Skip to content

मनाची थोडक्यात आंतरिक स्वच्छता !

-संकलन-
यशोधन बापट
पू.पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांच्या मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र असलेल्या श्यामची आई या पुस्तकातुन……..
“लहानपणापासून दोन वेळा मी स्नान करतो.दोन वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली.रात्री निजण्यापूर्वी आपण स्नान केली असली तर शरीर स्वच्छ,निर्मळ आणि हलकेच वाटते.निजण्याच्या आधी आपण प्रार्थना करतो हे असते मनाचे स्नान.”
एके दिवशी रोजच्याप्रमाणे मी खेळून,घरी येऊन अंघोळीला गेलो.अंघोळ झाल्यावर आईस जरा मोठ्या आवाजात म्हंटले,”आई!माझे अंग पूस.सारे पाणी संपले आहे.”
संध्याकाळी आई आपल्या लुगड्यानेच माझे अंग पुसत असे.
आई आली,अंग पुसता पुसता म्हणाली ,”श्याम,देवाची फुले काढ.”
मी म्हणालो,”माझ्या पायाचे तळवे ओले आहेत.मातीमुळे ते मळतील.म्हणून तू आधी माझे तळपाय सुद्धा पूस.”
“तळपाय ओले असले तर काय झालं रे श्याम?आता कशाने पुसू ते?”आई म्हणाली.
“आई तुझा पदर या दगडावर पसर.मला नाही आवडत माझ्या पायाला माती लागलेली,”
” अगदी हट्टी आहेस हो श्याम.”असे म्हणून आईने लुगड्याचा पदर पसरला.मी माझे पाय त्यावर ठेवून,अगदी नीट कोरडे करून मग फुले काढण्यासाठी निघालो.आईचे लुगडे ओले झाले.त्यावेळी तिला लुगडे बदलणे शक्य नव्हते हा साधा विचार देखील मी केला नाही.पण मुलाचे पाय मळू नयेत,त्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तिने स्वतःचे लुगडे ओले करून घेतले.आई मुलांसाठी काय करणार नाही?काय सोसणार नाही?काय देणार नाही?
मी घरात गेलो आणि देवाची फुले काढू लागलो.तेवढ्यात आई निरांजन घेऊन आली व म्हणाली,”श्याम!पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस!तसाच मनाला घाण लागू नये म्हणून देखील जप हो.देवाला सांग शुद्ध बुद्धी दे.
त्या माऊलीचे किती ते मधुर अमृतासारखे शब्द.आपण आपले शरीर,कपडे स्वच्छ राखण्यासाठी किती धडपडत असतो,काळजी घेत असतो.शरीर,कपडे मळू नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न करीत असतो.परंतु मनाला स्वच्छ राखण्याबाबत किती जपतो?मन मळले तर आपण रडतो का कधी?आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा.इतर सर्व बाबतीत आपले अश्रुंचे हौद आपल्या डोळ्यात भरलेले आहेत.पण मी अजून मनाने शुद्ध,निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का?
संत मीराबाई म्हणतात-
असुवन जल सिंच सिंच प्रेमवेलि बोई|
(अश्रुंचे पाणी घालून प्रेमाची,ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवली आहे.)
थोडक्यात शरीराची,कपड्याची स्वच्छता ही पाण्याने,साबणाने होते.तर मनाची स्वच्छता ही सद्विचार, सद्वर्तन यांनी होते.मन निश्चितच स्वच्छ होऊ शकते.जेव्हा मनात चांगले,शुद्ध विचार येतात तेव्हा मन स्वच्छ होते.याउलट मनात वाईट विचार आले की मन अस्वच्छ होऊ लागते.या साऱ्याचा मतितार्थ असा की,बाह्यसौंदर्याइतके आंतरिकसौंदर्यही तितकेच महत्वाचे.
***

आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत पोर्टलला  भेट द्या आणि सामील व्हा !

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!