Skip to content

सतत आनंदी दिसणारा चेहरा खरंच आनंदी असतो का ??

मुखवटे आणि चेहरे


अंजली जोगळेकर


मला आठवतंय खूप वर्षांपूर्वी (जेव्हा इतक्या माध्यमांचा सुळसुळाट नव्हता ) दूरदर्शनवर ‘ मुखवटे आणि चेहरे ‘ असा एक कार्यक्रम लागायचा. तेव्हा सर्रास सगळ्यांकडे दूरचित्रवाणी संच नव्हते. त्यामुळे त्यावेळी तो पहायला मिळाला नाही. नंतर कधीतरी हा मुलाखतींचा कार्यक्रम असल्याचे समजले.

मला स्वतःला मुलाखती पहायला खूप आवडतात. झगमगत्या दुनीयेतील किंवा राजकारणातील सुप्रसिध्द व्यक्तींची वेगळीच बाजू पहायला मिळते. बाहेरच्या जगातल्या मुखवट्यांमागचा चेहरा बहुतांश वेळा वेगळा किंवा त्यांच्या निर्माण झालेल्या प्रतिमेच्या एकदम विरुध्द असतो.

या लाॕकडाऊनच्या काळात यु ट्युब ढुंढाळायची सवय मला लागली.खूप चांगले लघुपट, जुनी गाणी,कविता, कथावाचन, मुलाखती यांचा खजिनाच जणु मला सापडला.

मला तर यु ट्युब म्हणजे जादुची कांडीच वाटते, जे म्हणाल ते हजर. यावर अनेक मुलाखती मी पाहील्या. अगदी राजकारणी, समाजसेवक, हिंदी/ मराठीतील तारे तारका ते तृतीयपंथीयांपर्यंत. या मुखवट्यांमागे लपलेले सुंदर चेहरे या निमीत्ताने मला पहायला मिळाले.

अनेक मुलाखतींमधली माझ्या लक्षात राहीली आणि खूप आवडली निशीगंधा वाड यांची मुलाखत. तिला पाहणं त्याहून जास्तं तिचं मृदु, सौम्य आवाजातलं बोलणं ऐकणं म्हणजे सुंदर मराठी भाषेची मेजवानीच . अशी भाषा ऐकायला मिळणं हे आजकाल विरळाच झालंय. तिचं मराठी भाषेवरचं प्रेम, लेखन, वाचन याबरोबरच तिचं सौंदर्य,सौम्य व्यक्तीमत्व, तिचं समाजकार्य आणि बुध्दीमत्ता यातलं नेमकं काय पाहू नी काय नको असं मला झालं होतं.

याबरोबरच प्रत्येक नात्याशी प्रामाणिक रहायला हवं हे सांगणारी राजा गोसावींची मुलगी शमा देशपांडे, मोहन गोखलेंच्या मृत्यूनंतर आधी फारसं काम न करणारी पण नंतर यात तिच्या अटींवर काम करुन, प्रचंड संघर्ष करणारी शुभांगी गोखले ,केदार शिंदे, प्रतिमा गोखले , शितल आमटे यांची वाटचाल , त्यांचा प्रवास जाणून घ्यायला खूप आवडलं मला.

या दिग्गजांबरोबरच दिशा शेख या तृतीयपंथीयाचे जेंडर या विषयावरचे परखड विचारही मी आवर्जून ऐकले. अशा कार्यक्रमातून एक वेगळा विचार, दृष्टिकोन आपल्याला मिळतो असं मला वाटतं.

खूप फॕशनेबल, मादक अशी प्रतिमा असलेल्या सनी लिओनीची मुलाखत पण मी एका दिवाळी अंकात वाचली. माझ्या डोळ्यासमोर फारशी बरी प्रतिमा तिच्याविषयी नव्हती पण तिचे कष्ट, धडपड आणि अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्यासाठी काम करण्यातली तिची सामाजिक बांधीलकी पाहून मी आश्चर्यचकित झाले.

अँजेलाना जोली ही सर्वात सुंदर समजली जाणारी हाॕलीवुडची तारका . तिच्या मुलाखतीमधून मला समजलं की एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती कंबोडीयात गेलेली असताना तिला तिथल्या शरणार्थींबद्दल समजलं.

त्यानंतर जाणीवपूर्वक वीसहून अधिक देशातल्या शरणार्थींशी ती बोलली, त्यांच्याबरोबर वेळ घालवला, त्यांच्यासाठी काम करायला सुरवात केली .

तिच्या चमकत्या मुखवट्यामागचा हा मानवतावादी चेहरा नव्यानेच मला समजला. या सगळ्या व्यक्ती मला खूप आवडतात . मुलाखतींद्वारे त्यांचा खरा चेहरा जाणवल्यावर माझा त्यांच्याबद्दलचा आदर किती कितीतरी पटीने दुणावला.

आपल्या रोजच्या जीवनातही किती चेहरे आपण पाहतो? की ते मुखवटेच असतात? नाहीतर नैराश्य या विषयावर बोलणार्या, आत्महत्येला विरोध करणार्या शितल आमटे यांनी आत्महत्या का करावी? सतत आनंदी दिसणारा चेहरा खरंच आनंदी असतो की तसं असल्याचं भासवतो? खरं तर या मुखवट्यांमागचे चेहरे आपण शोधायला हवेत, त्यांच्याशी संवाद साधायला हवा.

नाही का????



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “सतत आनंदी दिसणारा चेहरा खरंच आनंदी असतो का ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!