Skip to content

आनंद साजरा केल्याने वाढतो आणि दुःख सांगितल्याने कमी होते अस का म्हटल जात?

आनंद साजरा केल्याने वाढतो आणि दुःख सांगितल्याने कमी होते अस का म्हटल जात?


काव्या धनंजय गगनग्रास

(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)


आनंदाच्या धारांमध्ये सचैल नहाते आहे

माझे मन गाते आहे; माझे मन गाते आहे….

सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत माझ्या मनाला पहिल्यापासूनच खूप भावत. किती खरं आहे, आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपलं मन आतून या आनंदाच गीत च तर गात असत. आतून येणाऱ्या या गीतावर आपण थिरकत पण असतो. पण हा आनंद, हा हर्ष आपल्याला कधी एकट्याने साजरा करायला आवडत नाही.

अस म्हणतात की आनंद साजरा केल्याने वाढतो आणि तेच दुःख सांगितल्याने कमी होते. अस का म्हटल जात असावं?

तर याची सुरुवात आपण सुखापासून, आपल्या आनंदापासून करूयात. आपण जेव्हा आनंदी असतो, आपल्या आयुष्यात जेव्हा अश्या काही गोष्टी घडतात ज्या खरच आपल्याला सुख देणाऱ्या असतात मग त्या अगदी छोट्या असल्या तरी चालतील. त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याच किती महत्त्व आहे यावर त्या अवलंबून असतात.

मग ते लहान मुलाला अगदी नवीन सायकल मिळणं असेल, नवीन नोकरी लागण, लग्न जमण, आवडता पिक्चर टॉकीजला आल्यावर त्याचा फर्स्ट डे फर्स्ट शो मिळणं काहीही. ज्या काही गोष्टी आपल्याला आनंद देत असतात त्या आपल्याला आपल्या जवळच्या लोकांना सांगायला, त्यांच्याशी शेअर करायला आवडतात. अस का होत? याच कारण म्हणजे आपल्याला आपली आनंदाचा कोणीतरी साक्षीदार हवा असतो, आपल्याला त्यात कोणीतरी वाटेकरी हवा असतो. जितके आपले वाटेकरी वाढतात तितका आपला आनंद द्विगुणित होत असतो.

अगदी रोजच्या आयुष्यातील उदाहरणातून हे लक्षात येईल.

वाढदिवस, परीक्षेत नंबर आला असेल तर आपण त्याच सेलिब्रेशन करतो, स्टेटस, स्टोरीला टाकतो. त्यातून जी माणसं आपल्याला शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात हे सर्व आपल्यासाठी खूप अनमोल असते आणि आपला आनंद वाढवणारे असते. आपल्याला आनंद सहभागी होणार कोणीतरी आहे, आपल्या सुखाने इतरांना देखील आनंद होत आहे ही भावना आपल्यासाठी खूप सुखावह असते.

म्हणून आपण आपला आनंद शेअर करत असतो.

याउलट दुःखाचं आहे. आपल्याला नेहमी अस संगितल जात की दुःखी वाटेल ना तेव्हा माझ्याशी बोलत जा, एकटी/एकटा बसू नको. अस का? कारण जेवढं आपण आपलं मन मोकळं करू तेवढं आपल्याला हलकं वाटत. त्याचबरोबर अजूनही एक कारण आहे.

जेव्हा दुःखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपण कितीही भक्कम असलो तरी त्या वेळेला आपली विचारशक्ती, आपली कार्यक्षमता, मनस्थिती बऱ्याच प्रमाणात क्षीण झालेली असते. अश्या वेळी जर आपण एकटे राहिलो तर ते दुःख वाढण्याची शक्यता असते. तसच हे एकटेपण बरेचदा आपल्यात असाहाय्य असण्याची भावना निर्माण करत.

अश्या वेळी आपल्या योग्य ते निर्णय घेता येत नसतात. म्हणूनच यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत, आपल्या मित्र मैत्रणींसोबत बोलाल्याने आपल्याला बरे वाटते तसेच आपल्याला आपल्या समस्येकडे पाहण्याचे ते सोडवण्याचे मार्ग पण मिळतात. आता प्रत्येक वेळी आपल्या लोकांशी बोलून दुःख तात्पुरतं कमी होऊ शकत, पण समस्या सुटतेच अस नाही.

कारण इथे फक्त मन मोकळं केलेलं असतं. आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं अशी भावना यात जास्त असते, तुलनेने समस्या कमी करण्याहून. म्हणून अती दुःखात असताना एकटे न राहता यातील तज्ञ जसे की समुपदेशक, थेरपिस्ट यांच्याशी बोलणे पण फायदेशीर ठरते. यातून आपण मन पण मोकळं होत तसेच आपण समस्या कशी सोडवावी याची माहिती पण मिळते. आपण स्वतः त्यातून सक्षम होतो.

जुन्या काळात घरातली एखादी व्यक्ती दुःखी, नाराज असली तरी ती तशी फार काळ राहत नसे. कारण घरात खूप सारी लोक असत. आजी आजोबा, आई बाबा, काका, काकू, भावंडं या सर्वांनी घर गजबजलेल असे. त्यामुळे आयुष्यात जे काही होईल मग ते सुख असो किंवा दुःख सर्व एकत्रपणे पेलत. तेव्हढा संवाद, तेव्हढा विश्वास एकमेकांमध्ये होता. त्यामुळे ते दुःख लगेच कमी होत असे. आता विभक्त कुटुंब पद्धती आली. तसेच हे technosavy युग आहे. घरात फार फार तीन, चार माणसं. सर्वांचे बिझी रूटीन. त्यामुळे एकत्र असूनही दुरावा निर्माण झाला आहे. संवाद कमी होत चालला आहे आणि माणूस गर्दीत असून एकटा होत चालला आहे.

यासाठीच आपल्याला परत हा संवाद वाढवला पाहिजे, आपली ही नाती परत नव्याने जगता आली पाहिजे, हे कुटुंब टिकवता आले पाहिजे. तसेच आपल्या सुख दुःखा तील वाटेकरी वाढवता आले पाहिजेत. तरच आपण एक सुदृढ आयुष्य जगू शकू.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!