म्हंटलं ना , रोजचा दिवस नवा असतो.
स्मिता जोगळेकर.
रिक्षात बसले. बँकेसमोर रिक्षा सोडली. मीटर पाह्यलं. सुट्टे आठ रुपये सुद्धा त्याचा हाती दिल. ते त्याने मीटरला टेकवले, कपाळाला लावले. त्याच्या थैलीत टाकले ” छुट्टेका ही वांधा रहता है ”
म्हंटलं बँकवालोंके पासभी छुट्टा नही मिला तो तो गलत बात हो गई ना !
तो हसला.
पुढचा प्रश्न आला “ये सरकारी बँक है क्या ?”
म्हंटलं “बिलकुल सरकारी है”
“डुबेगा नही ना !”
हसत म्हंटलं “सवाल ही नही”
मग त्याला खाता खोलायची सगळी माहिती दिली. उद्या येतो कागदपत्रं घेऊन. जितेंद्र नवा वूड बी कस्टमर रिक्षा भुर्र्कन सुरु करून गेला.
साहेबाला म्हंटलं कॅन्व्हासींग करत होते म्हणून अडीच मिनिटं उशीर झाला. साहेब हसला.
दुपारी एक आजी आल्या. पालिकेतून सफाई कर्मचारी म्हणून रिटायर झालेल्या. त्यांच्या सोबत तिशीची एक बाई. बाईने आजीना सांगितलं “पाच हजार काढ”
आजीनी कीडमिड्या अक्षरात सही केली. मी पैसे दिले. तिशीची बाई पासबुक भरायला गेली , आजी मला म्हणाल्या ” पेन्सल ( पेन्शन )चे पैसे आहेत ताई , पण काय करणार मुलीच्या मुलीला कशाला तरी हवेत ,मग ही मागे लागली. काहाडून दिले , काय करणार ” आजीच्या डोळ्यात पाणी होतं.
वाईट वाटलं , आजींचे कष्टाचे पैसे . हे पैसे देताना आजी फारश्या खुश नव्हत्या.
मी अनाहूत सल्ला दिला , आजी कधीतरी थोडेफार दिले तर ठीक आहे बाकी आपला पैसा आपल्यासाठी ठेवायचा बरं का , सगळी झोळी खाली करायची नाही . ती झोळी आहे तोवर आपला मान आहे , लक्षात ठेवायचं.
पैसे कपाळाला टेकवत ओल्या डोळ्यांनीच आजी दाराकडे गेल्या.
कपाळाला टेकवला जाणारा प्रत्येक रूपया वेगळी कहाणी निराळे संदर्भ घेऊन येतो. माणसातला माणूस उलगडून जातो.
खूप सांगायचं असतं. खूप विचारायचं असतं माणसाला. ऐकणारा , उत्तर देणारा हवा असतो माणसाला.
हंsss, माणूस माणूस. कधी अनपेक्षित कधी खूप परिचयाचा… क्षणोक्षणी भेटतो .
माणूस.
विचार करायला , नात्यांचे अर्थ उलगडून बघायला भाग पाडतो .
म्हणूनच आवडतो ………माणूस.??


