
भित्यापाठी ब्रह्मराक्षस!
‘ओम, आवाज कमी कर, ऐकू येतंय का? आवाज कमी कर टीव्हीचा. सारखं कार्टून कार्टून, असाईनमेंट नाहीये का? बंद कर टीव्ही आणि अभ्यासाला बस.’
‘काय झालं श्री? बरं वाटत नाहीये का? सांगत होते, गरम पाण्याने आंघोळ कर, पण ऐकलं नाहीस. शॉवर घेऊन आलास, तरी डोकं थंड झालं नाही का? बरं, मी पटकन चहा घेऊन येते. तू डोळे मिटून पडून राहा जरा, बरं वाटेल.’
‘कशाला रे श्रीरंगा पोरावर ओरडलास? बिचारा दिवसभर त्या ऑनलाइन शाळेत आणि शाळेनंतरही अभ्यासात गढलेला असतो. आता कुठे त्यानं टीव्ही लावलांन, तर तुझ्या ओरडण्याने तोंड बारीक करून निमूटपणे गॅलरीत जाऊन बसला बघ. आपण आपला राग पोरांवर काढतो, त्यांनी कोणावर काढायचा? गेले कित्येक दिवस पिंजऱ्यात कैद केलेल्या पाखरांप्रमाणे झालीय त्याची अवस्था. अशी नाही चिडचिड करू….’
‘आई अगं….’
‘गरम चाsssय. श्री घे….आई घ्या. मस्त चहा पी, बरं वाटेल आणि काय झालं, सांग बरं आता.’
‘आमच्या कंपनीत एक जण पॉझिटिव्ह निघालाय.’
‘ओह…आय सी. तुम्हा सर्वांना पण टेस्ट करायला सांगितलीये का?’
‘नाही अजून. तशी वेळ येणार नाही बहुतेक, कारण तो वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत होता. तसा प्रत्यक्ष संपर्क आला नाही, पण काय सांगावं? उद्या टेस्ट करा म्हटलं की करायची. पण त्याची नुसती बातमी कळली आणि धडकी भरली. आतापर्यंत कोरोनाची एवढी भीती वाटत नव्हती, पण आज जणू काही संकट दारात येऊन उभं राहिलं, असच वाटतंय.’
‘अरे श्रीरंगा, वाटायचं काय, ते कधीच आलंय. आपल्या बाजूच्या बिल्डिंगमधले माधव काका, त्यांनाही आज चाचणीसाठी नेलंय म्हणे. माझ्या मंडळातल्या देसाईंचा फोन होता.’
‘हो ना, माझ्या पण ऑफिसमधल्या एका कलीगच्या मिस्टरांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.’
‘तुम्ही दोघी हे सांगताना किती थंड रिऍक्ट होताय. तुम्हाला भीती-बीती काही नाहीच का? ‘
‘अरे, असं काय करतोस, आता काय आम्ही टीव्ही रिपोर्टर सारखं रिऍक्ट व्हायचं की काय?’
‘कमाल आहे तुमची. एवढं मोठं संकट दाराशी आलंय आणि तुम्ही चहाचे घोट घेत सहजतेने बोलताय.’
‘श्रीरंगा, एवढं मोठं संकट झेलण्याची आपली ही पहिली वेळ नाही. याआधीही बऱ्याचदा सराव झालाय. संकटाचं स्वरूप बदललंय इतकंच. आपण योग्य ती सर्व काळजी घेतोय. तुला बाहेर जाणं भाग आहे आणि आम्हाला घरात थांबणं. आपापल्या आघाडीवर आपण लढा देतोय, मग आणखी काळजी काय करायची?’
‘आई, अगं वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. लोकांचे अनुभव वाच, लक्षात येईल.’
‘श्री, आम्ही घरी असलो, तरी सगळं वाचतो, पाहतो, अनुभवतो. पण एखाद्या गोष्टीचा बागलबुवा करून दडपणाखाली जगण्यात तरी काय अर्थ आहे? मी तर ओम ला सुद्धा सगळं नीट समजावलं आहे. देव न करो, पण उद्या काही कारणाने माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर घाबरून जायचं नाही, थोडे दिवस वेगळं राहिलो की आजार लवकर बरा होतो. पण, सध्या त्याने आणि आजीने जास्त काळजी घेतली पाहिजे. हे आणि असं बरंच काही सांगून, समजवून ठेवल्यामुळे त्याच्या मनात असलेली भीती घालवली. आता नाही त्याला टेन्शन येत. हं, फक्त तू ओरडलास की घाबरतो बिचारा…’
‘अगदी बरोबर बोललीस. काय भ्यायचं त्यात? सुख, दुःखं, उद्विग्न, चिंता आपली वाट बरोबर शोधत येतात. चांगल्या गोष्टींचं स्वागत करायचं आणि वाईट गोष्टी आपल्या कुवतीप्रमाणे थोपवून धरायच्या. या पलीकडे आपल्या हातात काहीही नाही. संकटातून पळ काढायचा, की त्याला सामोरं जायचं, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आणि म्हणतात ना, भित्यापाठी ब्रह्मराक्षस!
तुला एक गंमत सांगते रंगा…
एका माणसाला ज्योतिषाने सांगितलं, सध्या सांभाळून राहा, तुमचा कार अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणजे होईलच असं म्हटलं नव्हतं, पण होणार नाही याचीही खात्री दिली नव्हती. तो माणूस ज्योतिषाने सांगितलेल्या कालावधीत अजिबात घराबाहेर पडला नाही. आणि एक दिवस आपला वाईट काळ संपला, या आनंदात घराबाहेर पडणार, तोच नातवाची खेळण्यातली कार त्याच्या पायाखाली आली आणि तो घसरून पडला. उठला, तो थेट हॉस्पिटलात! म्हणजे झालाच की कार अपघात…
आहे की नाही मजेशीर?
अरे, जे व्हायचं ते होतंच रंगा आणि जे संकट टळणार असेल, ते जवळ येऊनही स्पर्श न करता निघून जातं. अशा वेळी फक्त धैर्याने, संयमाने वागायचं आहे. रागराग, चिडचिड करून नाही, कळलं?’
‘हो माते कळलं. तुम्ही दोघींनी जणू त्या कोरोनाला बासनातच गुंडाळून टाकला आहे. काहीही असो, पण बोलून खरंच स्ट्रेस फ्री झालो. इस बात पे और एक कप चाय? बरं बरं, लगेच डोळे काढू नका.
राहिलंsss! ओमsss इकडे ये बाळा, तुझं ते मोटू-पतलू कार्टून लाव ना, आपण दोघ बघू.’
अशा तऱ्हेने चहाचे कप रिते झाले आणि कपातले वादळही हळुवार शमून गेले.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??

