या गैरसमजात अडकलेले असतो. आता मला सांगा ज्यांना आपण आपलं मानतो ते खरंच आपले आहेत का? आणि आपण ज्यांना परकं मानतो ते खरंच परके आहेत का? पण आपण हे ठरवतो नेमकं कश्यावरुन? आणि याचं उत्तर एकच ‘अनुभव’.

आयुष्य म्हणजे ऊन-सावली, चढ-उतार, सुख-दु:ख या सुख दु:खाच्या प्रसंगीच आपल्याला कळत की आपल्या सुखात आपल्यासोबत सुख उपभोगणार कोण होतं आणि दु:खात आपलं दु:ख वाटून घेऊन आपल्या बरोबर उभं राहणार कोण होतं. दरदिवशी आपल्याला भेटणारी, बोलणारी, आपल्या नात्यातली, शेजारची, मित्र /मैत्रिणी या सर्वांना आपण आपले मानतो पण खरंच ज्यांना आपण आपले समजतो ते खरंच आपले आहेत? का नाही? ते वेळच आपल्याला दाखवून देते.

आता तुम्ही म्हणाल की, मग आम्ही काय वाईट वेळ येईल आणि आम्हाला कळेल की कोण आमची साथ देते, कोण आपले हे कळेल याची वाट बघायची का? तर नाही, आपण म्हणतो ना की, ‘हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात’. आपल्या आयुष्यात अशी खूप लोकं असतात जी आपल्याशी नेहमी चांगली वागणूक ठेवतात. चांगुलपणाची चादर ओढून, त्यांचा मनसुबा आपल्याला कळू देत नाहीत. खूप असे लोकं असतात ज्यांना आपण आपले हितचिंतक मानतो, खरंच ते आपले हितचिंतक आहेत का? की, चांगुलपणाचे पांघरून ओढलेले आपले हितशत्रू आहेत हे आपल्याला समजायला हवं.

आयुष्यात आपल्याला बऱ्याच संकटांना सामोरं जाव लागत. कधी ती छोटी असोत वा मोठी आपल्याला त्यांना समोरं कस जायचं त्यातून बाहेर कस पडायचं ते कळत नाही. अश्या वेळी आपल्याला गरज असते ती एका सल्ल्याची, मार्गदर्शनाची जी आपण अश्या व्यक्तिला मागतो, ज्याच्यावर आपला विश्वास आहे ज्याला आपण आपलं मानतो. आपला हितचिंतक मानतो. पण हे ‘आपण’ मानतो, ती व्यक्ति आपल्याबद्दल कशी भावना ठेवते ते ती आपल्याला कसं मार्गदर्शन करते यावर अवलंबून आहे. आपल्या पडत्याकाळात आपल्याला आपल्यासोबत आहे असे दाखवून आपल्याला आणखीनच चुकीच्या रस्त्यावर नेऊन सोडते का, आपल्याला योग्य दिशा दाखवते आणि संकटात पावलो -पावली आपली सोबत करते. हे दाखवून देते की आपले कोण.

आपल्या आयुष्यात आपण विभिन्न प्रकारच्या लोकांनी घेरलेले असतो. परंतु आपण यापासून बेसावध असतो. कारण त्यांच खरं रूप हे आपल्याला वेळ आल्यावरच कळत.

पहिले ज्यांचं खरंच आपल्यावर प्रेम असतं, ते आपल हित पाहू इच्छित असतात. दुसरे ज्यांना आपल्याशी काही घेणं देणं नसत पण आपल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते, आणि जसं आपण चुकलो की मग ते आपली बदनामी करायला मोकळे. तिसरे ज्यांना आपण आवडत नाही परंतु अस दाखवतात की त्यांना आपल्याशी खूप लगाव आहे. चांगुलपणाचा मुखवटा घातलेले. हसत हसत टोमणे देणारे, आपल्या मागे आपली बुराई करणारे, प्रत्येक गोष्टीत आपण कसे कमी आहेत याची जाणीव सतत करून देणारे.

आणि असेही काही असतात जे आपला विश्वास जिंकतात, आपल्या अडचणी ऐकतात अगदी आपले असल्यासारखं, तिथून उठले की आपल्या परिस्थितीची थट्टा करतात. समोरून एक दाखवतात आणि मागे एक वागतात. सुखाच्या वेळी आपली सोबत करणारे आपले नसतात. दु:खात सुरवातीपासून शेवट पर्यंत आपली साथ निभावणारे खरे आपले असतात. आपण चुकीच्या दिशेला जातोय हे बघून आपल्याला थांबवणारे आपले असतात भलेही आपण त्यावेळेस त्यांना दोन शब्द बोललो तरी ते आपल्याला वाईट मार्गाला जाण्यापासून अडवतात. पण तिथेच काही आपल्याला चुकीची संगत घालून देतात आणि आपल्याला कळूही देत नाहीत.

आपल्याला आपलं बनून आपल्यां जवळच्या नात्यांबद्दल आपल्या मनात गैरसमज निर्माण करतात. आर्थिक अडचणीत आपले हितचिंतक बनून आणखी आर्थिक दृष्ट्या दुर्बल बनवतात. आपल्या खालावलेल्या मानस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला मानसिक दृष्ट्या हताश करतात. अश्या व्यक्ति कधीच आपल्या नसतात पण त्या आपल्या आहेत का नाहीत हे समजायला आपल्याला वेळ लागतो.

एक आई आपल्या छोट्याश्या मुलाला चॉकलेट्स देत नाही, कधी तरी एखाद देते. कारण जास्त चॉकलेट्स खाल्ले की दात खराब होतात. त्याला पावसात भिजू देत नाही कारण त्याला सर्दी होऊ नये म्हणून. पण तो छोटा आहे हे समजण्यासाठी, त्याला तर या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो त्याला वाटत आईच आपल्यावर प्रेमच नाही. पण आई आपल्या मुलावर प्रेम करत नाही, अस कधी झालंय का.

तसंच आपलही आहे जर आपल्याला आनंदित करणाऱ्या गोष्टी ज्या आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी योग्य नाहीत त्या करण्यापासून अडवत आहे तर ते आपले परके किंवा शत्रू नाहीत. ते खरे आपले आहेत. आणि जर कोणी प्लेजर च्या नावाखाली आपल्याला चुकीच्या वळणावर नेत असेल तर त्यांच्या पासून अंतरावर राहणे उत्तम.

नात्यांमद्धे काही सायन्स नसतं, तिथे फक्त प्रेम, आपुलकी असते. ज्यांच्याशी आपल आपुलकीच नात नाही ते आपल्यासाठी परकेच असतात. परंतु जर प्रेम , आपुलकी यांच्या आडून कोणी आपल्याला फसवतेय तर ते ओळखायला आपल्याला नक्कीच वेळ लागतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो? या मागचं सायन्स काय?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!