Skip to content

कोणीतरी आपलंच आहे ही भावना सुरुवातीला छान वाटते पण नंतर त्रास देते.

कोणीतरी आपलंच आहे ही भावना सुरुवातीला छान वाटते पण नंतर त्रास देते.


मेराज बागवान


नाती विश्वासावर आधारलेली असतात.प्रेम,काळजी,आपुलकी,संवाद यामुळे ती आणखी बहरतात, फुलतात.मग ह्या नात्यांमधून काही नाती खूपच आपलीशी होऊन जातात.आणि एके क्षणी ‘कोणीतरी आपलं आहे’ ही भावना मनात जागृत होते.ह्या भावनेमुळे माणसाला खूप छान वाटते.आयुष्य जणू पूर्ण झाले असेच काहीसे वाटू लागते.ही भावना दिवसेंदिवस वाढत जाते.’कोणीतरी माझंच आहे’ ह्या धुंदीत माणूस जगत असतो.पण कलांतराने हीच भावना माणसाला खूप त्रास देते.असे का बरे होत असेल? इतकी छान भावना निर्माण होऊन देखील ,त्रासाची मानसिकता का होत असेल?

‘कोणीतरी आपलंच आहे’ असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीवर आपण पूर्ण विश्वास ठेवलेला असतो.प्रेम निर्माण झालेले असते.त्या व्यक्तिशिवाय आयुष्याची कल्पना देखील करवत नाही. आपल्या बाजूने का होईना ,एक प्रकारचा ‘हक्कच’ जणू आपण त्या व्यक्तीवर गाजवत असतो.पण काही काळाने हेच स्वतःला खूप त्रासदायी ठरते.ह्याला कारणे विविध आहेत.तुम्हाला जशा त्या व्यक्तीबद्दल भावना आहेत तशाच भावना त्याच्या मनात असतीलच असे नाही.तुम्ही एके क्षणी गृहीत धरून चालता की , ही व्यक्ती माझीच आहे.पण वास्तविकता वेगळी असते.ती व्यक्ती तितकीशी तुम्हाला आपली मानत नसते.ती व्यक्ती काही तुम्हाला हे प्रत्यक्ष बोलून दाखवणार नाही.पण कालांतराने तुम्हालाच याची जाणीव होते आणि मग सुरू होतो तो ‘त्रास’.

ह्या सगळ्यात समोरच्या व्यक्तीची चूक काहीच नसते.पण वारंवार संपर्कात राहिल्याने तुम्ही मानून जाता की ‘कोणीतरी आपलंच आहे’.कधी त्या व्यक्तीने तुम्हाला नेहमी मदत केलेली असते. तर कधी गरजेच्या वेळी देवसारखी धावून आलेली असते. यामुळे तुमची त्या व्यक्तीबद्दल ही भावना तयार होते की, ‘ही माझी हक्काची व्यक्ती आहे’.पण खरे तर असे असतेच असे नाही.कारण ,प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि स्वतंत्र असते.तुम्ही किती जरी त्या व्यक्तीला आपले मानत असलात तरी ती तसाच विचार करेल असे नेहमीच होत नाही.तिला देखील तिचे तिचे आयुष्य असते,काही वेगळा दृष्टिकोन असतो. अणि ह्याच गोष्टीची जेव्हा तुम्हाला जाणीव होते,तेव्हा ‘आपलंच माणूस’ ही भावना नंतर त्रास देते.

काही व्यक्तींच्या तुम्ही सहवासात असतात, रोज काही ना काही बोलणे होते.तुम्ही हक्काने अनेक गोष्टी त्या व्यक्तीकडे व्यक्त करतात.तुमचे मन मोकळे करतात.काही वेळेस ती व्यक्ती तुमचे बोलणे खूप छान रित्या ऐकून घेते,त्यावर तिचे मत देखील सांगते.पण काही काळानंतर हे असे होणे बंद होते.त्या व्यक्तीला तुम्हाला दुखवायचे नसते.पण त्यांचे काही इतर ‘प्राधान्यक्रम’ असतात.तुमच्यासाठी जरी ती व्यक्ती ‘प्रथम प्राधान्य’ असणारी असेल तरी देखील त्या व्यक्तीसाठी तुम्ही तसाच प्राधान्यक्रम असलाच असे नाही.मग हळूहळू तुमच्या हे लक्षात येते आणि मग तुम्हांला त्रास होऊ लागतो.

कोणालातरी ‘आपलं’ मानणं ही खूप छान, सुंदर आणि सकारात्मक भावना आहे.ही भावना दाखवून देते की तुम्ही खरेच माणूस आहात आणि तुमच्याकडे ‘कृतन्यतेची’ भावना आहे.इतरांना तुम्ही आदर देतात,किंमत देतात हे यातून दिसून येते.पण ह्या भावनेच्या ओघात किती आणि कुठपर्यंत वाहत जायचे हे प्रत्येकाने प्रत्येकाचे ठरवायचे असते. कारण ,नंतर नंतर ह्या भावनांचा खूप त्रास होतो आणि मानसिक आरोग्य बिघडते.ते म्हणतात ना ,’अति तिथे माती’ अगदी तसेच.

तुम्ही ज्यांना आपले मानता ती व्यक्ती जेव्हा तुमच्यापासून दूर राहू लागते, तेव्हा तुम्ही बैचेन होतात.तुम्हाला वाटते, त्याला काही झाले तर नसेल ना? त्याचे सर्व ठीक असेल ना ? पण हा तुमचा विचार असतो.वास्तविकपणे पहायचे झाले तर, ती व्यक्ती तिच्या आयुष्यात मग्न असते. मात्र तुम्हाला त्रास होत राहतो.

आजकाल नाती इतकी ‘प्रॅक्टिकल’ होत चालली आहेत की, जो तो येतो,दुसऱ्याचा वापर करतो आणि निघून जातो. आणि विशेष म्हणजे कोणाला यात गैर काहिच वाटत नाही.आजच्या ह्या जमान्यात, भावना टिकवून नाती जपणारी माणसे जणू विरळच.अशा माणसांना यापुढे देखील जगात कितपत किंमत राहील याची काहीच खात्री देता येत नाही.पण भावना, नाती जपणाऱ्यांनो ,जरा स्वतःला सावरा, कुठपर्यंत एखाद्याच्या आयुष्यात राहायचे हे वेळीच ओळखा,त्रास तुमचाच कमी होईल.

तुम्ही ज्यांना ‘आपलं’ मानता ,त्यांच्या आयुष्यात राहण्याचा ‘प्रयत्न’ करा,पण ‘अट्टाहास’ करू नका.प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते. आणि प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी तुम्हाला बोलून दाखवेल, व्यक्त होईल अशी अपेक्षा ठेवू नका.आपण कोणीच सांगू शकत नाही की, समोरचा कोणत्या परिस्थितीमधून जात असेल. त्यामुळे ‘आपल्या माणसाचे’ आणि स्वतःचे मानसिक आरोग्य जपायचे असेल तर भावनांवर नियंत्रण हवे.

जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहायची असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत राहणारच.आणि जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधी राहणारच नव्हती ती काहीही झाले तरी कधीच राहणार नाही.हेच वास्तव स्वीकारणे गरजेचे आहे.जी व्यक्ती तुमची आहे ती नेहमी तुमचीच असेल आणि जी व्यक्ती तुमची नाही ती तुमची कधीच नसेल.ह्यालाच आपण नियती, नशीब, निसर्ग आणि विधात्याची मर्जी म्हणतो.

वास्तव स्वीकारा, भावना नियंत्रित करा आणि त्रासापासून स्वतःची काळजी घ्या !


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “कोणीतरी आपलंच आहे ही भावना सुरुवातीला छान वाटते पण नंतर त्रास देते.”

  1. Very nice article. It’s necessary to don’t waste time too much on others bcz they have their own identity. 🙏🙏👍🏻👌🏻💐💐

  2. खुप छान, भावनानं वर नियंत्रण ठेवणं खुप आवश्यक आहे. 👌🙏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!