उतारवयात मानसिक दुखणे मागे लागू नये म्हणून तरूण वयात काय करावे?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
इंग्लिश मध्ये एक प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, “Prevention is better than cure.” म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट झाल्यावर त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आधीच ती कशी टाळता येईल, त्यातून वाचता येईल, त्याचा प्रतिबंध कसा करता येईल हे पाहणे, त्यासाठी प्रयत्न करणे. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा प्रतिबंध करतो तेव्हा आपल्याला खात्री असते की आपण त्या धोक्यापासून दूर आहोत. पूर्णपणे नसली तरी मनाला धीर येईल इतकी तरी खात्री असते. प्रतिबंध जर नसेल तर ती थोडीफार खात्री पण नसते आणि व्हायचं ते होत. कोरोना काळात आपण सर्वांनी हे पाहिलं आहे. त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या लसीच महत्त्व देखील आपल्याला माहीत आहे.
पुढे काही धोका उद्भवू नये म्हणून आधी त्यासाठी काळजी घेतलेलं कधीही चांगल असत. आपण शारीरिक आरोग्याच्या बाबतीत बऱ्याचदा ही काळजी घेतो. त्यासाठी जमेल तसे प्रयत्न करतो. अगदी ऋतू बदलू लागला की आपली तयारी सुरू होते त्याच्यापासून स्वतःच संरक्षण करायची. पण मानसिक आरोग्य, त्याबाबत म्हणावी तशी जागरूकता अजूनही आपल्या समाजात पसरलेली नाही. मानसिक आरोग्य चांगल राहावं म्हणून आधी काळजी घ्याचची ही गोष्ट लांब राहिली, मानसिक आरोग्य बिघडलं, त्यात काही समस्या निर्माण झाल्या तरी त्यावर योग्य ते उपचार घेतले जात नाहीत. त्यात पण टाळाटाळ केली जाते.
मानसिक समस्या म्हणजे काहीतरी चुकीचं, समाजाच्या विरुध्द वेगळच काहीतरी आहे अस अजूनही मानलं जातं. याबद्दल कोणाला काही समजल तर लोक काय म्हणतील अश्या भीतीने उपचार घेतले जात नाहीत. घरातली लोकच बऱ्याचदा यावर विश्वास ठेवत नाहीत की मानसिक आरोग्य म्हणून काहीतरी असत. त्याची पण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यात काही कमी जास्त झालं तर ते abnormal नाही. जसं शरीर आजारी पडत तस मन पण आजारी पडत आणि तस काही झालं तर त्यासाठी मदत करायला माणसं आहेत. समुपदेशक, उपचारक आहेत. यात लाज वाटुन घेण्याची काहीही आवश्यकता नाही.
पण अजूनही याबाबत समाजात गैरसमज असल्याने कोणी याबाबत काळजी घेत नाही. तितकी सजगता लोकांमध्ये नाही. तरुपणात याचे तोटे दिसतच आहेत. अनेक जण नैराश्य, चिंता यासारख्या मानसिक आजारांना बळी पडत आहेत. पण उतारवयात देखील याचे परिणाम दिसत आहेत. उतारवयात सर्वात जास्त होणारा आजार म्हणजे dementia म्हणजेच स्मृतिभ्रंश. माणसाच्या स्मरणशक्ती वर यात परिणाम होतो. चिडचिडेपणा, मुड स्विंग, विचारशक्ती क्षीण होणे, अशी लक्षण यात दिसून येतात.
हा आजार मेंदूच्या स्मृती कार्याशी संबंधित आहे. यातून रोजच्या जीवनात वावरायला पण व्यक्तीला अडचणी येऊ लागतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या किंवा घरात असलेल्या वृध्द व्यक्तीच्या बाबत आपण हे अनुभवलं असेल. त्यांना थोड्या वेळापूर्वी सांगितलेली देखील अनेकदा लक्षात राहत नाही. बोलताना, एखाद्या गोष्टीवर मत मांडायला, विचार करायला अडचणी येतात. मोहन आगाशे यांचा “अस्तू” हा चित्रपट याच उत्तम उदाहरण आहे. स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीची भूमिका त्यांनी त्यात साकारली आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार ५५मिलियनच्या वर जगात याचे रुग्ण आहेत आणि दर वर्षी दहा मिलियन केसेस सापडतात. हा असा आजार आहे ज्यावर उपचार आहेत पण हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. त्याहूनही गंभीर आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की स्मृतिभ्रंश जो आजार उतारवयात होत होता त्याच वय पण आता कमी झाल आहे. म्हणजेच जो आजार पासष्टी नंतर होत होता तो आता कमी वयात होऊ लागला आहे.
म्हणून हीच ती वेळ आहे आपण याबाबत जागरूक झालं पाहिजे आणि आपल्या मानसिक आरोग्याकडे काळजीपूर्वक पाहिले पाहिजे. त्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आजार झाल्यानंतर पाहू अशी मानसिकता ठेवणं बदललं पाहिजे आणि तरुणपणीच आपल्याला काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. तर अश्या बऱ्याच गोष्टी आहे ज्याची आपण सुरुवात केली, काळजी घेतली तर उतारवयात आपलं मानसिक आरोग्य चांगल राहू शकत. त्या कोणत्या ते पाहू:
१. मेंदूला सतत क्रियाशील ठेवणे: जर आपण एखादी वस्तू तशीच न वापरता ठेवून दिली तर त्याच काय होत? ती खराब होते, गंजते. आपल्या मेंदूचं देखील अगदी तसच आहे. आपली विचार शक्ती, आपल्या भावना नीट व्यक्त व्हायला हव्या असतील, चांगली स्मरणशक्ती हवी असेल तर मेंदूला पण काहीतरी काम दिलं पाहिजे, त्याचा सतत वापर केला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे माईंड गेम्स खेळणे, अश्या गोष्टी करण ज्याने आपल्या मेंदूला आव्हान मिळतील फायदेशीर ठरतात. मग त्यात कोडी सोडवण असेल, नवीन एखादी गोष्ट जी आतापर्यंत आपल्याला येत नव्हती जसं की डाव्या हाताने लिहिण, नवीन भाषा शिकणं, बुद्धिबळ सारखे खेळ असतील. अशी कोणतीही गोष्ट जी आपल्या विचारांना चालना देईल ती आपल्याला केली पाहिजे जेणेकरून आपला मेंदू सक्रिय राहील.
२. घरातल्या व्यक्ती, मित्रपरिवार यांच्या संपर्कात रहा: तरुण असताना आपल्या समोर अनेक स्वप्न असतात, ध्येय असतात. जी असली देखील पाहिजेत. पण ती मिळवण्याच्या नादात अनेकदा आपण आपल्या माणसांपासून दुरावतो. त्यांना मागे टाकतो. आणि याचा परिणाम दिसतो. उतारवयात माणसाला सगळ्यात जास्त त्रासदायक आणि वेदना देणारी कोणती गोष्ट वाटते ती म्हणजे एकटेपणा. त्यावेळी सर्वात जास्त त्यांना माणसांची गरज असते. माया, आपुलकी जिव्हाळा हवा असतो. हा एकटेपणा त्यांना खायला उठतो, मानसिकदृष्ट्या त्रास देतो. म्हणून माणसं जोडून ठेवणं गरजेचं आहे. आपला स्वभाव, आपलं व्यक्तित्व अस पाहिजे की लोकांना आपण हवेसे वाटू. त्यासाठीच तरुण असल्यापासूनच घरातल्यांना वेळ देणं, चांगल्या लोकांमध्ये, मित्र परिवार यामध्ये वावरल पाहिजे. याचा नंतर खूप फायदा होतो. एकटेपणाची भावना तर जातेच पण आपल्यासोबत कोणतरी आहे, आपल्याला कोणाचातरी आधार आहे ही भावना देखील मनात रहाते.
३. शारीरिक आरोग्याची काळजी घ्या: मला काय होत, मी मस्त आहे, ह्या वयात मजा नाही करणार तर कधी करणार? अशी आताची मानसिकता झाली आहे. कधीही खायचं, कधीही झोपायच, व्यायाम नाही. कोणतही नीट वेळापत्रक नाही अस करून आपणच आपलं नुकसान करून घेत आहोत ज्याचे परिणाम नंतर दिसतात. आपल्याला माहीतच आहे, मानसिक आणि शारीरिक आरोग्य काही वेगळं नाही, दोन्ही गोष्टी एकमेकांवर परिणाम करतात. त्यामुळे शरीराची नीट निगा राखली नाही तर त्याचे ही परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतात. फास्ट फूड, प्रोसेस फूड जे हल्ली सरास खाल्ल जात त्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो. चिंता, नैराश्य यासारखे आजार त्यातून होऊ शकतात. म्हणूनच शक्य तितकं ताज सकस अन्न खाण, निसर्गात वावरण, व्यायाम, झोप यासारख्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत.
४. नवनवीन छंद जोपासा: सृजनशीलता ही माणसाच्या विचारांना चालना देते, नवनवीन विचार करायला, विशेष करून नेहमीपेक्षा वेगळा काहीतरी विचार करायला चालना देते आणि हे सर्व छंदातून शक्य होत. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा छंद जोपासतो तेव्हा आपण त्यात नाव नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतो तसच आपण वर्तमानात जगतो, त्या क्षणाचा आनंद घेतो, जी खुप महत्त्वाची गोष्ट आहे. Mindful राहणं, सजग राहणं खूप गरजेचं आहे. हे सर्व छंदातून शक्य होत. आणि चांगल्या सवयी जितक्या आपण लवकर लावू तितक्या चांगल्या असतात. म्हणून तरुणपणी आपण चांगले छंद जोपासले पाहिजेत ज्यातून आपला मेंदू क्रियाशील राहतो.
५. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम रहा: ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस कष्ट करतो, काम करतो. हे सर्व कष्ट घरातल्या माणसांसाठी असतात जेणेकरून त्यांना चांगल आयुष्य जगता आलं पाहिजे. चांगल कुटुंब यातूनच तयार होत असत. हीच त्याची भक्कम बाजू आहे. पण यात सगळ्यात आपल्याला आपण विसरून जात असू तर त्यातून नंतर आपल्यालाच समस्या निर्माण होणार आहेत. बरेच पालक अती भावनिक होऊन जे काय आयुष्यभर कमवून ठेवलेलं असत ते मुलांना देऊन टाकतात. स्वतः साठी काहीही विचार करत नाहीत. मुलांना देऊ नये अस नाही. पण आपण स्वतः च्या स्थैर्याचा पण विचार केला पाहिजे. स्वतःसाठी जगणे, स्वतःचा विचार करणे म्हणजे स्वार्थीपणा नव्हे. दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला समतोल साधता आला पाहिजे.
अश्या पद्धतीने आपल्या आयुष्यावर प्रेम करत, भरभरून जगत, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत आपण एक चांगल आयुष्य सुरुवातीपासूनच जगलो तर नंतर काही समस्या उद्भवणार नाहीत.
ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


खूप छान आणि आवश्यक असा लेख आहे
This draft is very nice!