Skip to content

जे चांगलं आहे, फायद्याचं आहे..ते वेचता आलं पाहीजे!

फुटपट्टी


मधुश्री देशपांडे गानू


लहानपणी आपण सगळ्यांनीच एक गोष्ट ऐकली वाचली असेल. एका स्त्री च लग्न एका गरीब घरात होतं. तिचं माहेर गडगंज असतं. माहेरी तिच्या भावाकडे तिचे नीट स्वागत होत नाही. तिचा आणि तिच्या मुलांचा अपमान केला जातो. कालांतराने परिस्थिती सुधारते. तिची सांपत्तिक स्थिती चांगली होते.

मग मात्र तिला भावाकडून अगत्याचे आमंत्रण येते. अतिशय नटून-थटून दागिन्यांनी सजून भावाकडे जाते. आणि पंक्तीत जेवायला बसते तेव्हा सगळे दागिने काढून ताटा समोर मांडते आणि म्हणते “आज मला जो मान मिळतोय, मला आमंत्रण आलंय ते मी बहिण आहे म्हणून नाही तर या दागिन्यां मुळे मला हा मान दिला जात आहे. या दागिन्यांसाठी हे जेवण आहे.”

आजही समाज याच संकुचित मानसिकतेचा शिकार आहे. कोणाला तरी कमी, न्यून दाखवून तुम्ही कसे काय मोठं होता? पैसा कसाही मिळवलेला असला तरीही किंमत फक्त पैशाला असते. मानमरातब फक्त पैशाचा असतो. समाजात संपत्ती असलेल्यालाच मान देतात.

नातं ,मैत्री, तुमचे गुण, तुमचा स्वभाव, तुमची समाज सेवा सगळं फिकं आहे यापुढे . तुम्हांला देण्यात येणारा मान आणि कौतुक याची फुटपट्टी फक्त आणि फक्त पैसा आहे.

योग्य तो स्टेटस, पैसा, अत्याधुनिक भौतिक साधने या तुम्हांला मान देण्याच्या फूटपट्ट्या आहेत. याच फुटपट्टी ने अनेकांना ग्रासलंय. मग सुरु होते ती रॅट रेस. आपल्याला जमत नसलेलं आवडत नसलेलंही क्षेत्र या रॅट रेस मध्ये उतरण्यासाठी निवडलं जातं . सतत कोणाशी तरी स्पर्धा करत राहायचं. सतत कोणाच्यातरी पुढे राहायचं , सतत चर्चेत राहायचं.

कोणातरी आपल्यापेक्षा सर्वच बाजूंनी तालेवार असणाऱ्या माणसाच्या जगण्याची भौतिक साधनांची फुटपट्टी सतत स्वतःला लावून पहायची. मग आहे त्यापेक्षा आणखी हवं , आणखी हवं ही हाव संपतच नाही. दुसऱ्याच्या आयुष्याची जगण्याची फुटपट्टी ने स्वतः जगू पाहायचं.

यात मानसिक शारीरिक दमछाक झाली तरी चालेल पण समाजात स्टेटस मिरवायचं. त्यासाठी ऊर फुटेस्तोवर धावायचं. अमक्या गोष्टी, भौतिक साधने , सुखसोयी, पैसा आपल्याकडे असायलाच हवा नाहीतर समाज आपल्याला मान सन्मान कसा देणार?

हा विचार सतत करत रहायचा. आणि यामध्ये जर अपयश आलं तर मात्र ते सहन करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची मानसिकता , मानसिक बळ जर कोणाकडे नसलं तर अशावेळी नैराश्य येऊन अगदी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला जातो. अगदी सहज…

एकाच्या आयुष्याची फुटपट्टी दुसऱ्याला लावता येत नाही. प्रत्येकाचे आयुष्य , परिस्थिती, प्राथमिकता, उद्देश, प्राधान्य, भोवतालची माणसं सगळंच वेगळं असतं.

पण नाही….आपण डोळ्यांवर झापडं बांधून धावत सुटायचं , का तर फक्त पैशाला आणि पैशामुळेच मान आहे. माणसाची किंमत शून्य आहे इथे. मग कारण नसताना ही तुमचे , तुमच्या मुलांचे अपमान केले जातात. तुम्हाला हिणवलं जातं ही समाजाची मानसिकता आहे. “तुम्ही काय करता?” “किती पैसे मिळतात?” हे प्रश्न “तुम्ही कसे आहात?” यापेक्षा जास्त मोलाचे आहेत.

माणुसकी वगैरे तर फारच दूरच्या गोष्टी राहिल्या . एखादी व्यक्ती वाईट प्रसंगातून जात असेल तर नातेवाईक तिच्या पासून दूर जातात. तिची चौकशी केली जात नाही. अशावेळी असे नातेवाईक असण्यापेक्षा पारखून कमावलेली मैत्री कितीतरी पटीने श्रेष्ठ ठरते. असो! हा मानवी स्वभाव आणि सामाजिक मानसिकता आहे.

यातून आपण कसं वागायचं नाही हे शिकायला मिळतं. अर्थात ज्याला चांगलं वेचायचं आहे तो शिकतोच. कोणी वाईट वागलं तरीही वेळप्रसंगी आपण त्याच्याशी चांगलं वागायचं असतं हा एवढा समजूतदारपणा आणि प्रगल्भता आपल्याला अनुभवातून येते.

माणसाच्या माणूसपणाला महत्व द्यायला शिकतो आपण. त्याने कमावलेल्या पैशाला नाही. फक्त पैशाला महत्त्व देणारे आणि मैत्री करणारे जवळीक साधणारे हे असतातच की. उलट अशीच माणसं जास्त असतात.

पण आपण माणूसपण जपायचं आपलंही आणि इतरांचंही. यालाच आजच्या आधुनिक स्टेटस च्या युगात “इमोशनल फुल” म्हणत असावेत. पण हे मान्य करूनही आपण संवेदनशील , सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःमध्ये बदल घडवायचा.

स्वतः आयुष्यात कशाला प्राधान्य द्यायचं हे आपण ठरवायचं. दुसऱ्यांनी आपल्यासाठी बदलावं हा अट्टाहास न बाळगता स्वतःसाठी स्वतःला बदलायचं . आयुष्य भरभरून आनंदाने जगायचं . हो ना!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “जे चांगलं आहे, फायद्याचं आहे..ते वेचता आलं पाहीजे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *