Skip to content

टोकाकडील यश किंवा प्रगती काही वेळेस तुम्हाला एकटेपणाकडे घेऊन जाते.

टोकाकडील यश किंवा प्रगती काही वेळेस तुम्हाला एकटेपणाकडे घेऊन जाते.


हर्षदा पिंपळे


एकटेपणा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा जणू एक भागच.एकटेपणा माहीत नाही असा एकही मनुष्य आपल्याला सहज दिसणार नाही. प्रत्येकजण एकटेपणाला अगदी जवळून ओळखत असावा असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही.एकटेपणा जरी कॉमन फॅक्टर असला तरीही या एकटेपणाची प्रत्येकाची कारणं मात्र निरनिराळी आहेत.कुणाला कशामुळे एकटेपणा वाटेल काही सांगता येत नाही.कुणी कधी अर्ध्यावर साथ सोडून गेल्यामुळे एकटेपणा येतो तर कधी कधी गर्दीतही एकटेपणा जाणवतो.

तर कधी कधी आपल्याच काही समस्या आपल्या एकटेपणाला जबाबदार असतात. अतिचिंता, निराशा वगैरे या गोष्टींमुळेही एकटेपणा जाणवतो. पण काही अशाही अजून गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकटेपणाकडे घेऊन जातात.जसे की टोकाचं यश किंवा प्रगती. या गोष्टीही काहीवेळेस माणसाला एकटेपणाकडे घेऊन जातात.

तर,प्रत्येकाचं मत यावर वेगळं असू शकतं.पण मला असं वाटतं की,कोणतही यश किंवा प्रगती छोटी मोठी अशी नसतेच.यशाला मापदंड नसतं.आणि प्रगतीला कधीच पूर्णविराम नसतो.माणूस श्वास चालू असेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सातत्याने प्रगती करत राहतो.किंवा नेहमीच प्रगती कोणत्या रितीने चांगली होईल याचा तरी विचार करत असतो.

आणि यशाविषयी बोलायचं झालं तर जसजशी प्रगती वाढत जाते तसतसं यशाचे किनारे आपणहून आपल्याला भेटायला येत असतात. पण यामध्ये एकच की,माणूस कायम धडपडत असतो.टोकाच्या यशासाठी, प्रगतीसाठी ! आणि इतकच नाही तर सगळं मिळालेलं असतानाही तो पुन्हा धडपडतच असतो.स्वतःला शोधण्यासाठी !

आणि या दोन्हींमुळे तो कळत नकळतपणे एकटेपणाकडे वाटचाल करत असतो.

एक मनुष्य आयुष्यातील सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड करत असतो.खरं तर जन्माला आल्यापासूनच त्याची धडपड सुरू झाली असते.रांगण्यासाठी, चालण्यासाठी, बोलण्यासाठी! आणि नंतर मात्र हळुहळू त्याच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास सुरु होतो.यश,प्रगती, अपयश, नैराश्य, एकटेपणा अशा शब्दांचे अर्थ त्याला कळायला लागतात.

साधारणपणे यश कोणत्या प्रकारचं असतं तर,शाळेतून पास होण्यापासून ते पुढे जाऊन मोठ्ठ काहीतरी बनण्यापर्यंत.पाच रूपयापासून ते करोडो रूपयापर्यंत.नोकरीपासून व्यवसायापर्यंत. मैत्रीपासून प्रेमापर्यंत.अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये माणसाला यशस्वी व्हायचं असतं.सातत्याने त्यात प्रगती करायची असते. नाही म्हंटलं तरी या काही साध्या सोप्या गोष्टी नाहीत. पहील्याच प्रयत्नात माणसाला नेहमीच यश मिळेल अशी काही शाश्वती नाही.

कधी सलग अपयशही येऊ शकतं.कधी कधी प्रगती खुंटू शकते.आणि या गोष्टी चॉकलेट खाण्याइतक्या सोप्या मुळीच नाही. यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. येणारं सगळं अपयश पचवावं लागतं.पुन्हा नव्याने उभं रहायला लागतं.तर इतकं सगळं करताना माणूस अक्षरशः दमतो.

कळत नकळतपणे त्याचं स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होतं.सतत यशाच्या, प्रगतीच्या मागे धावता धावता तो स्वतःचीच दमछाक करून घेतो.नकोसं होतं हे सगळं.शारीरिक आणि मानसिक ताण जाणवायला लागतो.सतत तेच तेच करून सगळ्याच गोष्टींवर ताण येतो.आणि याच ताणतणावामुळे एकटेपणाला सहज निमंत्रण मिळतं.

तर कधी कधी काय होतं,काहीतरी करून दाखवायचं या विचाराने माणूस पेटून उठतो.उदाहरण सांगायचं झालं तर…[एखादा युपीएससी किंवा काठिण्य पातळीवरील परीक्षा देणारा विद्यार्थी.] काही अपवाद वगळता कितीतरी विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत राहतात.रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र झालेलीही त्यांना कळत नाही.ना खाण्यापिण्यात लक्ष ना की अजून कशात.या मुलांच लक्ष केवळ त्या पुस्तकात असतं.त्या पुस्तकातून यांच डोकं सहसा वर येतच नाही.इतके गढून जातात ही मुलं की त्यांना स्वतःचं भानच उरलेलं नसतं.पण त्यांच्या अशा वागण्यामुळे एकटेपणा त्यांना सहज जवळ करतो.

कारण काय तर..अनियमित झोप, कमी झोप,सातत्याने एकच गोष्ट करणे,चहा/कॉफीचे अतिसेवन,अनियमित आहार,खूप वेळ एकटे राहणे अशा अनेक गोष्टी या एकटेपणाला कारणीभूत ठरतात.

ही झाली एक बाजू….तर दुसरं असं की,

कधी कधी माणूस हे टोकाचं यश गाठतो.त्याच्याकडे सगळं असतं.पैसा वगैरे सगळं असतं.परंतु हे सगळं मिळवताना झालेली आधीची दमछाक त्याला कुठेतरी अस्वस्थ करते.कारण काहीतरी मिळवण्यासाठी त्याने कितीतरी गोष्टींचा त्याग केलेला असतो.कालांतराने सगळं असूनही त्याला मागच्या गोष्टी सातत्याने आठवत राहतात. आणि यामुळे त्रास होतो.शेवटी पुन्हा एकटेपणा जाणवतो.

थोडक्यात काय तर…माणूस इतका धडपडतो खरा…पण शेवटी, टोकाकडील यश किंवा प्रगती काही वेळेस त्याला एकटेपणाकडे घेऊन जाते.

असो,आयुष्य आहे म्हंटल्यावर हे घडायचचं.आपण मात्र अशावेळी आपली काळजी घेणं आवश्यक असतं.एकटेपणा जाणवायला लागला की खचून न जाता वेळीच सावरायचं असतं.तितकं कणखर तर प्रत्येकाने व्हायलाच हवं.

एकटेपणाला दूर करून एकांत जगता यायला हवा.बस् बाकी आयुष्य खूप सुंदर आहे.ते भरभरून जगायचं,कधी इतरांसाठी कधी स्वतःसाठी !


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!