लोकांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा, जेणेकरून त्यांचे शब्द तुम्हाला मूर्ख बनवणार नाहीत.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
तु इतका मोठा झालास/झालीस, इतका शिकलास/शिकलीस पण अजून तुला माणसं मात्र ओळखायला येत नाहीत. हे वाक्य आपण बरेचदा ऐकलं असेल, आपल्या कानावर पडलं असेल. आपल्याकडे वयाने मोठी असलेली माणसं किंवा अनुभवी माणसं अस बोलताना दिसतात आणि हे अस कोणाला सांगितल जात ज्यांची बरेचदा फसगत होते. ज्यांना माणसांकडून वाईट अनुभव येतात. चुका होतात आणि तरीही अशी लोक जेव्हा पुन्हा पुन्हा फसली जातात. तेव्हा अस सोबत असणारी लोक म्हणतात की अजुनही, इतके वाईट अनुभव येऊनही तुला माणसं ओळखता येत नाही, तुझ्याकडुन चुका होतात.
माणूस म्हटल्यावर चुका होणार हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, हे सर्वश्रुत आहे. पण एकच चूक जर आपण पुन्हा पुन्हा करत असू तर याचा अर्थ आपल्याला आपल्यात कुठेतरी बदल करण आवश्यक आहे. कारण नुसत अनुभव घेणं किंवा ते येणं हेच महत्त्वाचं नाही. अशी अनेक लोक असतात जी अख्ख आयुष्य घालवतात पण त्यांच्यामध्ये काही बदल होत नाहीत, सुधारणा होत नाहीत. ते त्याच त्याच चुका करत, त्याचा खेद करत आयुष्य काढतात. अस का होत? कारण ते त्यांच्या अनुभवातून काहीही शिकत नाहीत. ते फक्त अनुभव घेतात. शिकणं आणि शहाणं होण यात फरक आहे. जेव्हा आपल्याला फक्त एखादी नवीन माहिती मिळते किंवा ती आपण घेत असतो तेव्हा ते शिकणं असत. पण त्याच माहितीच्या, शिक्षणाच्या आधारावर जेव्हा आपण योग्य पद्धतीने वागतो, निर्णय घेतो तेव्हा त्याला शहाणपण म्हणतात.
म्हणूनच जेव्हा आपल्याला लोकांकडून वाईट अनुभव येतात, अगदी तसच काही झालं नाही तरी आपल्याला कानावर जेव्हा तश्या घटना पडतात तेव्हा आपण देखील जबाबदारीने आणि काळजीने वागणं गरजेचं आहे. याची जिवंत उदाहरण आता आपल्या समोर आहेत. निर्भया सारख्या कितीतरी घटना आतापर्यंत घडलेल्या असून देखील श्रद्धा फसते आणि तिचा इतका निर्घृणपणे खून करण्यात येतो. अंगावर काटा आणणारी ही घटना आहे. अस का होत? समाजात इतक्या साऱ्या घटना होत असून देखील आपण सहज फसतो. कारण आपल्यामध्ये या सर्व गोष्टींबाबत जी सजगता येणं गरजेचं आहे तिच अजून आलेली नाही. आपण अजून स्वतःला तितकं मजबूत केल नाही आणि म्हणून समोरची व्यक्ती सहज आपल्याला मूर्ख बनवते.
कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्यावर पुन्हा एकदा नीट विचार करायचा असतो. दर वेळी समोरचा आपल्याशी नीट बोलतोय, गोड गोड बोलतोय याचा अर्थ त्याचे हेतू चांगले असतातच अस नाही. आता आपण अगदी जन्माला येता क्षणी काही माणसं ओळखायची क्षमता घेऊन येत नाही. पण अनुभवातून हे नक्कीच शिकू शकतो. म्हणूनच एकदा वाईट अनुभव आला की पुढच्या वेळी आपण काळजीपूर्वक आपली सद्सदविवेकबुध्दी वापरून त्यानुसार वागल पाहिजे. आपल्याला सर्वांवर संशय घेत फिरायच नाहीये, पण निदान समोरच्या व्यक्तीच, वागणं त्याची नैतिकता आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि ती समजते जेव्हा आपण नीट भानावर असतो. छोट्या छोट्या गोष्टींनी हुरळून न जाता जेव्हा आपण सारासार विचार करून वागतो तेव्हा आपल्याला या गोष्टी समजतात. त्यासाठी आपलं निरीक्षण चांगल पाहिजे.
ठीक आहे मला आतापर्यंत असा काही अनुभव आला नाही, माझ्याशी आतापर्यंत लोक चांगलच वागत आले आहेत. अस एखाद वेळी होऊ शकत. पण आतापर्यंत अस झाल म्हणून यापुढे अस होणारच नाही असा विचार डोक्यात ठेवून आपण गाफील राहिलो तर नुकसान आपलं आहे. म्हणून इतरांचे अनुभवाचे बोल ऐकून, नीट विचार करून आणि मुख्य म्हणजे डोळे उघडे ठेवून घटनांकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. वाईट अनुभव येतील, पण त्यातून शिकत पुढे जातच आपल्याला माणसं ओळखायला शिकायचं आहे. तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

