
लव्ह ऍट फर्स्ट साईट
मीनल महेश झवर
(चित्रकार)
मला वाटतं सगळ्यांच्या आयुष्यात सगळं काही फिल्मी वाटावं तसं एकदा तरी घडतं , आज सगळं काही फक्त आपल्यासाठीच होतंय असं वाटतं , प्रत्येक क्षणात काहीतरी जादू झाल्यासारखी,आणि ते जादुई क्षण नेहमी आठवणीत राहतात…
असाच माझा एक अनुभव..
बारावी च्या परिक्षे नंतर आत्या कडे नागपूर ला गेली…माझं गाव एकदम छोटं… नागपूर सारख मोठ्ठं शहर बघणं पण होईल आणि त्यांचाकडच लग्न करून परत येता येईल म्हणून 15 दिवस नागपूरला होती…
१७/१८ वर्षाची मी एकदम बारीक लांब मोठे केस असणारी ठेंगणी आणि बऱ्यापैकी गोरी…खूप कमी बोलणारी मुलींसारखी अजिबात न सजणारी लग्नात मुलींच्या घोळक्यात एकदम वेगळी दिसत होती..सगळ्या बहिणी केसांची स्टाईल वैगेरे करून मिरवीत होत्या…मला समजत नव्हतं कश्यासाठी??
लग्न आटोपलं बाबा आले होते घ्यायला…सगळ्यांना निरोप देऊन मी पहिल्यांदा ट्रॅव्हल्स बस नी प्रवास करणार होती आजच्या 25 वर्ष आधी ट्रॅव्हल्स ने प्रवास म्हणजे खूप मोठी गोष्ट होती..जेमतेम रात्र भराचा प्रवास..
मे महिना असल्यामुळे रात्रीचा प्रवास जड जाणार नव्हता, बाहेरून ट्रॅव्हल्स बघून मला छान वाटत होतं ९ वाजता बस च्या माणसाने सगळ्यांना आत घ्यायला सुरुवात केली..बाबांनी लगेज घेतलं मी माझी छोटी शोल्डर बॅग घेऊन बाबांच्या मागे चढली…
बांधणी चा पंजाबी ड्रेस ,समोरच्या उडणाऱ्या बटा , चेहऱ्यावर गोंधळ आणि थकवा घेऊन मी दोन्ही सीटच्या रो मध्ये उभी राहिली , तेव्हड्यात तिसऱ्या नंबर च्या सीटवर लाल जॅकेट दिसला आणि बघत असतानाच तो चेहरा वर झाला आणि नजर थांबली त्याची माझ्यावर माझी त्याचावर , केस उडत राहिले पाय जागेवरचे उठत नव्हते ती समोरची नजर अजूनही माझ्यावरच होती , सगळं थांबलं होतं ती रात्र तो चंद्र आणि ती नजर…
तेव्हड्यात मागून धक्का लागल्यासारखा झाला बाबा मागेच होते आणि जणू ” पुरी कायनात शिद्दत से पीछे पड जाती है ” झाल्यासारखं त्याच्या बाजूच्या रो मध्ये त्याच्या बाजूच्या सीटवर मला बाबांनी बस म्हंटल…
सगळं ब्लॅंक झाल्यासारखं वाटतं होत आता समजत होत बहिणी का सजत होत्या… मी कधी वेणी कधी ओढणी सांभाळत अंग चोरून बसली…बाहेरचा खिडकीतला चंद्र आणि शेजारचा चंद्र दोन्ही मला हसत आहे असा भास होत होता…पण एकसोबत दोन चंद्र दिसले तर वेड लागणारच ना चांदणी ला…
बस निघाली , छान थंड हवा स्वच्छ चांदण्यांनी भरलेलं आभाळ , निवांत झाली थोडी थोडी सैल होऊन बसली त्यामुळे ओढणी एका बाजूने जमिनीवर पडली, मी शांत मान टेकून बसून राहिली
चोरून त्याच्याकडे बघितलं त्याच्या पायाजवळ एक एअर बॅग ठेवलेली होती लगेज जास्त असावं बहुतेक , कॉलेज ला निघाला होता किंवा घरी चाललेला असावा..
माझ्यासोबत हे सगळं पहिल्यांदा होत होतं.. मनात होणारी धडधड, कोणाकडे बघत राहावंसं वाटण पण हिम्मत होत नसणं,सगळं काही छान, मनात गुदगुल्या आणि पोटात फुलपाखरू उडत होते..खिडकीतून चंद्र, ढग, झाडं सगळे मागं चालले होते आणि माझ्यासोबत पुढे जात होता फक्त तो….
तेव्हा मोबाईल ही भानगड नसल्यामुळे माणसं एकमेक्काना बघत होती, बाहेर बघत होती, झोपत होती आताचा काळ असता तर कोण शेजारी बसलंय माहितीच पडलं नसतं…
“रात्रीस खेळ चाले” तसा खेळ सुरू होता, तो कधीतरी इकडे बघत होता आणि कधी मी चोरून त्याच्याकडे…मध्ये छोटा लाईट असल्यामुळे स्पष्ट काहीच नव्हतं.
दोन तासानंतर चहासाठी बस थांबली, तो उठला आणि त्याचा पाय माझ्या ओढणीवर पडला आम्ही दोघं खाली झुकलो उचलायला, तो इतका जवळ होता माझ्या की थोडं डोक्याला डोकं लागलं,मी पटकन मागे झाली त्यांनी “सॉरी” म्हणत ओढणी माझ्या हातात दिली आणि बस खाली निघून गेला, मी ओढणीला हातात घट्ट पकडून बसली होती, तेव्हड्यात तो खिडकी मध्ये आला आणि बाबांना विचारलं ” अंकल आप चाय लेंगे” बाबांनी हो म्हंटल , माझ्याकडे बघून विचारलं “आप”? मी मानेनेच नाही म्हणत खाली मान केली, त्यांनी खिडकीतून बाबांना चहा दिला …
बस सुरू झाली माझी नजर दाराजवळ अजून कसा आला नाही? कुठे राहिला? लगेज तर इथंच आहे म्हणजे अजून पुढे सोबत आहे मग आला कसा नाही…आणि कमाल वाटत होती माझी मलाच की एखाद्या अनोखळी व्यक्ती ज्याचं नाव पन माहिती नाही त्याच्यासाठी इतका विचार का करावा? इतक्यात तो वर आला आणि माझ्याकडे बघत छान स्माईल केलं जसं काही मी काय विचार करत होती ते त्याला समजलंच होतं…
रात्रीची वेळ आणि थंड हवा बहुतेक सगळेच झोपले होते फक्त आमचा लप्पा-छुप्पी चा डाव चालू होता, खूपदा वाटलं नाव तरी विचारते कुठं राहतो ते तरी विचारते पण हिम्मत होत नव्हती…बहुतेक त्याची पण..
मग माझाही डोळा लागला सकाळी 5 ला बाबाच्या आवाजाने जाग आला ते लगेज काढत होते मी दचकून तिकडे बघितलं तो गाढ झोपला होता, आम्ही उतरतोय हे त्याला कळायला पाहिजे म्हणून माझा पाय तिथून निघत नव्हता , काय करू? कसं उठवू? बाबांची घाई होत होती खाली उतरायची , शेवटी त्याची एअर बॅग त्याच्या पायाजवळ जोरात सरकवली त्याच्या पायाला ती लागल्या मूळे तो उठला आणि आम्ही एकमेकांकडे बघितलं, त्याच्या लक्षात आलं की आम्ही उतरतोय..
तो उठून उभा राहिला माझ्या मनात सुरू होत बोल काहीतरी निदान नाव तरी सांग.. कुठे राहतो ते तरी माहिती पडू दे…अशी नको संपायला ही रात्र…
पण वेळ निघून गेली होती मी खाली उतरली तो खिडकीतून बघत होता..बस हळूहळू पुढे निघत होती आणि मी फक्त ती खीडकी बघत होती.
अचानक त्या खिडकी मधून एक पेपर बाहेर आलं आणि आणि बाय- बाय करणारे हात दिसले, माझ्याचसाठी तो पेपर टाकल्या गेलाय हे समजेपर्यंत तो पेपर बस च्या हवेने लांब उडालं आणि इकडे बाबांनी बस पटकन रिक्षात म्हणून मला आत बसवलं मी बाहेर मान काढून तो पान तो पेपर शोधत होती अचानक मला रडावस वाटतं होतं त्या बस च्या मागे जावसं वाटत होतं…जीव कासावीस होतं होता रिक्षाच्या बाहेर उतरून त्या बस मध्ये जावं आणि परत टाक तो पेपर असं ओरडून सांगावस वाटलं…पण आता खूप वेळ झाला होता…
ती रात्र संपली तो प्रवास संपला बहुतेक त्या स्टोरीचा तोच एन्ड असावा…
पण तो कागद मिळाला असता तर? तो माझ्याचसाठी होता का? खरचं काही लिहिलेलं असणार होत का त्याच्यावर? आणि हातात येऊनही त्याच्यात काही नसतं तर? लिहिलेलं असतं तर स्टोरी पुढे गेली असती का??
आज सूर्य नवीन काहीतरी घेऊन आला होता आज मी एका नवीन मुलींशी बोलत होती…आज पडलेले प्रश्न मला मोठे करून गेले मला जागवून गेले मला दुखवून गेले…
पण प्रेमच होतं का ते? की फक्त आकर्षण…माहिती नाही पण “लव्ह ऍट फर्स्ट साईट” ची ती रात्र आज ही जशीच्या तशी आठवते….
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
.


शब्दांच्या रूपात प्रेम भावना खूप छान पध्दतीने सादर केले
Khup sundar
Mast ch…!!!
लै भारी.
Very nice
खरंच सुंदर खूप सुंदर आहे लेख कधी कधी अस वाटतं पुन्हा ते दिवस यावेत आणि त्याला सां गाव कि नको जावुस मला एकटी ला सोडून