Skip to content

नेतृत्व गुणांविषयी थोडक्यात, पण शास्त्रीय माहीती !

मोहन पाटील
mohan.patil.2606@gmail.com
           
नेतृत्तवगुण प्रत्येकात दडलेले असतात, ते कर्तृत्वाने फुलवायचे असतात.जबाबदाऱ्यांचं भान राखत बऱ्यावाईट घटना- परिणामांची संपूर्ण जबाबदारी   स्वीकारत, निभावून नेणे म्हणजे नेतृत्व .

जबाबदारी आणि स्वातंत्र्य यांचा समतोल राखणारी नेतृत्व ही तत्त्वप्रणाली असते . संकटाना- समस्यांना संधी मानून, धीराने सामोरे जात, वाट्याला आलेल्या कोणत्याही परिस्तिथीला’ जाणीव पूर्वक- प्रयत्नपूर्वक तोंड देते ते नेतृत्व .

        
अंगावर पडलेल्या लहान-मोठ्या प्रत्येक जबाबदारीला, झोकून देत, प्रखर आत्मविश्वासाने न्याय देण्याची वृत्ती म्हणजे नेतृत्व .

 नेतृत्वाला स्वतःची कुटुंबाची, सहकाऱ्यांची  बलस्थाने उणीवा- कमतरतांची पूर्ण जाण असावी.  प्रत्येकाचा पिंड , प्रकृती , स्वभाव , संस्कार,कौशल्य वेगळे असतात , त्यानुसार त्यास हाताळावे, जबाबदारी द्यावी. कारण आवडीच्या कामालाच माणूस पूर्ण न्याय देतो.

 नेतृत्वाने जबाबदारी, बांधिलकी व वास्तवाचे भान राखून,कडकशीस्त , कर्तव्यकठोरता बाळगत,स्वतःची तत्व- विचारधारा जोपासत, प्रसंगी ज्यांना लवचिकता दाखवता येते,उत्तम नेतृत्व त्यांनाच जमते .

 महान संकटातही जे सद्भाव सोडत नाहीत, शांत- स्थिरचित्त राहतात, समस्येतून मार्ग काढण्याकरिता, एकाहून अनेक पर्यायांचा शोध घेतात, समस्यांचे रूपांतर संधीत करतात, सतत जागरूक राहून आपल्या व सहकाऱ्यांच्या ऊर्जेचा  सकारात्मक, पुरेपूर वापर करतात, योग्य ठिकाणी योग्य विचार करून योग्य निर्णय घेतात- कृती करतात, ते नेतृत्वास समर्थ ठरतात .

चाकोरीबाहेर विचार करून, नव्याचा ध्यास घेत, वेगळेपण सिद्ध करते ते नेतृत्व. प्रत्येक घटना, समस्या , सहसदस्यांचे यशापयश , चुका तरलतेने स्वीकारत, उमदेपणाने मार्ग काढते ते नेतृत्व .

 नेतृत्व दोन माणसांचे , दोनशेंचे असो वा दोन लाखांचे, तसेच ते कुटुंबाचे, संस्थेचे किंवा संघटनेचे असो, अथवा नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणचे, प्रत्येक गोष्टीची जबाबदारी गांभीर्याने शिरावर घेत,जे धीराने सामोरे जातात,आत्मभान राखत- संवेदनशीलतेने मार्ग काढतात, ते नेतृत्व करण्यास योग्य ठरतात .

 सहकाऱ्यांच्या कौशल्यावर , क्षमतेवर विश्वास दाखवत, चांगल्या कार्याची वेळीच दाखल घेत, तात्काळ पोचपावती देऊन प्रशंसा करतात , प्रोत्साहित करतात , मौनधैर्य वाढवतात, ते नेतृत्वकुशल असतात .

         
अभ्यासूवृत्ती,नाविन्याचा ध्यास , कठोरशीस्त , संयम , उत्तम व्यवस्थापन , प्रयोगशीलता , जबर आत्मविश्वास , प्रामाणिकता उदारता , सकारात्मकता, चिकाटी,उत्तम संवादकौशल्य हे नेतृत्वाचे अलंकार असतात .
      
यशाचं श्रेय इतरांना देत, अपयश पदरात घेतात आणि जे क्षमाशील असतात, चुकल्यास माफी मागण्याची उदारता,मोठेपणा दाखवतात , ते नेतृत्वाचे हकदार असतात .

नेतृत्व कौशल्य आणि नेतृत्वाची सक्षमता यांचे मूल्यमापन, सफलतेवरून ठरत असते . नेतृत्वाने खुलासे करायचे नसतात तर ‘रिजल्टस’ द्यायचे असतात. कारण,यश खुलाशांनी नव्हे, कृतीने मिळत असते.

 नेतृत्वाने स्वतः उत्साही राहून इतरांना प्रोत्साहित करायचे असते.प्रोत्साहन दिले की, सामान्य माणसे देखील असामान्य कर्तबगारी बजावतात .

 नेतृत्वाने स्मार्टवर्क करायचे असते. करून घेण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. नेतृत्वाचा आदरयुक्त धाक जरूर असावा मात्र भीती वाटता काम नये .

आपले विचार ,ध्येय निश्चित असावे.भविष्यातील योजना, विकास मार्गातील अडचणी , याविषयी सहकाऱ्यांशी आवश्यक तितका संवाद ठेवावा.
   
जे क्षमाशील असतात, चुकल्यास माफी मागण्याची उदारता दाखवतात ,अपयश पदरात घेत, यशाचं श्रेय इतराना देतात, ते नेतृत्वाचे हक्कदार ठरतात.

आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत फेसबुक समूहाला भेट द्या आणि सामील व्हा !
https://www.facebook.com/groups/aapall.manasshastra

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!