Skip to content

स्त्रियांनो, संसारातला ‘Happiness’ एक्टिव्ह करूया…

“बदल… स्वीकार” भाग १


ज्योत्स्ना शिंपी


आज माझ्या जिवलग मैत्रिणी चा फोन आला. तिचा सूर जरा नाराजीचा होता. मी म्हणाले, काय झाले? सगळे ठीक आहे ना? आज तर सुट्टीचा दिवस आहे. निवांत असशील. त्यावर तिच्या मनातले तिने भराभर बोलायला सुरुवात केली, जसे काही तिला तिच्या मनातले ऐकणारा कुणी श्रोता हवा होता. आणि मी ही हे कार्य यथाशक्ती पार पाडले.

माझी मैत्रीण एक आदर्श गृहिणी. सगळे काही टापटीपपणे वेळेवर चांगल्या रीतीने पार पडले पाहिजे असा अट्टाहास असलेली. धुणी भांडी करायला मोलकरीण आहे पण त्या व्यतिरिक्त ही भरपूर कामे असतात. ती जरा वैतागलेलीच होती. नवऱ्याकडून पूर्ण मोकळीक आहे, कुठलीच बंदी नाही आणि इतरही अनेक बाबतीत ती म्हणेल ती पूर्व दिशा असे म्हणायला हरकत नाही. सगळे लाड होतात, तरी पण तिची चिडचिड होती. मी तिचे सगळे ऐकून घेतले. थोडे समजावले. नंतर ती जरा नॉर्मल झाली आणि आमचे संभाषण थांबले.

पण आता माझे विचारचक्र सुरू झाले. असे काय कारण असेल तिच्या वैतागण्याचे, चिडचिड करण्याचे? मी आणि ती खूप जिवलग असल्याने तिचा स्वभाव चांगल्या रीतीने ओळखते नि तसेच तिच्या नवऱ्यालाही ओळखते. त्यांच्या लग्नाला १९ वर्षे झाली आहे. आणि जशी लग्नाची वर्षे वाढत चालली तशी चिडचिड वाढत गेली.

तिच्या वैतागाची, चिडचिडपणाची कारणे शोधली तर मला जाणवले की…

१. तिचा सर्वांना खूष ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न,

२. टापटीपपणाचा अट्टाहास,

३. आदर्श गृहिणी ची चुकीची संकल्पना,

४. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे झाले पाहिजे आणि आपण म्हणजे बरोबर हा दुराग्रह

५. नवऱ्याचा quality वेळ न मिळणे

६. नवऱ्याचे मित्रमंडळ बैठकी , ड्रिंक्स पार्ट्या थोड्या जास्त प्रमाणात वाढणे

७. मुलाचे अभ्यासावर लक्ष नसणे

८. थोड्या प्रमाणात स्वभाव नि स्वतःचे मर्यादित विश्व, नकळतच तयार झालेला comfort zone…

वरील गोष्टींची कारणमीमांसा करताना मला काही गोष्टी सुचवाव्या वाटतात. अर्थात हा सल्ला नव्हे तर स्वानुभवातून, निरिक्षणातून, वाचनातून मिळालेल्या जादुई गोष्टी आहे जे आपल्याला नि आपल्या आयुष्याला आनंदी करते.

इथे उदाहरणादाखल माझ्या मैत्रिणीची अडचण घेतली आहे, जी सामान्य गृहिणी आहे पण थोडयाफार फरकाने प्रत्येक स्त्रीला यापैकी काही ना काही तरी अडचणी असतात. त्या अडचणी सोडवण्याच्या त्या त्यांच्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न हे करत असतात कारण प्रत्येकाला आपला संसार प्रिय असतोच.

खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करता आले तर, चांगल्या प्रकारे, प्रत्येक स्त्रीला त्याचा फायदा होईलच अशी माझी खात्री आहे.

१. स्वतः आनंदी राहा…

सर्वप्रथम स्वतः खूष राहा. स्वतःचा आनंद शोधा. तुमचा आनंद तुमच्यावर अवलंबून आहे. आपल्या आनंदाची स्वतः जबाबदारी घ्या. पुन्हा एकदा लहान व्हा नि आठवा की कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद द्यायच्या, हसवायच्या, खूष ठेवायच्या.

खरं बघितलं तर आनंद हा लहान लहान गोष्टींतच लपला आहे. हो, लपला आहे !! आणि आपण त्याला मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये शोधत असतो.

आपण आनंदी असलो तर आपल्या शरीरावर, मनावर, आत्म्यावर त्याचे सकारात्मक परिणाम होतात तसेच आपले आजूबाजूचे वातावरण ही आनंदी दिसते. आपण आपल्या आसपासच्या लोकांना आनंद देण्याचा आनंद घेऊ शकतो नि आपला आनंद द्विगुणित होतो. आहे ना जादुई शक्ती !!! तसेच स्वतःसाठी खास थोडा वेळ राखून ठेवा नि आपले छंद जोपासा नि आनंद मिळवा.

२. आदर्श गृहिणी ची चुकीची संकल्पना खोडा…

आदर्श गृहिणी, टापटीपपणाचा अट्टाहास करू नका. कामाची योग्य विभागणी करून जास्तीच काम इतरांवर सोपवा. सगळ्यांना प्रेमाने स्वावलंबी बनवा. कामाचे व्यवस्थित नियोजन करा. सरावामुळे कामाचा वेग रोज थोडा थोडा वाढवा. आदल्या दिवशी नियोजन
केल्यामुळे सगळी कामे वेळेवर होतात. आणि एखादा दिवस नाही झाले तरी काही बिघडत नाही. ही काही स्पर्धा नाही. तसेच, प्रत्येक स्त्रीने जाणीवपूर्वक स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेत पोषक नि पूरक आहार वेळेवर घ्यावा.

३. मुलांची योग्य वाढ करणे…

मुले असतील तर वैयक्तिकरित्या मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक नि भावनिक वाढीकडे नि प्रगतीकडे लक्ष पुरवणे. वेळोवेळी परिस्थितीनुसार बदलणाऱ्या त्यांच्या गरजा जाणीवपूर्वक चिंता न करता योग्य त्या प्रकारे पूर्ण करणे. मुलांना सुरवातीपासून अभ्यास म्हणजे शिक्षा न वाटता त्यामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून ते स्वतःहून अभ्यासात रुची घेऊन चांगली प्रगती करतील आणि आपला ही अभ्यास घेण्याचे कष्ट नि वेळ वाचेल. आपले फक्त योग्य लक्ष ही पुरेसे ठरेल. मुलांचे लाड पुरवत असताना त्याकडे नि आपल्या वागण्यात समतोल ठेवावा आणि त्यासोबत त्यांना कौतुकाने, प्रेमाने स्वावलंबी आणि जबाबदारीची जाणीव करून देणे. प्रत्येक पालक आपल्या मुलांना जीवापाड प्रेम करतात. ते प्रेम मुलांसमोर व्यक्त करावे जेणेकरून त्यांना उमेद, उभारी, आत्मविश्वास नि पुढील आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य मिळेल. तसेच महत्त्वाचे म्हणजे मुलांची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. एकमेकांसोबत quality वेळ घालवणे…

लग्नानंतरची सुरवातीची वर्षे खूपच छान नि सुंदर असतात. पण जसजशी वर्षें लोटतात, त्या फक्त आठवणी बनून राहतात.
सुरवातीचे प्रेम हळूहळू ओसरू लागते. माझ्याच मैत्रिणीचे उदाहरण घ्यायचे तर नवरा खूप प्रेमळ आहे. जे पाहिजे ते मिळते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मिळते. फिरायला, नाटक, सिनेमा पाहायला घेऊन जातो. मित्रमंडळींकडे, नातेवाइकांकडे पण घेऊन जातो, तसेच हॉटेल, शॉपिंग सगळं काही आहे. तरी पण ती मनातून आनंदी नाही म्हणजे काहीतरी कमी, कमतरता, पोकळी जाणवते.

तो शोधण्याचा प्रयत्न केला तर जाणवले की भौतिक सुखं आपणास थोडाच वेळ आकर्षित करतात. तिला नवऱ्याचा quality वेळ पाहिजे आहे. व्यक्त प्रेमाची गरज वाटते आहे. quality वेळ हा रोजचा अर्धा किंवा एक तास ही पुरेसा आहे पण तो तिचा हक्काचा असेल ज्यावेळी ती त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअरिंग करू शकत नि आपले मन मुक्तपणे मोकळे करू शकेल. एकमेकांनी एकमेकांच्या प्रेमाविषयक गरजा समजून घेऊन त्यानुसार त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे.

परंतु या उदाहरणामध्ये मला जाणवते की याबाबतीत बायकोलाच पुढाकार घ्यावा लागतो नि तसे घ्यायलाही पाहिजे.

लग्नानंतर नवऱ्याला भरपूर वेळ देणारी त्याच्या सर्व इच्छांचा मान ठेवणारी, त्याची आवडनिवड जपणारी, त्याचे सगळं मनापासून ऐकणारी ती कुठेतरी हरवून जाते. संसार वाढत असताना मुलं, सासू, सासरे, नातेवाईक सगळ्यांकडे लक्ष देताना ती तिचा प्राधान्य विसरते किंवा तिला मुळी वेळच मिळत नसतो किंवा ती रोजची दैनंदिन काम करूनच दमते. इथे ही सगळी कारणे थोडयाफार फरकाने रोजच घडत असतात आणि हळूहळू त्यांच्यात शारीरिक, मानसिक नि भावनिक दुरावा निर्माण होते.

तसेच लहानसहान गोष्टीवरून सगळ्यांसमोर टीका,टोमणे मारणे हे तर चुकीचे आहे.त्यामुळे मन नाराज होऊन कलुषित होते. नवरबायकोने आपले वाद बेडरूम मध्ये एकांतात मिटवावे ना की चारचौघात. कुणीही कोणाला कमी न लेखता सामंजस्याने तोडगा काढावा. हल्ली कामानिमित्त नवरा बायको बराच वेळ बाहेर असतात त्यामुळे जो काही थोडा वेळ मिळतो तो भांडणात घालवला तर घरात आनंद नि शांती राहणार नाही.

प्रत्येक स्त्रीला थोडेसे बदलावे लागते. बदल हा चांगल्यासाठी आहे याची जाणीव झाली तर बदलासाठी करावयाचे प्रयत्न त्रासदायक ठरत नाही. प्रत्येक स्त्रीला आपले म्हणणे योग्य वेळी, योग्य ठिकाणी मांडता आले पाहिजे. घरी आल्या आल्या तक्रारींचा पाढा वाचला तर कुणालाही आवडत नाही. नवरा संध्याकाळी घरी आल्यावर छान तयार होऊन हसतमुखाने स्वागत केले, गरमागरम चहा देऊन त्याच्याजवळ बसून चहाला सोबत दिली तर त्याला फारचं छान वाटते. त्यासाठी कामाचे थोडे नियोजन केले तर हे सहज शक्य आहे. नवऱ्याला प्राधान्य द्या, महत्त्व द्या, त्याच्या अवडीनिवडी तो स्वतः सांगणार नाही. त्याच्याशी झालेल्या संवादातून तुम्ही त्या सहज जाणू शकतात. ती कला शिकून घ्या. त्याच्या आवडीचा मान ठेवा. त्याला खूष ठेवा.

आता तुम्ही म्हणाल, पहिल्या मुद्यात तर सांगितले की स्वतः खूष राहा. खरे आहे, तुम्ही खूष राहिले तर हे सहज शक्य आहे. आणि जर का तुमचे प्राधान्य स्वतःचा आनंद नवऱ्याकडून प्रेम मिळवणे असेल तर त्याला खूष ठेवण्याचा प्रयत्न तरी करा पण अपेक्षा ठेवू नका. विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही नवऱ्याला खूष ठेवतात तेव्हा तो तुम्हांला कितीतरी पटीने खूष ठेवतो आणि त्यात जर नवरा प्रेमळ असेल तर मग मज्जाच आहे. नवऱ्याची ताकद बना ना की कमजोरी जेणेकरून नात्याला चांगली बळकटी मिळेल.

तसेच घर म्हटलं तर विचारांची तफावत, वाद, भांडणे होणारच. अशा वेळी शब्दाने शब्द वाढतो नि त्याचे पर्यावसन नको त्या गोष्टींत घडते. अशा वेळी सोपी पण करायला अवघड गोष्ट म्हणजे शांत राहणे. तुमची बाजू जरी खरी, न्यायकारक असेल तरी थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर योग्य प्रकारे मांडणे तेव्हाच त्याचे परिणामकारक नि अचूक निकाल मिळतात. समोरच्याची चूक त्याला न दुखावता योग्य शब्दात मांडता येणे तसेच त्याला समजावता येणे की जरी तुझे बरोबर असले तरी या परिस्थितीत अशा पद्धतीने केले तर योग्य होईल नि सगळेजणच खूष होतील. आपले मत कधी, कुठे, कसे नि केव्हा मांडायचे ही कला आपण शिकून घेतली पाहिजे.

माझ्या प्रिय मैत्रिणींनो, लग्नाला काही वर्षे लोटल्यावर एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे या ना त्या कारणाने कमी होते आणि दोघे एकमेकांना गृहीत धरतात. तरी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा, आपल्या प्रिय व्यक्तीवर भरपूर प्रेम, जमेल तसे, आवडेल तसे व्यक्त करा, प्रेमात खूप शक्ती, आनंद नि ऊर्जा आहे. एकमेकांचा आदर करा, काळजी घ्या, सहकार्य करा, मनापासून लहान लहान गोष्टीचे कौतुक करा नि ते तुमच्या शब्दातून नि कृतीतून जाणवू द्या. त्यामध्ये खूप जादुई ताकद आहे.

एकाद्या रोपाला पण रोज काळजी घेतली तर ते छान वाढते, फुलते नि बहरते तसेच तुम्हांलाही आपल्या महत्त्वाच्या, आवडत्या व्यक्तीची रोज काळजी घेतली पाहिजे. एक व्यक्ती म्हणून जरी तुम्हाला खूप भूमिका निभवाव्या लागत असेल तरी आपल्या लाईफ पार्टनर कडे दुर्लक्ष करू नका. Treat ur husband like a King, you will automatically be treated as a Queen.

आयुष्य खूप सुंदर आहे नि मानवी जन्म बहुमूल्य… भरभरून, मनसोक्त, मोकळेपणाने आनंद घ्या, जगा, उपभोग घ्या. खूप खूप शुभेच्छा…..??????



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!