Skip to content

एकांतात राहून स्वतःला हे १० प्रश्न नक्की विचारा!

माणूस दिवसभर अनेक लोकांशी बोलतो. कुटुंब, मित्र, नातेवाईक, सहकारी अशा अनेक व्यक्तींशी आपला संवाद सुरू असतो. आपण इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडतो आणि अनेकदा त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवतो. मात्र, या सगळ्या धावपळीत आपण स्वतःशी शेवटचं कधी बोललो होतो, हेच आपल्याला आठवत नाही.

खरं तर, इतरांशी संवाद साधण्याइतकाच स्वतःशी संवाद साधणंही महत्त्वाचं असतं. यासाठी नेहमी कोणाची साथ, मार्गदर्शन किंवा सल्ला आवश्यक नसतो. कधीकधी शांत एकांत आणि स्वतःच्या विचारांसोबत घालवलेला थोडासा वेळ आपल्याला स्वतःची नव्याने ओळख करून देऊ शकतो.

मानसशास्त्रात स्वतःच्या विचारांचे, भावना आणि वर्तनाचे निरीक्षण करण्याच्या प्रक्रियेला Self-Reflection म्हणजेच आत्मचिंतन असं म्हटलं जातं. या प्रक्रियेमुळे आपल्या भावनिक गरजा, विचार करण्याची पद्धत, निर्णय आणि वर्तन यांची जाणीव होण्यास मदत होते.

म्हणूनच, दिवसातील काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. शांत बसा आणि स्वतःला काही प्रश्न विचारा.

पहिला प्रश्न म्हणजे, मी सध्या खरोखर आनंदी आहे का?

आपण अनेकदा आनंदी असल्याचं इतरांना दाखवतो. हसतो, बोलतो, काम करतो; पण मनाच्या आत नेमकं काय सुरू आहे, हे स्वतःलाही सांगत नाही. त्यामुळे स्वतःच्या भावनिक स्थितीकडे प्रामाणिकपणे पाहा. तुम्ही खरोखर आनंदी आहात की फक्त परिस्थितीशी जुळवून घेत आहात, हे समजून घ्या.

दुसरा प्रश्न म्हणजे, मी स्वतःसाठी पुरेसा वेळ देतो का?

आपण इतरांसाठी वेळ काढतो, त्यांच्या समस्या ऐकतो आणि त्यांच्या गरजांना महत्त्व देतो. मात्र, स्वतःच्या आवडी, छंद आणि मानसिक विश्रांतीकडे दुर्लक्ष करतो. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. उलट, स्वतःची काळजी घेण्याची ती एक महत्त्वाची पद्धत आहे.

तिसरा प्रश्न म्हणजे, मी कोणाच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जगत आहे का?

कधी कधी आपले निर्णय आपल्या इच्छेनुसार नसतात, तर लोक काय म्हणतील या भीतीतून घेतलेले असतात. सतत इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच्या गरजा विसरतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातील किती निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतले आहेत, याचा विचार करा.

चौथा प्रश्न म्हणजे, माझ्या मनात कोणत्या गोष्टींचा सर्वाधिक ताण आहे?

अनेकदा आपल्याला अस्वस्थ वाटत असतं, पण त्यामागचं नेमकं कारण समजत नाही. अपूर्ण कामं, आर्थिक चिंता, नात्यांमधील गैरसमज किंवा भविष्याची भीती यांमुळे मानसिक ताण वाढू शकतो. आपल्या चिंतांची ओळख करून घेतल्यास त्यावर योग्य मार्ग शोधणं सोपं होतं.

पाचवा प्रश्न म्हणजे, मी स्वतःला खरोखर स्वीकारलं आहे का?

आपल्या चुका, कमतरता, दिसणं, स्वभाव किंवा भूतकाळातील अपयश यांमुळे अनेकदा आपण स्वतःवर नाराज असतो. मात्र, स्वतःचा स्वीकार म्हणजे स्वतःमधील कमतरतांकडे दुर्लक्ष करणं नाही. तर त्या समजून घेऊन स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी ठेवणं होय.

सहावा प्रश्न म्हणजे, कोणत्या गोष्टी मला वारंवार दुखावतात?

काही व्यक्तींचं वागणं, काही शब्द किंवा विशिष्ट परिस्थिती आपल्याला वारंवार भावनिक त्रास देतात. त्यामागील कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या भावनिक प्रतिक्रिया समजल्या की स्वतःच्या मर्यादा निश्चित करणं आणि योग्य पद्धतीने व्यक्त होणं सोपं होतं.

सातवा प्रश्न म्हणजे, मी माझ्या आयुष्यात नेमकं काय बदलू इच्छितो?

प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही बदल हवा असतो. कोणाला सवयी बदलायच्या असतात, कोणाला नात्यांमध्ये सुधारणा करायची असते, तर कोणाला स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं असतं. मात्र, बदलाची सुरुवात करण्यासाठी आधी आपल्याला काय बदलायचं आहे, हे स्पष्ट असणं आवश्यक आहे.

आठवा प्रश्न म्हणजे, मी स्वतःशी किती प्रामाणिक आहे?

इतरांसमोर आपण अनेक गोष्टी लपवू शकतो; पण स्वतःपासून सत्य लपवणं अधिक कठीण असतं. आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही, एखादं नातं त्रासदायक वाटतं किंवा एखादा निर्णय चुकीचा असल्याची जाणीव असते. तरीही आपण स्वतःची समजूत काढत राहतो. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहायला शिका.

नववा प्रश्न म्हणजे, मी माझ्या भूतकाळातच अडकून राहिलो आहे का?

जुन्या चुका, अपमान, अपयश आणि नकारात्मक अनुभव यांचा विचार करत राहिल्यामुळे वर्तमानातील आनंद हरवू शकतो. भूतकाळातील अनुभव आपल्याला शिकवण्यासाठी असतात, आयुष्यभर शिक्षा देण्यासाठी नाहीत. त्यामुळे स्वतःला भूतकाळातून बाहेर पडण्याची संधी द्या.

दहावा प्रश्न म्हणजे, पुढील पाच वर्षांनंतर मला स्वतःला कुठे पाहायचं आहे?

आपण अनेकदा रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंततो की आयुष्याला कोणती दिशा द्यायची आहे, याचा विचारच करत नाही. आपल्या स्वप्नांचा, ध्येयांचा आणि प्राधान्यक्रमांचा विचार करा. भविष्यातील स्वतःची कल्पना केल्याने वर्तमानातील निर्णयांना योग्य दिशा मिळू शकते.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट…

एकांत म्हणजे एकटेपणा नाही. एकांत म्हणजे काही काळासाठी बाहेरील गोंधळापासून दूर जाऊन स्वतःच्या मनाचं ऐकण्याची संधी.

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही. काही प्रश्न अस्वस्थ करतील, काही जुन्या आठवणी जाग्या करतील, तर काही नवीन विचारांची दारं उघडतील. पण स्वतःला प्रश्न विचारण्याची तयारी ठेवणं हीच आत्मचिंतनाची पहिली पायरी आहे.

लक्षात ठेवा, आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं आपण इतरांकडे शोधत असतो; पण स्वतःला समजून घेण्यासाठी कधीतरी स्वतःसोबत शांतपणे बसणंही गरजेचं असतं. कारण स्वतःची ओळख जितकी स्पष्ट होईल, तितकं स्वतःचं आयुष्य अधिक समजूतदारपणे जगता येईल.

धन्यवाद.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयु‌ष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”


सर्व लेख व्हिडिओच्या रूपात पहा.

👉🏽 क्लिक करा 👈🏽

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!