Skip to content

माझ्या मुड्स सांभाळण्यासाठी अशी एक व्यक्ती सोबत हवी… खरंतर ही केवळ तुमची कल्पना आहे.

माझ्या मुड्स सांभाळण्यासाठी अशी एक व्यक्ती सोबत हवी… खरंतर ही केवळ तुमची कल्पना आहे.


अपर्णा कुलकर्णी


मेहता कुटुंब तसे खूपच मोठे. म्हणजे जॉइंट फॅमिली असलेले. शिवाय पिढीजात व्यापारी असल्याने घरातील सगळेच पुरुष आणि कधी कधी महिलासुधा व्यवसाय करण्यासाठी हवी ती मदत करत असत. अधिरा ही मेहता कुटुंबाची सगळ्यात मोठी आणि लाडकी सून. अधिराचे वडील आणि अभिषेक गांधी याचे वडील व्यवसायामुळे एकमेकांना चांगलेच ओळखत होते. तसे त्यांचे व्यवसायामुळेच घरगुती संबंध पण होते. त्यामुळे अधीरा आणि अभिषेक एकमेकांना चांगलेच ओळखत होते शिवाय स्वभाव चांगलेच जुळून आले असल्याने लग्न ही सर्वांच्या संमतीने पार पडले.

पंडितराव मेहता यांना तीन मुले आणि एक मुलगी. अभिषेक सगळ्यात खूप मोठा होता. त्यानंतर अजय, सुजय आणि निशा ही मुलगी. शिवाय घरात काका, काकू, आजी आजोबा ही होतेच. आधिराच्या माहेरी पण मोठे कुटुंब असल्याने तिला सासरी काहीच जड गेले नाही. उलट एकाच गावात सासर, माहेर असल्याने शिवाय खूप माणसं असल्याने तिला कधीच एकटं वाटत नसे. माणसात वाढली असल्याने माणसांची सवयच होती तिला. तिच्या अवतीभोवती जितकी लोकं जास्त तितकीच अधिरा हसत खेळत रहात होती.

अधिराच्या लग्नाला दोन वर्षे झाली तरी पाळणा हलला नाही म्हणून, तिची ट्रीटमेंट सुरू होती. त्यालाही आता सहा महिने उलटून गेले होते पण अजूनही आनंदाची बातमी काही आली नव्हती. मेहता आणि गांधी फॅमिली म्हणायला सुशिक्षित नव्हती तर विचारांनी सुशिक्षित होती. त्यामुळे अधिराला कोणीही बोलून दाखवत नव्हते किंवा चेहऱ्यावरही तसे दिसू देत नव्हते. पण अधिराला त्या गोष्टी कळून येत. त्यामुळे बऱ्याचदा ही सल ती अभिषेक जवळ बोलून दाखवत असे. त्या त्या वेळी अभिषेक तिला खूप प्रेमाने समजावत असे.

अजयचे लग्न ठरले होते त्यामुळे घरात कामाची खूप गडबड होती. त्यात अधिरा मोठी असल्याने बऱ्याच जबाबदाऱ्या तिला पार पाडाव्या लागत होत्या. बघता बघता लग्नाची तारीख जवळ येऊन ठेपली होती. त्यात अधिरा काम करत असताना उलट्या करू लागली. सगळ्यांना वाटले, हीची कामामुळे धावपळ झाली आहे, नीट जेवण केले नसल्याने पित्त झाले असेल पण दोन तीन दिवस होऊन गेले तरीही त्रास कमी झाला नाही तेंव्हा मात्र डॉक्टरांना दाखवले आणि ज्याची अधिराच काय पूर्ण मेहता आणि गांधी कुटुंब वाट बघत होते, तो क्षण आला.

अधिरा आणि अभिषेक आई बाबा होणार होते. त्या दिवसापासून अधिराला कोणीही घरातले एकही काम करू दिले नाही. उशिरा आनंदाची बातमी आल्याने तसेच तब्येत जरा नाजूक असल्यामुळे दोन्ही कुटुंब तिच्या आसपास रहात होते. तिला काय हवं काय नको बघत होते. सतत तिच्याच जवळ रहात होते. अभिषेकने पण कामाचा व्याप बराच कमी केला होता. त्यामुळे प्रेग्नेन्सी दरम्यान होणारे मुड स्विंग जाणून घेऊन त्यानुसार वागत होता.

अधिराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि सगळ्यांना खूपच आनंद झाला. मेहता कुटुंबात इतक्या वर्षांनी मुलगी झाल्यामुळे तिचे आणि आधीराचे खूप जास्त लाड झाले. अधिरा मुलीच्या संगोपनात अधिराचा वेळ छान जात होता. पण घरात बरीच मंडळी असल्याने फारसे काम तिच्या वाट्याला येत नसे. अधिराची मुलगी अनुष्का कशी मोठी झाली हे तिचं तीलाही समजले नाही.

हातोहात तिला कोणीही घेऊन जात असे कधी दुकानात तर कधी घरात. त्यामुळे आधीराचा बराच वेळ रिकामा रहात होता. डिलिव्हरीमुळे तिची तब्येत जरा नाजूक झाली होती. प्रेगनेन्सी दरम्यान घरच्यांनी जशी माझी काळजी घेतली, आसपास राहिले, माझे मुड सांभाळले तसे आता त्यांचे माझ्याकडे लक्ष राहिले नाही असेच तिला वाटत होते. अभिषेकच्या कामाचा व्याप त्याने वाढवला होता त्यामुळे त्यालाही काही सांगता येत नव्हते. वेळच मिळत नव्हता.

त्यामुळे अधिराची चिडचिड होत होती. एकदा सकाळी सगळे एकत्रित नाश्ता करत असताना तिने ही सल बोलून दाखवली आणि तिच्या बोलण्यामागचा हेतू पंडितराव मेहातांना लगेच समजला. ते म्हणाले, अधिरा आपले कुटुंब खूप मोठी आहेत, माणसांचा राबता आहे तसाच व्याप ही मोठा आहे. मध्यंतरी तुझी काळजी घेणं आणि तुझ्यासाठी कोणी ना कोणी सतत उपलब्ध असणं ही गरज होती. आता ही ती असेलच. मुल झाले म्हणजे आता तुझी गरज नाही किंवा तुझ्या विषयी काळजी नाही असे अजिबात नाही.

पण अनुष्का पोटात असताना तुला तुझे मुड सांभाळण्यासाठी माणसांची सवयच लागून गेली आहे. आताही घरात ठराविक माणसे असतातच. पण तुझ्या मुडसना सांभाळणारे कोणी नाही याची तुला खंत वाटत आहे. तू आजारी असलीस, किंवा काही अडचण आली तर व्यवसाय सोडून इथे आम्ही नक्कीच थांबू ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी पण तुझा मुड सांभाळण्यासाठी नाही. तुला जे वाटतं ना, माझ्या मुड्स सांभाळण्यासाठी अशी एक व्यक्ती सोबत हवी… खरंतर ही केवळ तुझी कल्पना आहे. असे होऊ शकत नाही, मी तर म्हणेन त्याची गरजच नाही. हे समजून घे आणि त्याप्रमाणे वाग.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!