५ लाखाचा खळखळाट असावा, पण कोणाच्याही ५ रुपयाचा तळतळाट नसावा.
सोनाली जे.
मराठी मध्ये प्रसिद्ध म्हण आहेच
” ऋण काढून सण साजरा करायचा नाही.”
पैसा ही गोष्टच अशी आहे की ज्यातून चांगले चांगले relations बिघडतात..एखाद्या कडून पैसे घेतले आणि ते वेळेत परत द्यायला नाही जमले तर ज्याने दिले आहेत त्याची खूप तगमग होते..आपले पैसे परत मिळतील का नाही , तो परत देईल का बुडवेल अशी शंका मनात येवू लागते. त्याही पुढे जावून राग येतो , चिडचिड होते, आणि काही वेळेस असेही होवू शकते की त्याने ते काही adjustments करून दिले असतात.
त्यामुळे वेळेत पैसे परत नाही मिळाले तर चिडचिड होते, वाद होतात आणि मग काही वेळेस अपशब्द ही बोलले जातात. प्रत्येकाला आयुष्यात काही तरी करायचे असते. मोठी स्वप्ने असतात.कधी उच्च शिक्षण असेल, व्यवसाय करायचा असेल किंवा लग्न , मुलांची शिक्षण , मुलांची लग्न , परदेशी जाण्याचे स्वप्न , त्याकरिता पैशाची गरज ही भासते च..आपल्याला सुख मिळण्याकरिता आपण इतरांकडून पैसे घ्यायचे का? घेतले तरी ते वेळेत द्यावे लागतील.आणि काही कारणाने परत देता आले नाहीत तर..
समजा व्यवसायात फायदा होण्या ऐवजी नुकसानच झाले तर..ते घेतलेले पैसे परत कसे करणार ..जर ओळखीतून घेतले असतील तर बँकेचे व्याज देणे शक्य नाही म्हणून ओळखीतून ..पण जेव्हा ते घेतलेले पैसे व्यावसायिक नुकसान झाले असेल म्हणून आता लगेच देण्यास शक्य नसेल किंवा पुढे कधी देणार याची ही खात्री नसेल तर मग मात्र देणारा स्वतः ला ही दोषी समजतो कारण कशाला मी दिले त्याला पैसे ..मलाच समजत नव्हते ..अक्कल नव्हती असेही..किंवा समोरच्यावर चिडून , रागावून , सतत मागणी करून , तगादा लावून ही परतफेड करत नसेल तरी मग त्याला तळतळाट , शिव्या घालत असेल ..ऐपत नव्हती तर कशाला करावे नवीन काही सुरू..स्वतः बरोबर दुसऱ्याला कशाला डूबवावे असे अनेक प्रकारे बोलून , अपमान करून प्रसंगी आपले म्हणणारे ही पैशाकरिता खूप त्रास देतात..
अर्थात त्यांच्या ही ते मेहनतीचे असतात..कष्ट , त्याग मग कधी कुटुंबापासून दूर राहून पैसे कमविले असतील तर कधी स्वतः शारीरिक कष्ट घेवून , मानसिक त्रास सहन करून जसे एखाद्या ठिकाणी काम करत असताना सतत घालून पाडून बोलणारे असतात, तर कधी पाणउतारा, तर कधी कामाच्या पद्धतीवरून आरडा ओरडा असेल..
म्हणजे खरेच एखाद्याने कधी स्वतः पोटाला चिमटा घेवून पै आणि पै कमविले असेल ते केवळ आपल्या शब्दाखातर उचलून दिले असतील तर किंवा कधी खरेच देणाऱ्याला पैशाची अडचण असेल, नड असेल , अचानक ची संकटे , नैसर्गिक आपत्ती असेल, किंवा अपघात , आजारपण या करिता urgent रक्कम परत पाहिजे असेल आणि ज्याने घेतले त्याच्याकडे अजून जमा झाले नाहीत पैसे तर तो परतफेड करूच शकत नसेल तर देणारी व्यक्ती संतप्त होते..आणि तळतळाट देते..
याउलट काही लोकांचा स्वभाव असा असतो की आपल्याच लोकांकडे पैसा आहे ना मग आपल्याकडे नाही घ्या मागून आता पुढचे पुढे..स्वार्थापोटी ते आपल्या लोकांकडे आहेत ना तर घ्या मागून म्हणून घेतात मागून आणि त्यांना परत करावेत असेही वाटत नाही उलट त्यांना असेच वाटत राहते आहेत त्याच्या कडे एव्हढे पैसे त्याने थोडे दिले तर काय झाले..पण देणारी व्यक्ती हा विचार करून देते की आपल्याच माणसाच्या मदतीला उपयोगी पडतो आहे , आपण मिळाले पैसे की देतील परत..पण परत देण्याबद्दल समोरची घेणारी व्यक्ती विषय सुधा काढत नाही..किंवा विषय बदलते..नाहींतर शेवटीं मी कुठे पळून जाणार आहे का?? हा वर attitude..
देणाऱ्या व्यक्तीनं कमावलेले पैसे दिसतात या अशा लोकांना पण परत करताना मात्र त्याची ओळख ही दाखवत नाहीत..आहेत त्याच्याकडे पैसे म्हणून दिले त्याने पैसे. असेही वर विचार .पण ज्याने दिले पैसे त्याचे त्याग दिसत नाहीत..त्याची मेहनत जी पाण्याच्यावर तरंगणाऱ्या बर्फा एवढी दिसते मात्र पाण्याच्या खाली खोल वर असणारा बर्फाचा विशाल तुकडा दिसत नाही त्याला…या सगळ्याच गोष्टीतून साध्य काहीच होत नाही उलट जो पैसे देणार असतो त्यालाच दया आलेली असते..त्यात काय मोठें केले असेही उलट उत्तर..यातून देणारा मात्र शेवटी आपल्या मेहनतीचे मिळालेले फळ असे दुसऱ्याने कपटाने मिळविले म्हणून त्याला तळतळाट देतो..
पण खरेच जोपैसे घेणारा आहे त्याने देणाऱ्याला कधी तरी समजून घ्यावे, त्याची ही मेहनत आहे , कष्ट आहेत आणि त्याने हे कमाविण्याकरिता घेतलेले त्याग लक्षात घ्यावे ..देणाऱ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेवू नये..त्याचा आणि त्याच्या पोरा बाळांचा ही तळतळाट लागेल.कारण त्या देणाऱ्यांची. ही काही स्वप्ने असणारच ना..त्याच्याही काही इच्छा , आकांक्षा असणारच ना..
आपल्यात असे म्हणले आहेच की अंथरूण बघून पाय पसरावे..पण खरेच हा विचार आलाच पाहिजे की आपण पाय पसरण्याचा ताकदीचे तरी आहोत का नाही!!
अनेकदा आपले संस्कारक्षम मन , स्वाभिमान किंवा कोणतीही परिस्थिती आली तरी त्याला तोंड देण्याची तयारी , मानसिकता या गोष्टी किती हि अडचण असेल तरी दुसऱ्या कोणाकडून पैशाची अपेक्षा ही करत नाहीत किंवा दुसऱ्या कोणी मदत केली आणि आपल्याला ते वेळेत परत करता आले नाही तर म्हणून सारासार विचार करून , आणि परत घेवून कोणी तगादा लावण्यापेक्षा आपल्याकडे अगदी पाच लाखाचा खळखळाट असेल तरी कोणाच्या पाच रुपयाचा तळतळाट नसावा..असा विचार करतात.
ग. दि. माडगूळकर लिखित हे गाणे सगळ्यांनाच परिचित आहे.
पोटापुरता पैसा पाहिजे
नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो
दुबळी माझी झोळी
देणाऱ्याचे हजारो हात असले तरी माणसाने आपल्या झोळीची, कुवतीची काय ताकद आहे ते पाहावे. त्यामुळेच प्रपंच सुखी होईल, सुरळीत चालेल. टीचभर पोटाच्या वीतभर भूकेसाठी तळहाताएवढी पोळी पुरेशी असते. ती नियमित मिळावी त्यासाठी देवाने ऋतू चक्रात सातत्य राखावे. काळ्या आईने लेकरांची उपासमार होणार नाही इतपत धान्य पिकवावे.
आम्हाला महाल माड्या नकोत , तर डोक्यावर साधं छप्पर असलं तरी खूप झालं. फार भरजरी काही नको, गरजेपुरती वस्त्रं मिळाली की बास. गोठवणारी थंडी नको आणि कडाक्याचा उष्माही नको. देवा, जेवढं सोसेल, तेवढंच दे. तुझ्या मर्जीप्रमाणे तू आम्हाला रंक बनव वा राजा बनव. पण शेवटी पस्तावण्याची पाळी येऊ देऊ नकोस , म्हणजे झालं.
किती सार्थ पंक्ती आहेत यात..जगण्याचा मूलमंत्र च जणू दिला आहे या काव्य रचनेतून… आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागविण्यापुरते आम्हाला मिळाले तरी चालेल म्हणजे आजच्या या स्पर्धेच्या काळात कुठे ही द्वेष नाही , चढा ओढ नाही, स्पर्धा नाही की त्याच्याकडे हे माझ्या कडे ते नाही , कोणाबद्दल राग किंवा असूया ही नाही..भरजरी साड्या नकोत, महाल नकोत पण डोक्यावर छप्पर दे..किती समाधान हे..कशाचा हव्यास नाही…कोणती अवास्तव अपेक्षा नाही.
पण थंडी वाऱ्या पासून संरक्षण दे…त्यात कुठे महागडी उबदार वस्त्रे ही मागितली नाहीत पण थंडी आणि कडक उन्हाळा ही नको ज्यात आपण आपल्या शारीरिक क्षमता वर तग धरू शकू. पैशाचा हव्यास नाही..गरीब आणि श्रीमंत यात तुलना नाही..गरिबितही आनंदी राहता येते हाच मूलमंत्र तर दिला..
आपण च आपल्या गरजा वाढवीत असतो.अपेक्षा वाढवीत असतो आणि जे आहे त्याचा आनंद घेत नाहीच पण जे नाही त्याच्या मागे लागून आहे तो आनंद ही गमवून बसतो. आपल्या स्वतः ला आनंदी ठेवण्याची जबाबदारी ही आपली स्वतः ची च आहे.दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवली तर कधी तरी निराशा ही येणार च.
एक गोष्ट सांगते सगळ्यांनाच माहिती आहे ही..९९ डॉलर्स ..
एक गरीब शेतकरी , त्याची बायको , आणि एक मुलगा हे छोटे कुटुंब खूप आनंदात राहत होते..शेतकरी दिवसभर कष्टाची कामे करून घरी आल्यावर बायको मुला ची विचारपूस करत असे..बायको गरम गरण जेवायला वाढत असे आणि ते सगळे मग बाहेर गप्पा टप्पा मारत मस्त खेळत असतं..कधी कधी पतंग उडविणे, कधी इतर ही खेळ खेळत ..एकदा मुलगा फुगा घेवून देण्याचा हट्ट करतो तो शेतकरी लगेच फुगा घेवून देतो आणि ते सगळे फुग्या सोबत खेळले.दिवसभराच्या कष्टा नंतर पाठ टेकली की लगेच ते गाढ झोपत असत..
शेजारचा सावकार हे सगळे रोज बघत होता , तो म्हणतो हे एव्हढे गरीब आहेत तरी आनंदी कसे?मी एवढा श्रीमंत , माझ्याकडे एव्हढे शेत , गायी म्हशी शंभराच्या वर आहेत , पैसे , दागिने भरपूर आहेत पण रात्री झोप येत नाही असे का ? असे काय आहे की त्यांना चिंता नाही , ते गाढ झोपी जातात..आनंदी असतात ..कुटुंब एकत्र असते..
तेव्हा सावकाराचा मॅनेजर म्हणतो बघायचे आहे का बघा मग आज रात्री ..असे म्हणून गुपचूप एक ९९ डॉलर ची थैली त्या गरीब शेतकऱ्यांच्या दारा बाहेर ठेवतो .शेतकरी सकाळी झोपून उठल्यावर बघतो तर पैशाची थैली..मोजतो तर ९९ डॉलर..परत मोजतो , परत परत मोजतो पण ते ९९ च ..तो म्हणतो यातला एक डॉलर कुठे गेला? १०० डॉलर पाहिजे ना..म्हणून इकडे तिकडे शोधतो पण सापडत नाही..अस्वस्थ होतो आता अजून एक डॉलर कमवायचा असे म्हणून तो कामाला लागतो..मुलगा येतो खेळूया म्हणतो तर हा नाही म्हणतो ..काम आहे म्हणतो ..शेता मध्ये काम करतो पण म्हणतो आपल्याला अजून पैसे मिळवायचे आहेत.म्हणून मग तो सावकाराच्या ही शेता मध्ये काम करू लागतो..घरी वेळ कमी देवू लागतो..बायको मुलगा यांनी काही मागितले की पैसे नाहीत..अजून कमवायचे आहेत असे सांगतो , बायको मुलांचे छोटे आनंद ही हिरावून घेतो..पैसे कमावण्याच्या मागे लागल्याने किती ही कष्ट केले तरी रात्री झोप ही येत नाही कारण अजून पैसे मिळविण्याची चिंता..
तेव्हा सावकाराच्या लक्षात येते की अजून पैसा कमावण्याच्या नादात आपण ही , आपला आनंद , स्वास्थ्य घालवून बसलो अजून पैसा पाहिजे , अजून दागिने , अजून गायी म्हशी ही हव्यास वाढत च जाते आणि मनाची सुख , शांतता ही कमी होत जाते.
म्हणजेच काय तर कोणी ही शेतकऱ्याला जसे दिले तसे पाच लाख रुपये दिले तरी त्यात पाच रुपयाचा तळतळाट ही आपले मानसिक स्वास्थ्य , शिवाय देणाऱ्याचे ही आणि आपल्या कुटुंबीयांचे ही मानसिक स्वास्थ्य बिघडवत असते..
म्हणूनच जे आहे त्यात आनंद मानावा नाही ते मिळविण्याकरिता प्रयत्न करावा ..पण ते ही स्वबळावर .तरच स्वतः ही आनंदी राहाल आणि इतरांना ही आनंदी ठेवाल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


