Skip to content

उगाच कडवटपणा येत नाही विचारात, कुठेतरी गोड स्वभावाचा तोटा सहन केलेला असतो.

उगाच कडवटपणा येत नाही विचारात, कुठेतरी गोड स्वभावाचा तोटा सहन केलेला असतो.


हर्षदा पिंपळे


मित्रांनो,जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्या आयुष्यात असतात.वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात. सगळीच माणसं सारखी असतात असं नाही.अगदी रंग-रूपाने,स्वभावाने सगळेच वेगळे असतात.पण रंग-रूपाचं फार काही विशेष नाही.महत्त्वाचा असतो तो माणसाचा स्वभाव. तर प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो.

साधारणपणे स्वभाव कसे असतात तर,कुणी एकदम मधाळ वाणीचं असतं तर कुणी एकदम तिखट,एखाद्याला झोंबेल असं बोलतं.कुणी एकदम कपटी स्वभावाचं असतं तर कुणी एकदम साधं भोळं असतं.काही लोकं खूप स्वार्थी स्वभावाची असतात.जिथे तिथे स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल याचाच ते विचार करतात तर काही लोकं इतकी निःस्वार्थी , सालस असतात की, बाकीची लोकं येऊन त्यांना केव्हा गुंडाळून जातात कळतही नाही.

खरं तर ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा ज्याला त्याला मिळत असते.त्यामुळे एखादा वाईट वागत असेल ,त्याची विचारसरणी वाईट असेल तर त्याला त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतात.

पण मित्रांनो, गोड स्वभावालाही काही कमी भोगावं लागत नाही. त्यांनाही त्यांच्या मधुर स्वभावामुळे आयुष्यात खूप सहन करावं लागतं. आणि वाईट माणसं आपल्याशी कशीही वागली तरी आपल्याला त्याचं काही वाटत नाही. कारण ते सवयीचं होऊन गेलेलं असतं.

पण कधीतरी असं होतं की, ही मधुर स्वभावाची माणसं अचानकपणे वेगळं वागायला लागतात.त्यांच वागणं दिवसागणिक बदलत जातय असं आपल्याला वाटतं.ही नेहमी गोड असणारी माणसं आज अचानक अशी का वागतात हा प्रश्न आपल्याला सहज पडतो.आपण त्या गोष्टीवर सहसा विश्वास ठेवायला तयारच होत नाही.

“अरे,ही एरवी चांगली वागणारी मुलगी आज असा विचार का करतेय ?ही गोड स्वभावाची मुलगी इतकी कडवट कशी झाली ?” अशी कधी ती वागत नाही गं ? आणि त्यालाही काय झालय काही कळत नाही गं ? या आधी कधीच असा वागला नाही. नेहमी गोड ,हसतखेळत बोलणारा आज पार कारल्यासारखा बोलतोय.”

असं आपण पटकन बोलून जातो.

तुमच्या बाबतीतही असं झालं असेल.असा प्रसंग घडला असेल. किंवा आपण स्वतः त्याचं एक उत्तम उदाहरण असू शकतो. जर आपला स्वतःचा स्वभाव गोड असेल तर…!

तर यामागे बरीच कारणं असू शकतात.गोड स्वभावाचा अनेकदा फायदा घेतला जातो.त्या गोड स्वभावामुळे अनेकदा तोटा सहन करावा लागतो.त्रास सहन करावा लागतो. कामाचं ठिकाण असो,एखादं रिलेशन असो किंवा काहीही असो.सर्वांना हवाहवासा वाटणारा गोड स्वभाव हा कधीतरी कडवट विचार करेन असं मनातसुद्धा येत नाही.

पण काय करणार ? आजुबाजुला असणाऱ्या असंख्य वाईट प्रवृत्तीमुळे त्या गोड स्वभावाला अनेकदा तोटा सहन करावा लागतो. शेवटी वैतागतो तो गोड स्वभाव…..असह्य होऊन चिघळायला लागतो.नाइलाजाने कडवट विचार तो करायला लागतो.त्यामुळे स्वभावाला औषध नसतं हे जरी खरं असलं तरी काही गोष्टी काही अनुभव हे माणसाला स्वभाव बदलायला भाग पाडतात.आणि म्हणून माणूस अनेकदा बदलत जातो.

मग,कधी कधी वाटतं,गोड स्वभावाला कायम तोट्यात जावं लागणार असेल तर तो गोड स्वभाव नसलेलाच बरा !

थोडं वेळप्रसंगी माणसाने कडवट व्हायलाच हवं.त्याशिवाय समोरच्यालाही किंमत कळत नाही.एखाद्या चांगल्या, साध्या स्वभावाच्या माणसाला लोकं अनेकदा त्रास देतात, नको नको ते बोलून मोकळे होतात.पण तो साध्या सरळ स्वभावाचा माणूस काहीच बोलत नाही.

पण मग या अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी दिवसेंदिवस वाढत जातात. मग या सगळ्याचा परिणाम कळत नकळतपणे त्या साध्या, गोड स्वभावाच्या माणसावर परिणाम होतो.आणि परिणामी तो थोडा फार कडवट होतो.

तर,गोड स्वभाव असणं वाईट नाही.परंतु वेळप्रसंगी तिखट होता आलं पाहिजे.थोडफार कडवटपणा असणं आवश्यक आहे.तरच अनेकदा समोरचा मर्यादेत राहतो.नाहीतर आपल्या गोड स्वभावाचा फायदा घेऊन आपल्यालाच तोट्यात टाकायला या माणसांना वेळ लागत नाही.

So…Be careful…!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *