Skip to content

जे स्वतःलाच स्वीकारू शकत नाही, त्यांना दुसऱ्याचा मत्सर वाटणारच!

जे स्वतःलाच स्वीकारू शकत नाही, त्यांना दुसऱ्याचा मत्सर वाटणारच!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“तू का सारखं बोलत असतेस त्याच्यासोबत? ते ही स्वतःची काम वैगरे बाजूला टाकून. काय गरज आहे का?” ऋषी जाई वर ओरडत होता. जाई ऋषी रिलेशनशिप मध्ये होते. ते एकाच ऑफिस मध्ये काम करायचे. तशी त्यांची मैत्री कॉलेजपासूनच होती. पण ऑफिसमध्ये एकत्र काम करण आल ते योगा योगानेच. ओळख, मैत्री तर आधीपासूनच होती. आता एकत्र काम पण करू लागले त्यामुळे सहवास वाढला, एकमेकांना अजून ओळखता आल. मैत्रीचं रूपांतर हळू हळू प्रेमात झालं. सुरुवातीला ऑफिसमध्येच बोलण वैगरे व्हायचं. आता ती दोघं बाहेरही वेळ घालवू लागली, फिरू लागली. जरी त्या दोघांमध्ये प्रेमाचं नातं असल तरी अश्या काही गोष्टी होत्याच ज्या त्यांना आवडत नसत. या गोष्टी स्वतःबद्दलच्या नाही तर एकमेकांबद्दल होत्या.

म्हणजे अस की जाई अश्या विचारांची नव्हती की आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती आहे तर आपण २४*७ तिच्यासोबतच असल पाहिजे. आपल्या आयुष्यात बाकीच्या गोष्टी पण आहेत, नाती आहेत. ती देखील आपण जपली पाहिजेत, त्यांना पण वेळ दिला पाहिजे असा तिचा दृष्टिकोन होता. त्यामुळे ती तिच्या मित्र मैत्रिणींबरोबर वेळ घालवायची, त्यांच्यासोबत फिरायला जायची.

अर्थात या सगळ्यात ती ऋषीला कमी महत्त्व द्यायची किंवा विचारात घ्यायची नाही अस नाही. त्याला पण ती वेळ द्यायची. पण ऋषीला मात्र ते कमीच वाटायचं. त्याचे स्वतःचे मित्र मैत्रिणी होते. चांगला ग्रुप होता. अस असूनही त्याच बऱ्याचदा हेच म्हणणं असायचं की आपण आता अश्या नात्यात आहोत जिथे आपण सर्वात जास्त एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे, राहील पाहिजे. आणि अस केल म्हणून आपली बाकीची नाती काही खराब होत नाहीत. ते आपल्याला समजून घेतीलच. दोघांचेही दृष्टिकोन वेगळे असल्याने बऱ्याचदा वाद व्हायचे.

ती दोघं एकमेकांचा आदर करत नव्हती, त्यांना एकमेकांची काळजी नव्हती अस नव्हत, पण या ही गोष्टी होत्या ज्या कुठेतरी खडा असल्यासारख्या टोचायच्या. आपण कितीही जवळच्या नात्यात असलो तरी माणूस म्हणून आपलं अस्तित्व हे वेगळच असत. ते समोरच्या सारखं असू शकत नाही.

पण हे वेगळेपण जी लोक स्वीकारतात ती चांगल नात निभावतात. पण हे समोरच्याने स्वीकारण्याआधी आपण स्वतः स्वीकारावं लागत. आपल्या जश्या चांगल्या गोष्टी आहेत तश्या काही उणीवा असू शकतात, कमतरता असू शकतात, सगळीकडेच आपण पुरे पडू शकत नाही हे आपल्याला जेव्हा समजणार तेव्हा आपण ते सुधारू शकतो आणि त्यासाठी दुसरी व्यक्ती आपल्याला मदत करू शकते.

नात्यामध्ये, विशेषतः जोडपी यांच्यामध्ये संघर्ष, कटुता येण्याचं कारण बरेचदा हे असत. आपलं माणूस दुसऱ्याशी जास्त बोललेल आवडत नाही, इतरांच्या जवळ गेलेलं, साधी मदत मागितलेले आवडत नाही. मत्सर निर्माण होतो. मी आहे ना मग तिच्याकडे, त्याच्याकडे कश्याला काय मागायला हवं, मी असताना दुसऱ्या कोणासोबत का वेळ घालवला पाहिजे? मी कुठे कमी पडतो/पडते म्हणून तिसऱ्या व्यक्तीला मध्ये आणलं जातय.

आता या नात्यात मत्सर वाटणं स्वभाविक गोष्ट आहे. आपलं हक्काचं माणूस दुसऱ्याच्या जवळ जाताना आपण पाहिलं तर आपण jealous होतो. आणि ते एका मर्यादेपर्यंत छान पण वाटत. कोणाला? तर आपल्या पार्टनरला किंवा जी कोण आपली जवळची व्यक्ती आहे तिला. कारण यातून आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दिसून येत असत आणि आपल्याला त्यांना गमावायच नाहीये, दूर होऊ द्यायचं नाहीये जे दिसून येत असतं.

मत्सर ही जी भावना आहे त्याच वर्णनच अस आहे. एखाद्या व्यक्तीच्या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता येते तेव्हा मत्सर निर्माण होतो. म्हणूनच तर अनेक जण जी नात्यात असतात, त्यांना आपल्या पार्टनरने दुसऱ्या कोणाशी बोललेल, जवळीक केलेलं आवडत नाही. काही जण याचा अतिरेक पण करतात. अगदी यांचं नात सुरू होण्यापूर्वीपासून जी नाती त्या व्यक्तीच्या आयुष्यात असतात त्यांच्याशी पण संबंध तोडायला सांगितले जातात.

आता इथे प्रेम असतच पण त्याही बरोबर जास्त असते ती असुरक्षितता. कोणती? तर आपण एकटे पडू, आपल्याला ही व्यक्ती सोडून जाईल. आणि ही वाढते पण तेव्हाच जेव्हा आपल्याला ती तिसरी व्यक्ती आपल्याहून कोणत्यातरी बाबतीत जास्त उजवी आहे, म्हणजेच तिच्यामध्ये असे गुण आहेत जे आपल्यात नाहीत अशी जाणीव येते तेव्हा. ही असुरक्षितता खरतर तिसऱ्या व्यक्तीमुळे नाही तर आपल्या मधल्याच काही कमतरता ज्या आपणच अजून स्वीकारू शकलो नाही त्यामुळे आलेली असते. मी अशी आहे, मी असा आहे. माझ्याहून ती व्यक्ती चांगली आहे. त्यामुळे आमच्या नात्यात बिघाड होऊ शकतो अस वाटत आणि म्हणून मत्सर निर्माण होतो.

आपण जर हे मान्य केलं की आहे मी काही बाबतीत कमी, काही गोष्टी आहेत ज्या मला सुधारण गरजेचं आहे, आणि अश्याही काही गोष्टी आहे ज्या मी काही मागून मला मिळालेल्या नाहीत, त्या मुळतः आहेत. उदा. कोणत्याही प्रकारचं व्यंग. आता ही गोष्ट कोणाला हवी असते का? तर नाही. पण वस्तुस्थिती न स्वीकारता त्याला टाळत राहील तर त्रास आपल्यालाच होतो.

ज्या गोष्टी मला सुधारता येतील त्यासाठी मी प्रयत्न करेन असा विश्वास आपण जर स्वतःवर ठेवला तर आपल्याला दुसऱ्या माणसामुळे असुरक्षित व्ह्यायची काही गरज नाही. आणि जसा स्वतःवर विश्वास लागतो तसा पार्टनरवर पण लागतो. मला माहित आहे मी कशी आहे किंवा कसा आहे, माझ्या पार्टनरला माहीत आहे. तिने मला स्वीकारलं आहे. अस असताना जर ती कोणाशी बोलली तर याचा अर्थ आमचं नात बिघडत अस नाही होत. आपल्या आयुष्यात हे एकच नात नाही, अनेक आहेत जी आपण निभावत राहायचं असत. असा जर आपला दृष्टिकोन असेल तर नात चांगल टिकत. म्हणूनच कधीही बाहेर पाहण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावून पाहिलं पाहिजे. आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडेच असतात आणि ती मिळतात देखील.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *