Skip to content

सदैव आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत..

सदैव आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत..


मेराज बागवान


काही व्यक्ती अशा असतात की , कोणतीही परिस्थिती असो , कायम त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसूच असते.आणि हे फक्त त्यांच्या स्वतःपुरतेच मर्यादित नसते.तर ते हा आनंद इतरांना सतत वाटत असतात.आणि त्यामुळेच अशा सदैव आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत.. ते जितका आनंद इतरांना देतील, त्याहून अधिक आनंद त्यांच्या जीवनात , त्यांच्या कडे परत येत असतो.

काही व्यक्ती खुप अबोल असतात.किंवा थोडे जरी काही बिनसले की लगेच निराश होत असतात.मग काही व्यक्ती अशा व्यक्तींना हसवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा ‘मूड’ बदलवतात. त्यांच्या चेहऱ्यावर हासू आणून त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतात.यामुळे दोन गोष्टी साध्य होतात.एक म्हणजे, निराश झालेल्या व्यक्तीला जगण्याची नवीन ऊर्जा मिळते.आणि दुसरे म्हणजे जी व्यक्ती हा आनंद वाटत आहे तिच्याकडे आनंद द्विगुणित होऊन येतो.आणि हा आलेला नवीन आनंद ते पुन्हा दुसऱ्या कोणालातरी वाटून टाकतात.आणि त्यांची ही ओंजळ आयुष्यभर त्यांच्यासोबत असते….इतरांना वाटण्यासाठी.

‘सुधीर काका’ एक साठीतील तरुण व्यक्तिमत्व. सोसायटी मधील कधी कोणी कोणत्याही समस्येत असेल तर प्रथम काकांजवळच येत असत.कोणाच्या घरात भांडण झाले की काका कोणताही गोंधळ होऊ न देता वाद मिटवत असत. मानसिक आधार नसलेल्यांना काका नेहमी आधार बनत.कोणीच त्यांच्याकडून रिकाम्या हाताने परतत नसत.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा काका पूर्ण प्रयत्न करीत असत आणि तो यशस्वी देखील होत असे.आणि यामुळेच काकांकडे आनंद ‘अमर्यादित’ होता.

सुधीर काकांसारखी अनेक मंडळी असतात.जी आपल्या आजुबाजुला असतात.कधी आपल्या ते लक्षात येत नाही, तर कधी आपण अशा व्यक्तींकडे चक्क दुर्लक्ष करतो.’मला माझं माहिती बाबा काय चाललंय ते , तुला नाही समजणार, तुला हसायला काय जातंय’ असे बोल त्या व्यक्तींना कित्येकदा ऐकावे लागतात. पण ही आनंद देणारी माणसे कोणत्या ‘देवदूता’ पेक्षा कमी नसतात.देव त्यांच्या रुपात आपल्याकडे येत असतो पण आपण त्याला झिडकारतो.

‘आई-वडील’ ही अशी व्यक्ती अशी असते की , जी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त आनंद देण्याचा प्रयत्न करत असते.आणि त्यामुळेच त्यांची ओंजळ कधीच रिकामी राहत नाही.ते आपल्या मुलांसाठी ‘फरीशते’ असतात .

आई-वडिलांनंतर देखील आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येत असतात , ज्यांच्याकडे देण्यासाठी कायम आनंद आणि आनंदच असतो.त्यांची ओंजळ कायम भरलेलीच असते.आपण त्या व्यक्तीची परतफेड करू शकत नसलो तरी देखील विनाअपेक्षा ते आपल्याला आनंदी करत असतात.

देव नेहमी आपल्या सोबत असतो.पण काही वाईट झाले की लगेच आपण त्याला दोष देतो.पण देव मात्र अदृश्य स्वरूपात आपली नेहमी मदत करीत असतो.आणि ही आनंद वाटणारी माणसे देखील त्या विधात्यानेच आपल्यासाठी पाठवलेली असतात.मग प्रश्न उरतो तो , ‘अशा व्यक्तींना झिडकरायचे की आपलेसे करून कायम आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे जपून ठेवायचे’?

प्रत्येक समस्येवर उत्तर असते. तुम्ही स्वतः जेव्हा ती समस्या सोडवू शकत नाही, तेव्हा मग देव अशा आनंद वाटणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या रुपात तुमच्या आयुष्यात आणतो आणि तुमची गरजेच्या वेळी मदत करतो.खरेच आहे हे , फक्त मनात तसा विश्वास हवा.आणि तसा दृष्टिकोन.

धन्यवाद!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!