Skip to content

पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना टोचून बोलू नका, कारण अतिविचाराने ते रात्रभर झोपत नाहीत.

पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना टोचून बोलू नका, कारण अतिविचाराने ते रात्रभर झोपत नाहीत.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


मी आई म्हणून कुठे चुकले का? इतकी वर्ष कोणतीही अपेक्षा न ठेवता या मुलांसाठी इतकं केल, राबले, कष्ट केले आणि आज रजत ने मला अस म्हणावं? आई म्हणून मी माझ्या कर्तव्यात कुठे कमी पडले म्हणून मला आज ऐकून घ्यावं लागलं. आजूबाजूची सगळी माणसं मला ओरडायची, समजवायची की मुलांचे इतके लाड करू नको, कधीतरी धाकात ठेव, ओरड.

पण मी कोणाचही ऐकल नाही. मुलांना रागावणं, ओरडणं मला कधी जमलंच नाही आणि मनाला पटलं देखील नाही. शाळेत असताना रजतला क्रिकेट खूप आवडायच म्हणून साठवलेल्या पैशातून ते सर्व गोळा करून त्याला सर्व कीट आणून दिलं होत. त्याचे बाबा त्यावेळी किती भडकले होते माझ्यावर. अभ्यास सोडून असल्या गोष्टी करायला तु प्रोत्साहन देतेस, एक ना दोन हजार गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण मला काही वाटलं नाही. माझ्या रजतच्या आनंदासमोर मला काही महत्त्वाचं नव्हत.

नोकरीच लेटर घरात येऊन पडल होत तरी मी नाकारलं. कारण त्याच्या अभ्यासाकडे, खाण्या पिण्याकडे माझं दुर्लक्ष झाल असत. जे मला नको होत. माझ्या मुला पुढे मला माझी स्वप्न बाजूला सारावी लागली असती तरी चालली असती. रियाला पहिल्यापासून नटायची आवड होती. किती सुरेख दिसायची ती नटल्यावर. डान्स तरी किती सुंदर करायची. तिच्या पायात जणू जादू होती. बाबा, आजी नको म्हणत असताना हट्टाने तिला डान्स क्लासला घातलं. पुढे कॉलेजला असताना तिला ब्युटी काँटेस्ट मध्ये जायचं होत म्हणून बाहेर पाठवलं. या सर्व गोष्टींमध्ये माझ्या सोबत अस कोणी नव्हतच. सगळ्याच म्हणणं एकच, तु मुलांना बिघडवतस आहेस. पण माझा माझ्या मुलांवर विश्वास होता. त्यांच्या स्वप्नासाठी जर मला ऐकून घ्यावं लागतं असेल, बोलून घ्यावं लागतं असेल तर मला ते चाललं असत.

दुःखाने रडून कित्येक रात्री काढल्या, छोटी रिया मला त्यावेळी म्हणायची, “आई तुझे डोळे का असे दिसतात, तुला कोणी काही केल का? मला सांग. मी चांगलाच धडा शिकवत त्यांना!” एवढीशी होती आणि जणू माझीच आई असल्यासारखी बोलायची. इतक्या लहान वयात त्यांना माझ्या डोळ्यातलं दुःख दिसल.

मग आता, आता माझं मन, इतकी वर्ष काढलेले कष्ट, त्याग याची जाणीव त्यांना का होऊ नये? आता त्यांच्या नजरेतल माझ्याविषयी असलेले ते प्रेम, ती काळजी कुठे हरवून गेली. रजतचे बाबा एकदा तो समोर असतानाच माझ्यावर केवढ्याने ओरडले होते. त्यावेळी पटकन माझ्या डोळ्यात पाणी आलं होत. चौथी, पाचवीत होता तो तेव्हा. समोर येऊन बाबांना म्हणाला होता, “बाबा आईला अस ओरडू नका, तिला वाईट वाटत ना! बघा ती रडायला लागली.” मला खाली बसवून माझे डोळे आपल्या छोट्या हातांनी पुसत होता आणि मला म्हणत होता, “आई तू रडू नको. बाबा तुला परत ओरडणार नाहीत. मी सांगितल आहे त्यांना!”

खरच लहानपणी असलेला तो निरागस भाव, ते निरपेक्ष प्रेम मोठ झाल्यावर कुठे हरवत का? की मीच त्यांच्याकडे अपेक्षा केली माझ्याशी नीट वागावी अशी? पण तसही मी त्यांना कधी बोलून दाखवलं नाही. लहानपणी मी त्यांच्या स्वप्नांना वाट करून दिली, मोठ झाल्यावर जेव्हा त्यांचे निर्णय ते घ्यायला लागले तेव्हा माझ्या अडवण्याचा कुठे प्रश्नच येत नव्हता. हे सर्व एका क्षणात कुठेतरी हरवून गेल्यासारखं वाटल. माझ्या बाजूने लहान असताना बोलणारी ही मुल आज किती सहजपणे म्हणाली, आई काय सारखं लुडबुड करते आमच्या आयुष्यात? आम्ही आता मोठी झालो आहोत. आम्हाला आमचं चांगल वाईट समजत. आणि तसही लहानपणापासून आम्हीच आमचं सर्व करत आलो आहोत. तू केल असशील पण जगावेगळं काही केल नाहीस. बाकीचे करतात तसच केल. त्यामुळे अस वावरू नको की आमच्यावर किती उपकार केलेस किती, खस्ता खाल्यास. कोणतीही आई हेच करेल.

बरोबर आहे, कोणतीही आई हेच करेल. मी काय वेगळं केल? मुलांसाठी स्वतःची स्वप्न विसरून गेले, यांच्यासाठी सातत्याने सर्वांच्या विरोधात गेले, बोलणी ऐकून घेतली, मी पण बाजूला ठेवून करता येईल ते सगळं केलं. आता देखील स्वतःची तब्येत न पाहता यांच्या काळजीने काही सांगायला गेले तर मी लुडबुड केली. बोलताना त्यांनी एक क्षण सुध्दा विचार केला नाही. किती कोरडेपणा होता त्यात. त्यावेळचं डोळ्यात आलेलं एक टिपूस पाणी रजतला दिसलं होत. आणि आज तो मला रडु आलं तेव्हा “आई झालं परत सुरू तुझ, रडगाण. काहीही झालं की रडायचं आणि sympathy मिळवायची. आधीपासून हेच केलस तु.” अस म्हणाला. रात्रभर या विचारांनी गायत्रीला झोप लागली नाही. मुलांचे हे शब्द तिच्या जिव्हारी लागले होते. तिचा स्वभाव तसा पहिल्यापासून हळवा होता. कोण काहीही बोल तरी तिला लगेच लागायचं. पण तिने त्याची कधी पर्वा केली नाही. कारण तिच्यासाठी तिची मुल महत्त्वाची होती.

परंतु आज जेव्हा तिचं मुल तिला अस बोलली तेव्हा मात्र तिला राहवलं नाही. मनात साचलेले इतक्या वर्षाच दुःख, त्रास सर्व बाहेर पडला. बोलणार तरी कोणाला? ज्यांना आपलं म्हटल तिचं अशी बोलत होती. अख्खी रात्र तिने विचारात जागून काढली. पण त्याची जाणीव नंतर देखील कोणाला झाली नाही.

माणूस हा भावनाशील प्राणी आहे. दुःख, राग, लोभ, प्रेम, माया हे सर्व आपल्यामध्ये आधीपासूनच आहे. आपल्याला या सर्व भावना जाणवतात. पण काही लोक अती भावनाशील असतात. कोणत्याही घटनेवर ते प्रमाणापेक्षा जास्त भावनिक होतात आणि त्याच घटनेत अडकून बसतात, त्याचाच विचार करत बसतात. अशी माणसं खूप हळवी आणि निर्मळ मनाची असतात. कोण काही पटकन बोलून गेलं तर मनाला लावून घेणार, त्याचा त्रास करून घेणार. त्यामुळे अश्या माणसांशी बोलताना विचार करून बोलावं लागत. काही लोकांचा स्वभाव हा फटकळ असतो. त्यांच्या मनात दर वेळी वाईट असत अस नाही पण बोलणंच अस असत की समोरच्याला वाईट वाटलं पाहिजे. अश्या वेळी विचार करून बोलावं लागत. आपल्या बोलण्याने समोरच्यावर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिले. आपलं म्हणणं समजावून सांगणं ही देखील एक कला आहे. मनात कितीही चांगल असेल पण बोलताना आपण रुक्ष होऊन, तुटकपणे बोललो तर समोरची व्यक्ती त्याने दुखावली जाते.

आता काही जण उदा. रजत सारखी माणसं, विचार करत नाहीत की आपल्या बोलण्याचा समोरच्या माणसावर काय परिणाम होईल किंवा काय वाटेल. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला दुखावण्याचा हेतूनेच बोललं जात. कारण त्याची दुखरी बाजू माहीत असते. अश्या वेळी अती भावनिक असणाऱ्या व्यक्ती मनाने खंबीर होण खूप गरजेचं आहे. इतरांनी आपल्याला इतक्या सहजपणे दुःखी करावं इतकं आपलं मन कमकुवत असू नये. त्याला भक्कम करायची गरज आहे. आपण कितीही अपेक्षा केली की समोरच्याने आपल्याशी नीट वागाव तरी ते दर वेळी होईल अस नाही. प्रत्येक वेळी आपल्याला अशी माणसं भेटतील अस नाही. म्हणून आपण रात्र रात्र त्याच विचारात जागवणार का? आपण दुःखी होऊन बसणार का? नाही. आपण स्वतःला स्त्राँग केलं पाहिजे. इतकं की कोणीही आपल्याला सहजासहजी त्रास देऊ शकणार नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना टोचून बोलू नका, कारण अतिविचाराने ते रात्रभर झोपत नाहीत.”

  1. छान लेख आहे. पण मनाला स्ट्रँग कस करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *