Skip to content

तुम्ही सुद्धा जोडीदारासोबत ‘असुरक्षितता’ अनुभवताय का??

का ❓ कशासाठी ❓ कोणासाठी ❓


डॉ. शर्मिला चालवाडी


आता एकमेकांशी शेअरिंग करणं टाळलं जात आहे. जवळच्या व्यक्तीशी आपण संवाद साधण्यास कंटाळतोय. एकेकाळी ती व्यक्ती ऑनलाईन नसेल आली लवकर तर जीव कासावीस व्हायचा, अन् आतातर त्या व्यक्तीला टाळण्यासाठी आपण ऑफलाईन जातोय.

आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलणं व्हावं म्हणून आपण कितीतरी खटाटोप करायचो. कामात बिझी असूनही फक्त त्यांच्यासाठी ॲव्हलेबल होत होतो. कधी झोपमोड करुन घ्यायचं, कधी जेवण करायचं विसरायचं तर कधी जाणून बुजून कामांकडे दुर्लक्ष करून त्यांना वेळ द्यायचो. आज फ्री वेळेत पण त्या व्यक्तीला थोडासा वेळ देऊ वाटत नाही. जर समोरची व्यक्ती तुमच्यासोबत बोलली नाही काही वेळ तर हरकत काय? असं तुम्हाला वाटतं पण ती तुमची वाट पाहत असते.

कदाचित त्या व्यक्तीकडे खुश राहण्याचं कारण तुम्ही एकटेच असाल. आपल्यासाठी हे प्रेमाचं नातं खुप महत्त्वाचं आहे. कारण एकदा एखादं नातं विस्कळीत झालं तर ते पुन्हा पहिल्यासारखं होऊ शकत नाही, आणि जरी झालं तरी ते फक्त आपलं समोरच्या व्यक्तीच्या प्रेमापोटी असेल. नात्यात मग औपचारिकपणा येतो. आपल्यात मतभेद नको म्हणून एकमेकांशी शेअरिंग करणं टाळलं जातं. शेअरिंग टाळलं की एकमेकांत न बोलण्याचा दुरावा निर्माण होईल.

आपण टोकाची भूमिका ही नाही घेऊ शकणार कारण आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायचं आहे. माणसं दूर राहू लागली ना की ती भावना दाखवायचं सोडून देतात आणि खुप शांत होतात.

“कोणाला मिळवणं म्हणजे प्रेम नाहीये तर कोणाच्या मनात आणि आयुष्यात जागा मिळवणं म्हणजे प्रेम आहे.”

“भावनांशिवाय प्रेम नाही,
प्रेमाशिवाय तू नाही,
तुझ्याशिवाय मी नाही,
आणि तुझ्यावर माझ्यापेक्षा
जास्त प्रेम करणार या
जगात दुसरं कोणीच नाही.”

हा आपला स्वत:वरचा आत्मविश्वास खुप महत्त्वाचा आहे. जेव्हा कोणी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपण आहे तसं स्वीकारुन येतात. तुम्हाला बदलून तुमच्यावर प्रेम करायचं नसतं, पण का कोणास ठाऊक एकमेकांच्या मोकळीकतेचं आपण गैरसमज करुन घेतो.

आपण आपल्या व्यक्तीसोबत वेळ घालवलेला नसतो त्यामुळे आपण इतक्यात त्यांना पूर्ण ओळखत नसतो. ती व्यक्ती तुमचा इगो दुखावू नये म्हणून स्वत:शी झगडत असते. आपण नको त्या गैरसमजुतीमुळे आपल्याच खास, जवळच्या व्यक्तीबद्दलचं मत बदलतो. जसा भूतकाळ तुमचा असतो तसाच तिचाही असतो. तुम्ही मात्र मनासारखं, स्वत:ला हवं तसं वागायचं आणि तिने एखादी छोटीशी गोष्ट जरी केली तर तिच्यावर तुम्ही चिडता, नाराज होता, बोलनं बंद करता, त्यांना टाळता.

आपल्याला ही समजतं कुठे कोण चुकत आहे तरी पण आपण स्वत:हुन बोलायचं विचारही नाही करत. अहो बोलत जा जरा, बोलल्याने गैरसमज दूर होतील कारण एका दृष्टीने तुम्ही फक्त एकमेकांसाठी उत्तम आहे म्हणून तर तुमची व्हेवलेंन्थ जुळली आहे.
कोणाचा विश्वास बसत नाही पण जगात अजूनही असे काही लोक आहेत. जे समोरच्या व्यक्तीला कधी दुखावत नाहीत आणि दुखावण्याचा विचारही नाही करत ना कोणाला त्रास देतात.

माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये ह्याची ते नेहमी काळजी घेतात, जरी काही गोष्टींमुळे स्वत:ला त्रास झाला तरी हरकत नाही. ह्या अश्या लोकांच्या भूतकाळात त्यांनी खुप भोगलेलं असतं, जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यागलेल्या असतात. ज्यांना कधी वाटलेलंही नसतं परिस्थिती, वस्तुस्थितीसोबत आपणाला ही बदलावं लागेल तेही लोक बदलतात.

भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा, अनुभवाच्या आधारे असे लोक स्वत:त एक वेगळं जग निर्माण करत असतात. हे लोक कोणाकडे हट्ट नाही करत ना कशाची जबरदस्ती. कधी त्यांना काही हवं असलं तरी तुमच्या मुडप्रमाणे स्वत:ला बदलतात. आपल्याला नाहीच कळत ह्या सगळ्या गोष्टी कारण आपण आपल्या परीने विचार करतो. शक्यतो अश्या लोकांकडून चुका होण्याचे चान्सेस खुप कमी आहेत. पण तरीही आपण सोडून दिलेलं बरं, आपल्या टोकण्याने आपलं माणूस दूर गेला तर?

माणूस आहे हो चुकणारचं कधी ना कधी, आपलं जवळचं माणूस लांब असल्यावर थोडी असुरक्षिततेची भावना निर्माण होणारचं. आपल्याला सगळं कळतं तरी पण आपण समोरच्या व्यक्तीचा थोडाही विचार न करता निर्णय घेऊन बाजूला होतो. जीवापाड प्रेम करणारी माणसं ह्या जगात खुप कमी आहेत, जपा त्यांना स्वत:साठी. काही गोष्टींसाठी स्वार्थी असायला हवं. अशी लोकं समोरच्या व्यक्तीला पुर्णतः स्वातंत्र देतात. स्वत:चा विचार करण्याऐवजी दोघांचाही विचार करतात. त्यांना तुम्हाला खुप प्रश्न विचारायचे असतात पण तुम्ही गैरसमज करून घ्याल म्हणून ते तो विषयंच डोक्यात येऊ देत नाहीत.

कधी कधी वाईट कर्मामुळे दुःख भोगावे लागते असं नाही, तर अति चांगलेपणाची आणि समजुतदारपणामुळे ही किंमत मोजावी लागते. ह्या लोकांना आपल्या समजूतदारपणाच्या नात्यात थोडा तरी वेडेपणाचा समजूतदारपणा हा दोघांतही असतो पण तुम्ही त्याला तितकसं महत्त्व देत नाही आणि ती लोक त्या समजूतदारपणापेक्षा वेडेपणाला महत्त्व देतात. कारण ह्याच छोट्या-छोट्या गोष्टींमुळे आपण एकमेकांशी बांधील व एकरुप राहू शकतो.

एखाद्या गोष्टीचा जबर मानसिक धक्का बसला तर ती व्यक्ती इतरही बऱ्याच गोष्टींना घाबरू लागते. कोण कसं आहे ह्यापेक्षा एकमेकांच्यात Mutual Respect असणे पण फार महत्वाचे आहे. एकमेकांच्या वागण्याबद्दल, स्वभावाबद्दल, एकमेकांबद्दल आदर-विश्वास पण असायला हवा. कोणतेही नातं टिकवायचा असेल तर कधी नात टिकवण्यासाठी कमीपणा घ्यावा लागतो, काही वेळा चूक नसताना चूक मान्य करावी लागते ते आपल्या अनमोल नात्यासाठी महत्वाचं असतं.

लोभाने जवळ आलेल्या व्यक्तीपेक्षा माणुसकीने जवळ आलेल्या व्यक्तीला जपा. दिसतं तसं नसतं त्यामुळे मनाने निरागस, निर्मळ व्यक्तींसोबत अन्याय नका करु. तुमच्या एका कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत शून्य होऊन जाते.
“एकदा त्यांच्यावर विश्वास ठेऊन, त्यांच्या हातात हात देऊन पहा, कशाचीही उणीव भासणार नाही.” असे लोक जेव्हा कोणाला मनापासुन जपायला लागतात ना तेव्हा स्वत:ला गमावून, स्वत:च अस्तित्व विसरुन तुमच्या सुख-दु:खात हरवून जातात. नका त्या व्यक्तीला स्वत:पासून दूर करु, त्या व्यक्तीसाठी तुम्ही सर्वस्व आहात.

ती व्यक्ती तुमच्यावर निष्पापपणे विश्वास ठेवतेय त्यामुळे “जा आणि त्या व्यक्तीचा हात हातात घेऊन त्यांना सांगा, जे झालं ते सगळं विसरून नव्याने नात्यात आनंद निर्माण करु. तुमच्या नकळत ती वाट पाहतेय तुमची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या आपलेपणाची, तुमच्या प्रेमळ मायेची. हातात हात देऊन विश्वास द्या शपथा नको कारण शपथा पाळणं कधी कधी जमत नाही पण विश्वास आयुष्यभर आपल्या व्यक्तीसाठी जगण्याची प्रेरणा देतं.”

#SharmilaS_Diary



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!