Skip to content

इगोला बाजूला ठेवा, मगच मनमुराद आयुष्य जगता येईल!!

इगोला बाजूला ठेवा, मगच मनमुराद आयुष्य जगता येईल!!


विक्रम इंगळे

23 नोव्हेंबर 2019


आयुष्यात मिळणारे यश अणि अपयश ह्यांच्या बर्‍याच व्याख्या आहेत. त्यांचा जसा परस्परांशी संबंध आहे तसा आपल्या जीवनाशी देखील आहे. मिळालेल्या प्रत्येक यशानंतर मनस्थितीत जसा बदल होतो तसाच अपयशामुळे सुद्धा होतो.

पण यश म्हणजे काय! तुम्ही अमुक अमुक ठिकाणी यशस्वी झालात हे प्रशस्तिपत्रक नक्कीच नाही. कुठलंही पदक नाही अथवा कुठलीही ट्रॉफी पण नाही. कारण मला असं वाटतं की अशी प्रशस्तिपत्रके अणि पदकं ही लोकांपुढे तुमच्या यशाचे प्रदर्शन करण्यासाठी आहेत. त्याने तुमचा इगो सांभाळला जाईल. पण नकळतपणे हाच इगो नंतर तुमच्या आयुष्याचे नियंत्रण घेईल अणि पुढील प्रत्येक कृती अणि यश हे इगो जपायला (इगो सेंट्रिक) असेल.

मग यश आहे काय? माझ्या मते यश ही आपल्या मनावर, हृदयावर कोरली गेलेली एक गाथा असावी. एक टप्पा जो माझ्या मनात होता तो मी पुर्ण केलाय हे समाधान असेल. हा केवळ एकच टप्पा आहे, असे अनेक टप्पे मला गाठायचे आहेत ही जाणीव म्हणजे यश असावं!

मनावर एक अनामिक कवच आहे. अणि ते कवच उघडून छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद सापडणं म्हणजे यश असावं!

मला नेहमी असं वाटतं की आयुष्य एक ध्येय असावं. एक ध्यास असावा. उत्तरोत्तर उत्तमोत्तम मिळविण्यासाठी एक प्रयत्न, एक धडपड असावी. ती एक मालमत्ता नसावी. पण दुर्दैवाने आज आपण आपले आयुष्य इगोला आंदण देऊन टाकलयं. अणि आता असं झालंय की यश अणि त्याच्या पाठोपाठ येणार्‍या इगोने आपल्या आयुष्याचा अणि मनाचा मालकी हक्क मिळवला आहे. त्यामुळे माझा अणि मानाचा संवाद तुटलाय. जेंव्हा मी माझ्या मनाशी बोलायचा प्रयत्न करतो तेंव्हा त्या मनातला इगो मला उत्तर देतो. मग इतर लोकांशी संवाद तर लांबच राहिला. त्यांना प्रतिसाद केवळ माझा इगोच देतो.

माझ्या मते आयुष्य एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. एक कंटिन्युअस लर्निग कर्व्ह आहे. आपण पदोपदी काहीतरी शिकत असतो.
आपण जसे आहोत तसे स्विकारायला हवे, हे आयुष्य मला शिकवते.
गोष्टी ज्याप्रमाणे, ज्या पद्धतीने होतात तशाच आनंदाने स्विकारायच्या, हे आयुष्य मला शिकवते.

कुठल्याही गोष्टीवर दांभिकपणाचे आवरण न घालता, मी ह्या अफाट निसर्गाचा एक भाग म्हणून स्विकारायला आयुष्याने मला शिकवले.

आता मी यश डोक्यात न जाऊ देता, मनात ठेवतो. त्यामुळे मला कसलाच माज नाही, इगो नाही. मी आता आयुष्याच्या झुल्यावर मस्त झोके घेतोय. मला खाली पडायची भीती नाही कारण झोके आयुष्य देत आहे. हेच झोके जर माझा इगो देत असता तर फार वर झोका घेऊन खाली पडायची भीती राहिली असती.

मला आता कळलय जीवनात यशस्वी होणे म्हणजे स्वतःला समजून घेणे. आतला मी मला मिळणे. माझ्या आयुष्याचा, माझ्या अस्तित्वाचा अर्थ मला उमजणे म्हणजे यश.

मी काय करतोय, मी काय मिळवले आहे अणि मला काय मिळवायचे आहे ह्याची समज, म्हणजे यश.

ह्या विश्वाच्या अफाट पसार्‍यात मी म्हणजे एक कण आहे. एक नगण्य कण. ह्या सगळ्या पसार्‍यात माझी किंमत काय हे लक्षात येणे म्हणजे यश. ह्या सगळ्या पसार्‍यात स्वतःला जुळवून घेऊन, स्वतःची ओळख निर्माण करणे, म्हणजे यश.

आयुष्य मिळतय म्हणून कसतरी जगायचं नसतं तर समाधानी आयुष्य म्हणजे यश!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

10 thoughts on “इगोला बाजूला ठेवा, मगच मनमुराद आयुष्य जगता येईल!!”

  1. आयुष्य जगायला शिकवणारा लेख आहे ,अप्रतीम….

  2. जीवनाचे सत्य सांगण्याचा सुंदर प्रयत्न

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!