Skip to content

सत्र चौदावे : सतत सेल्फी काढणे (Taking Continues Selfie)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)

सत्र चौदावे : सतत सेल्फी काढणे (Taking Continues Selfie)


आजकाल सेल्फी काढणे हा ट्रेंड सध्या खूप गाजतोय. एकदमच पाश्चिमात्य देशांमधून आलेला हा नवा ट्रेंड सध्या भारतीयांना खूप भुलवतोय. परंतु या आकर्षक गोष्टीबाबत जितके आपण संवेदीत आहोत तितक्याच वेगाने येणाऱ्या काही काळात आपल्याला दक्ष रहावे लागणार आहे. कारण त्याच पाश्चिमात्य देशांमध्ये “सेल्फी काढणे” या वर्तनाचे रूपांतर विकृतीमध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजेच आजचा लेख पुढे येणाऱ्या परिणामांना आत्ताच सावध राहण्यास आपल्याला सूचित करतोय, असे म्हणणे उचित ठरेल. हाच उद्देश ठेऊन आजचा लेख लिहावासा वाटतोय. केस वाचल्यावर आणखीन काही गोष्टी उघडकीस होतील.


केस :
१) निलीमा लग्नाअगोदर पटकन इतरांमध्ये मिसळत असे. परंतु लग्नानंतरच्या ६ महिन्यातच निलीमा एकलकोंडी झाली. सभोवताली संवाद करणारी व्यक्ती कोणीही नसल्याने निलीमा दिवसभरात ५० सेल्फी काढून सोशल मीडियावर पाठवते.
२) अनिल काका वय ५२ वर्षे, सतत त्यांना मी इतरांमध्ये किती सहज मिसळतो हे इतरांना दाखविण्याची खूप हौस असे. म्हणून ते सतत ऑफिसमध्ये, गार्डनमध्ये लहान मुलं खेळताना उगाचच सेल्फी काढत असे, अगदीच ज्यादिवशी सेल्फी काढण्यास कुणी व्यक्ती मिळत नसे तेव्हा ते फोटो एडिट करून कृत्रिम व्यक्ती त्यात बसवत असे. त्यांच्या या वर्तनामागचे कारण शोधल्यास असे आढळले की एकदा बायकोसोबतच्या भांडणात बायकोचे “तुम्ही आयुष्यात कधीच कोणासोबत आनंदी राहू शकत नाही” हे वाक्य मानसिक आघातासारखे त्यांच्या जिव्हारी लागले.
३) सुजय आणि रोहिणी सख्खे भाऊ-बहीण दिवसभरात सोशल मीडियावर ६०-७० सेल्फी पाठवतात. त्या दोघांमध्ये एक स्पर्धाच लागलेली असते की तुझ्यापेक्षा मलाच जास्त लाईक्स मिळतील, या लाईक्स मिळविण्याच्या भानगडीत एकाच पोसिशनवरून एकावेळी १०-१२ ते क्लिक करतात. यावरून कित्येकदा त्यांची भांडणं सुद्धा होतात. त्यांच्या या केमिस्ट्रीचे कारण असे आढळले की लहानपणापासून त्यांनी आपल्या आई-बाबांना एका विषयावर एकमतापेक्षा भांडणांचाच अनुभव जास्त घेतला आहे.


लक्षणे :
१) या आजाराच्या सर्वच प्रकारात व्यक्तिचा स्व: आदर कमी, स्वतःला कमी लेखने, कोणीही समजून घेत नसल्याची तक्रार, आत्मविश्वास कमी, स्पर्धेच्या जगात बाहेर फेकले जाण्याची भिती इ लक्षणे आढळून येतात.
२) अशा व्यक्ती कधीही उठसूट कोणत्याही वेळेला सेल्फी काढतात, अगदी काही व्यक्तीगत गोष्टींचेही उघड्यावर प्रदर्शन मांडतात.
३) सेल्फी काढण्याची तीव्र भावना जागृत होऊन ज्यावेळी काही कारणास्तव ते करता येत नसेल तर अश्या व्यक्ती अस्वस्थ होतात. काही काळ त्यांचे भान हरपून जाते.
४) सेल्फी काढून त्वरीत त्याची रंगरंगोटी करून सोशल मीडियावर पाठविणे आणि सारखे किती लाईक्स मिळाले याकडे  नजर असणे, तसेच अपेक्षेनुसार लाईक्स न मिळाल्यास पुन:पुन्हा सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पाठवत राहणे, यामध्येच त्यांचा संपूर्ण दिवस जातो.


कारणे :
१) सभोवताली कोणीही आपुलकीची व्यक्ती नसल्यामुळे तसेच स्वतःबद्दल अतिप्रेम आणि अभिमान असल्यामुळे अश्या व्यक्तींच्या ठिकाणी हा विकृत प्रकार जन्म घेतो.
२) सोशल मीडियाद्वारे सेल्फी काढण्याला ज्या पद्धतीने प्रोत्साहीत केले जाते, जणू ते एकांत दूर करण्याचे आणि स्वतःबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचे साधनच बनले आहेत आणि आपल्या सभोवताली स्वतःला एकट्या म्हणवीणाऱ्या  आणि स्वतःवर जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्ती कमीच थोडी आहेत.
३) ज्या व्यक्तींची लहानपणापासून स्वतःचे कौतुक ऐकण्याची मानसिकता बनलेली असते, अश्या व्यक्तींना अश्या पद्धतीचा आजार पटकन जडण्याचा धोका उद्धभवतो.
४) सोशल मीडियाला अति आहारी गेलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार उद्भवू शकतो.
५) काही व्यक्ती जीवनाला इतके कंटाळलेले असतात, इतके त्रस्त झालेले असतात की जगासमोर ते आपला हसरा मुखवटा आणू इच्छितात, असे केल्याने त्यांना काही काळ समाधान मिळते.


उपचार :
१)  अश्या व्यक्तींच्या ठिकाणी काही चुकीच्या समजुतींनी जन्म घेतलेला असतो. सर्वप्रथम या सर्वांची जाणीव व्यक्तीला करून दिली जाते, कारण अशा समजुतींमुळेच इतरांनी त्यांना बाजूला सारलेले असते.
२) सतत सेल्फी काढण्याचे मूळ कारण समजून घेऊन उपचाराची दिशा ठरवली जाते.
३) स्वः आदर वाढविण्यासाठी आणि स्वः संकल्पना विकसित करण्यासाठी अशा व्यक्तींना कौशल्य तंत्रे शिकवली जातात.
४) आयुष्यात कधीना कधी पुष्कळ वर्ष एकटेपणा येऊनही भरारी मारणाऱ्या व्यक्तींचे आदर्श अशा व्यक्तींसमोर ठेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते.
५) हवाहवासा संवाद समुपदेशकाकडून पुन्हा मिळू लागल्यामुळे त्यांच्या ठिकाणी तार्किक विचारसरणी विकसित होते.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते .

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)

धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!