Skip to content

स्वतः पेक्षा इतरांच्या आवडीतच ती अजून अडकून बसलीये!!

आणि जगायचे राहुन गेले…..


आयकोनिक आइज ची काळीशार रेघ डोळ्यात ओढून तिनं पुन्हा स्वतःला आरशात पहिलं आणि ती उद्गारली “ए, ब्यूटीफूल! लव्ह यू लॉट !”आणि तिला मनापासून खुशीचं हसू फुटलं.

पोटाला घट्ट बसणारी ब्रांडेड कुर्ती महत्प्रयासानं उतरवलेल्या दोन किलोमुळं सैलसर बसली होती.
कुर्तीचा पीच कलर तिच्या गोर्‍या रंगावर छान रिफ्लेक्ट करत होता. आणि कानात घातलेले खड्यांचे डूल मस्त डोलत होते.

तिला माहित होतं आज तिच्या प्रत्येक गोष्टीला छान छान कॉम्लिमेंट्स मिळणार होत्या.

भराभर जिना उतरून ती खाली आली. तर चिरंजीव सोफ्यावर ऐसपैस पसरले होते.सौरभ , तिचा नवरा नुकताच जीमवरून आला होता . “चला मी निघतेय. जेवण तयार करून ठेवलं आहे. सखूबाई वाढतील नंतर.

निहार , तुझा काय प्लॅन आहे सुट्टीचा?” निहारनं मोबाईलमधून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पहिलं “तू कुठं निघाली आहेस ?” कमरेवर हात ठेऊन त्याच्याकडे पहात ती म्हणाली “तुझ्या लक्षात नाहीच ना आम्ही औटिंगला चाललो आहोत ते ? कालपासून काय घोकते आहे मी ?”

“अरे , विसरलोच की. “निहार म्हणाला आणि एकटक तिच्याकडे पहात राहिला “ममा आरशात पाहिलस का? किती काजळ घातलं आहेस डोळ्यात ? कसं दिसतय बघ ते!”

‘गिरक्या घेणारं तिचं मन धाडकन जमिनीवर आदळलं. तिनं चटकन सौरभकडे पाहिलं . “कधी काजळ घालत नाहीस ना म्हणून वेगळं वाटतय. “ तो म्हणाला. “थोडं कमी कर ना . आणि कानात काय घातलं आहेस हे लहान मुलीसारखं ?”

आता मात्र तिला वाटलं आपल्या डोळ्यात पाणी येणार. ती पटकन रूममध्ये गेली आणि खुर्चीत बसून राहिली. गेले आठ दिवस ती या दिवसाची वाट बघत होती. खूप दिवसांनी सगळ्या शाळा कॉलेजच्या नव्याने भेटलेल्या जुन्या जिव्हाळ्याच्या मैत्रिणी औटिंगला निघाल्या होत्या.

तो एक दिवस फक्त स्वतः साठी काढताना प्रत्येकीला किती सायास करावे लागले होते.

सगळ्या पन्नाशीला पोचल्या होत्या. तिघींना जावई आले होते. मुलं त्यांच्या त्यांच्या जगात गुंग होती.

नवरे मंडळी मुलांच्यातून सुटलेल्या बायकोपासून जरा अंतर राखूनच होती.

या वयात येणारी उदासीची आणि एकटेपणाची भावना जगणं नीरस करून टाकताना अचानक आनंदाचा झरा भेटावा तशा त्या भेटल्या होत्या. खरं तर आज याच विषयावर बोलणार होत्या सगळ्या.

“हाऊ टू रिचार्ज” साचलेल्या आयुष्याला पुन्हा प्रवाहित करायचं होतं.

आणि त्याचाच एक भाग म्हणून सगळ्यांनी ठरवलं होतं प्रथम छान रहायचं , छान दिसायचं कारण ते लगेच शक्य होतं. म्हणूनच आज कधी नव्हे ते व्यवस्थित आवरून निघाली होती तर मुलाला लगेच ते खटकलं होतं . का ? ती डोळे मिटून विचार करत होती आणि विचार करताना हळू हळू तिची तिला ती सापडत गेली.

क्षणात मन प्रसन्न झालं. लगोलग खुर्चीवरून उठून तिनं केस सारखे केले.आणि पुन्हा ती हॉलमध्ये आली.

“ तुम्ही ज्यूस घेणार आहात का ?”तिनं दोघांना विचारलं. “अगं तू जात्येस ना ? तुला उशीर होत नाही का ?” सौरभने तिच्याकडे साशंक नजरेनं पहात म्हंटलं . “माधुरीला अजून पाच दहा मिनिटं वेळ आहे. ती मला पिकअप करणार आहे.” तिनं तिघांचे ग्लास भरून आणले.

निहार तिच्याकडे पाहून काही म्हणणार इतक्यात तीच म्हणाली. “ते काजळ असं लगेच जाणार नाही. पुसायला गेले तर सगळं काळं होऊन जाईल. चिल !”

तिच्या चिल नं तो हैराण झाला. “आज काय एकदम चिल पिल चाललं आहे ?”

“ खूप दिवसांनी आम्ही मैत्रिणी अशा निवांत भेटणार आहोत ना , म्हणून जरा एक्साइटमेंट वाढली आहे.

बाय द वे , तुमची परवाची पार्टी कशी झाली ?” निहार दचकला. “पार्टी ? कसली पार्टी ?” ती मजेत हसत त्याची तारांबळ बघत म्हणाली…

“अरे , ते नाही का , मागच्या आठवड्यात तुम्ही कुणालचे आजोबा सिरीयस आहेत असं सांगून रात्री सयाजीला पार्टी करून आलात ती पार्टी म्हणतेय मी.”

”सौरभ दोघांकडे पहात राहिला. निहार डोळ्यांनी तिला खुणावत होता की पप्पांपुढे हा विषय काढू नको म्हणून. पण तिनं साफ दुर्लक्ष केलं .

“काय रे ? कसली पार्टी ?” सौरभनं विचारलं. “त्याला काय विचारताय मला विचारा ना. पण काही म्हणा आजची ही पिढी नशीबवान आहे हं ! किती छान एंजॉय करतात लाईफ”

नाहीतर आमच्या वेळी फक्त हे करू नका ते वाईट असतं , असचं वागा , तेच करा. मुलीही किती बिनधास्त एंजॉय करतात. तुमचे मुंबईच्या पार्टीचे फोटो पहिले नं मी. किती शॉर्ट ड्रेस घातलाय पूर्वीनं ! त्यांच्या घरात चालतं का रे ?

निहार तिच्याकडे रागाने पहात होता. “तुला काय करायचय मॉम ? तो त्यांचा प्रश्न आहे. आणि तुला जायचं नाही का ?”

“अरे निघतेच आहे. आणि हो , पुढच्या रविवारी तुझी रूम साफ करू या. किती पसारा करून ठेवला आहेस. मी मागच्या वेळी साफ केली तेव्हा काय काय सापडलं ते………. “

“मॉम , तुला किती वेळा सांगितलं आहे माझी रूम मी आवरेन. तुम्ही का हात लावता माझ्या वस्तूंना. नंतर मग मला काही सापडत नाही. आणि तू काय माझ्यावर वॉच ठेवून आहेस का ? मी काय करतो , कुठे जातो , ? अरे यार, जरा विश्वास ठेवा ना आपल्या मुलावर. कोणत्या काळात जगता आहात ? जग किती पुढे गेलंय . तुम्ही आया ना ,कध्धी बदलणार नाही.”

निहार चिडचिडत म्हणाला.

“सारं जग बदललं तरी आई नाही बदलली कारण ती अजून काजळात अडकून पडली आहे ना !”

तिच्या बदललेल्या टोण मुळे दोघंही सावध झाले. “आय मीन इट निहार . मी पाचवीत होते. एक दिवस शाळेच्या गॅदरिंगला जायचं म्हणून डोळ्यात काजळ घातलं तर बाबा मला इतकं बोलले त्यांनी मला पुन्हा तोंड धुवायला लावलं. मी खूप रडले. आज त्यांच्या जागी तू बोललास. “

“त्याचा तुला इतका राग आला ? मी इतकंही सांगायचं नाही का ?”

“इतकंच नाही रे .. अजून खूप काही आहे त्यापाठीमागे.
प्रश्न काजळाचा नाही मला काय आवडतं याचा आहे आणि माझ्या आवडीपेक्षा इतरांच्या आवडी महत्वाच्या आहेत का याचा आहे.

¶ प्रश्न एकदाच मिळणार्‍या आणि जगणं राहून गेलेल्या आयुष्याचा आहे.

¶प्रश्न सारं जग बदलताना आईनं मात्र आहे तसंच रहावं या अपेक्षेचा आहे.

¶प्रश्न आई बाबांनी आपल्याशी मित्रासारखं वागावं पण आपण मात्र त्यांना त्यांच्याच काळात ठेऊन बिनधास्त पुढे निघून जावं या दुटप्पीपणाचा आहे .

¶प्रश्न आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याबरोबर आई सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ति आहे हे विसरण्याचा आहे.

फक्त इतकंच नाही रे हे..

“ ती उठली . पर्स घेतली . “चल , मी निघते. आणि आज काही मी पुन्हा मी काजळ पुसणार नाही. आय लाइक इट. अँड दॅट्स इट. “*

“मॉम ,वन मिनिट ,” निहार उठला तिला जवळ घेत म्हणाला दॅट्स लाइक माय मॉम ! गो अहेड . ऑल दि बेस्ट .”

ती बाहेर पडली तेव्हा तिच्या कानातले डूल मस्त डोलत होते आणि तिला एकदम लहान मुलीसारखं मस्त वाटत होतं



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “स्वतः पेक्षा इतरांच्या आवडीतच ती अजून अडकून बसलीये!!”

  1. मनाला स्पर्शून गेले लागले हृदयस्पर्शी लेख??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!