Skip to content

कधी संपणार नाही तुझा वनवास गं !!

कधी_संपणार_नारी_तुझा_वनवास_गं


सरिता सावंत भोसले


प्रियंका रेड्डी…नाव सध्या चर्चेत आहे..सगळ्यांनी ऐकलं असेलच. रात्रीच्या अंधारात एका अज्ञात स्थळी तिची गाडी बंद पडली. एक अनोळखी पुरुष पुढे गॅरेज आहे तिथे सोडतो अस म्हणून मदतीचा हात पुढे करतो. अंधाऱ्या रात्री सामसूम रस्त्यावर कोणीही मनुष्य दिसत नसताना तिला त्या व्यक्तीचा मदतीचा हात म्हणजे आधारच वाटला असावा. कदाचित संकटसमयी धावून आलेला देव किंवा रक्षण करायला आलेला भाऊ तिला त्याच्यात दिसला असावा. तिची गाडी बंद पडली, एक अनोळखी व्यक्ती मदत करतोय हे सगळं तिने तिच्या बहिणीला फोनवर कळवलं होत. रात्रभर प्रियंका घरी पोहचलीच नाही….सकाळी एकेठिकाणी तिचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला. काही अंतरावर तिचे कपडे आढळले. तिच्या गळ्यातल्या लॉकेट वरून तिची ओळख पटली. प्रियांका वर सामूहिक बलात्कार करून तिला पेटवण्यात आलेलं होतं…तिचा मृतदेह, कपडे या सगळ्यावरुन तरी हेच स्पष्ट होत होतं.

ही घटना वाचली आणि मन सुन्न झालं. काही काळ तरी मन,बुद्धी यांचा ताळमेळच बसत नव्हता. पुन्हा निर्भया प्रकरण, कोपर्डी घटना डोळयांसमोर आल्या. अशा बऱ्याच बलात्काराच्या घटना एकएक करून डोक्यात थैमान घालू लागल्या. कधी मुलीने नकार दिला म्हणून तिच्यावर बलात्कार, कधी तिची छेड काढली म्हणून तिने कानाखाली लगावली म्हणून केला बलात्कार, कधी ती एकटी आहे म्हणजे उपभोगायचीच वस्तू आहे…म्हणून केला बलात्कार. कधी स्वतःची वासना शमवावीशी वाटली..समोर सावज आलं म्हणून केला बलात्कार….मग ती तीन वर्षांची छोटी चिमुकली असो की साठ वर्षांची आजी असो पण तीच शरीर हे फक्त उपभोगायचच असत…बलात्कार हा फक्त घराबाहेरच होतो असंही नाही. चार भिंतीआडही हक्काची बायको म्हणून तिला नाही म्हणण्याचा अधिकार नसतोच..तिने नकार दर्शवला तरी जबरदस्ती करून नवरा म्हणून हक्क बजावला जातो…हा असतो समाज मान्य बलात्कार. इथेही तिच्यावर अन्याय होतो, तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराला स्पर्श होतो…तिचा अमानुष छळ होतो पण यासाठी ती कुठे न्याय मागायला जाऊ शकत नाही कारण गळ्यात ज्याच्या नावाच मंगळसूत्र असतं त्यानेच तर हात लावला…यात वावग ते काय ??हा गुन्हा कसा काय??

स्त्री म्हणजे काचेचं भांड…तडा गेला की तीच अस्तित्व संपतच…ती स्वतःहून जास्त, जीवापाड या काचेच्या भांड्याला जपते आणि एक दिवस अचानक कुठूनतरी एक नराधम येऊन हे भांड्याच्या चिथड्या करून, तिला पायदळी तुडवून निघून जातो. खरंच मन खूप हळहळत अशा घटना ऐकल्या,वाचल्या की. यावर खूप मोर्चे निघतात, समाजातून निषेध व्यक्त होतो…टीव्ही माध्यमांवर मग चर्चासत्रे चालतात..कित्येकदा मुलीने चांगली कपडेच नव्हते घातले, ती सात नंतर रात्री बाहेरच का पडली, तिच्यासोबत एक मुलगा होता म्हणजे त्या मुलीचं वागणच चुकीचं असेल, आधी तीच काहीतरी बोलली असेल किंवा शहाणपणा केला असेल…असे बरेच ताशेरे त्या मुलीवरच ओढले जातात. या घटनेतून ती वाचली असेल तर ती कशी जगत असेल याचा विचार केला कधी? तिच्या मनावर काय आघात झाले असतील आणि तिने यातून कस सावराव यावर चर्चा झाली कधी? पुढे तिच्या भविष्यावर या घडलेल्या घटनेचा परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न केला कधी?

इतर वेळी तिच्या सौंदर्यावर फिदा असणारे अशावेळी तिला स्वीकारायला कोणी पुढे आले?? कधी तिचं कुटुंब, तिचे आईवडील कोणत्या मनःस्थितीतुन जात असतील याची पुसटशी तरी जाणीव असते कोणाला?
त्यांची मुलगी एकीकडे मरणाशी झुंज देत असेल किंवा प्रियांका सारखी या घटनेतच ती कायमची निघून गेली असेल अशावेळी त्या मुलीच्या चारित्र्यावरच संशय घेतला जात असेल तर त्यांच्यावर या सगळ्याचा काय परिणाम होत असेल याचा थोडातरी विचार होतो का??? कोर्टात तारीख वर तारीख पडून या केस चालू राहतात…मुलीचं कुटुंब मुलीला न्याय मिळावा म्हणून आतार्यंतची मिळवलेली सगळी तुटपुंजी पणाला लावतं…जीवाचं रान करून न्यायदानासाठी दिवस रात्र झटतात… सरतेशेवटी कितींच्या पदरी तात्काळ न्याय मिळतो हे आपण याची देही याची डोळा बघतोच.

आजपर्यंत कळलं नाही बलात्कारासारखी घटना होते तेव्हा त्यात त्या मुलीचा काय दोष असतो…ती मुलगी म्हणून जन्माला आली हाच दोष का तिचा? आज ती स्वतंत्र झाली,स्वावलंबी झाली,आकाशाला गवसणी घातली… पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करू लागली पण ती म्हणजे केवळ “स्वतःची वासना शमवण्याचं एक स्थान” ही ओळख नाही मिटवू शकली. घरात, उंबरठ्याबाहेर आजही तिच्यावर अन्याय होतोय. अत्याचार करणारा मात्र कधी मोकाट फिरत असतो,कधी फरार होतो,कधी जेलमध्ये जाऊनही माफीचा अर्ज करत असतो,फाशीची शिक्षा सुनावली तरीही स्वतःची बाजू मांडतच असतो..

समाज मात्र अशा नराधमांना,जनावरांना भर चौकात फाशी द्या,जाळून टाका अस ओरडत असतो. पण कायदा याला संमती देत नाही आणि वर्षोनुवर्षे हेच घडत आलं आहे. स्त्री सबला झाली पण तिचा हा वनवास काही संपला नाही.

हे का घडतं आणि पुढे घडू नये यासाठी काय करावं याच द्वंद्व
मनात चालूच असतं…आता मुलींना स्वरक्षणाचे धडेही दिले जातात…त्यांच्या कपड्यांवर उपदेश केले जातात…पण पुरुषातल्या ही वासनाधीन मानसिकता बदलण्याचा किती प्रयत्न होतो? पुरुषांना कितपत उपदेशाचे डोस पाजले जातात?? एक मुलीच्या जीवाशी खेळून तो ताठ मानेने जगतोच कसा??अशा प्रसंगी त्यांना त्यांची आई,बहीण आठवत नसेल का???सगळंच निरुत्तर…..

पहिल्या घटनेतून सावरण्याआधीच पुन्हा कोणत्या तरी निरपराध, निष्पाप मुलीचा या वासनेपायी बळी गेलेला असतो.
माझ्या मनाची जी घालमेल अशा घटना ऐकून होते तशी नक्कीच प्रत्येक

स्त्रीची होत असेल. का,कसं… आणि केव्हा थांबेल याची उत्तरं मात्र मिळतच नाहीत.

कृपया लेख नावासहितच शेअर करावा ही कळकळीची विनंती?.

सरिता सावंत भोसले

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!