हे नकारार्थी विचार आपला फायदा करून देतात.
मिनल वरपे
दुसऱ्यांना नाव ठेवणे, त्या व्यक्तिबद्दल नेहमीच वाईट बोलणे तसेच एखाद्याच्या वाईट गुणांची चर्चा करणे यापेक्षा एक चांगली गोष्ट आपण नक्कीच आवर्जून करू शकतो आणि ती म्हणजे कोणत्याही व्यक्तिमधले चांगले गुण ओळखून तेच चांगले गुण आपल्याकडे आहेत का हे शोधून पाहावे.
कारण कोणतीही व्यक्ती ही वर्तणुकीने कशीही असली तरी त्या व्यक्तीच्या स्वभावात नक्कीच असे चांगले गुण असतात जे पाहूनच त्या चांगल्या गुणांच आपल्याला आकर्षणं वाटते. अशा खूप व्यक्ती असतात ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते.
चांगल्या गुणांचे फायदे तर कायम असतातच. म्हणजे कोणी चांगलं वागत असेल, एखाद्याला चांगल्या सवयी असतील तर त्याला किंचित शारीरिक अथवा मानसिक त्रास होतात. चांगल्या गुणांची माहिती आणि गरज तर सर्वांनाच असते.
शिवाय एखाद्याकडे चांगले गुण असतील तर क्वचितच चर्चा होते. पण तेच एखाद्या व्यक्तीकडे वाईट गुण / सवयी असतील तर मात्र सगळीकडे त्याची चर्चा चालूच असते.
पण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यात वाईट गुणांचे सुद्धा फायदे किंवा त्यांचा उपयोग कुठे करता येईल याची माहिती मिळते. खरतर वाईट गुण कोणते तर ज्यामुळे आपल्याला आणि इतरांना कायमच त्रास होतो.पण हेच वाईट गुण कधीतरी चांगल्याप्रकारे सुद्धा वापरता येतात.
१) राग
राग म्हटल तर ज्यामुळे आपली मनस्थिती पूर्ण बदलते असा अवगुण.पण हाच राग जर अशा ठिकाणी वापरला जिथे त्याचा कायमच फायदा मिळेल तर उत्तम.
जे व्यक्ती दुसऱ्याचं वाईट करतात / चिंततात अशा व्यक्तींचा, माझ्याकडुन नेहमीच समोरचा दुखावला जातोय, मी हे ठरवलं होत पण जे काही ठरवतो तस मी काहीच करत का नाही, मी माझी काम प्रामाणिक पणे करणार या माझ्या ध्येयात मी का कमी पडतोय, या तशाच अनेक गोष्टींचा राग असेल तर अशा रागाचा आपल्याला कायम फायदाच होणार. कारण जी गोष्ट आपण खूप काही ठरवून सुद्धा करत नसू तीच गोष्ट आपण रागात अगदी प्राधान्य देऊन करतोच.
मग आपल्या चुकीच्या सवयी असो नाहीतर आपला असलेला चुकीचा स्वभाव पण त्याचा राग आला तर त्याच गोष्टी मनावर घेऊन आपण त्यापासून दूर राहू शकतो.
२) भिती
मला काळोखाची खूपच भिती वाटते, मला त्या व्यक्तीची भिती वाटते, मला अपयशाची भिती वाटते या सारख्या भिती असतील तर नक्कीचं चुकीचं आहे कारण अशा भीतीमुळे आपण आणि आपलं मन पूर्णपणे भरकटते पण तीच भिती जर चुकीच्या कामाची असेल..
तर आपल्याला शारीरिक त्रास नको या भितीने आपण नियमित व्यायाम करतोय पथ्य पाळतोय तर अशी भिती, मी नियमित अभ्यास केला नाही तर माझं नुकसान होईल ही भिती यासारखी भिती आपल्या मनात असेल तर आपण कायमच योग्य मार्गावर राहू.
३) चिंता
चिंता म्हणजेच काळजी करणे पण या चिंतेचे प्रमाण अति झालं तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतो. माझा मुलगा पास होईल की नाही म्हणून वर्षभर त्याची चिंता करत बसणे, शाळेत असतानाच मला चांगली नोकरी मिळेल की नाही याची जास्त चिंता करून वेळ वाया घालवणे, मुलीच्या लग्नाची तर कोणाला कामाची चिंता अशा चिंतेच्या विषयांमध्ये आपल्याला कायम त्रास होणार
पण तिचं चिंता ही तात्पुरती असेल तर चांगलं किंवा ती चिंता काही वेळापूर्ती असेल तर त्याचा त्रास होत नाही. कामाची मुलाखत असेल त्या वेळी, एखादी शस्त्रक्रिया असेल तर त्यावेळी असलेली चिंता, कधी केलं नाही अस काम आपण करत असू तर अशावेळी आपल्याला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना जाणवणारी चिंता यासारख्या चिंता म्हणजे काळजी असणे अस म्हणतात.
आणि अशा चिंतेमुळे कोणताही त्रास आपल्याला होणार नाही. पण कायमच चिंता करण्याचा स्वभाव हा शारीरिक आणि मानसिक आजारांना आमंत्रण देण्याचे काम करतो.
४) तिरस्कार
तिरस्कार करणे म्हणजेच कुठेतरी रागाच्या पलीकडची भावना. आपल्या personal कारणामुळे कोणाचा तिरस्कार करणे हा वाईट गुण असला तरी जर कोणी दुसऱ्याचं वाईट चिंतत असेल, चुकीच्या सवयी असतील जस चोरून ऐकणे, कोणाचं बोलणं चालू असेल तर अशावेळी मध्येच बोलणे, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे अशा सवयींचा तिरस्कार जाणवणे म्हणजे अयोग्य नसते.
५) आळस
आळस हा आपला शत्रू असावा हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलोय. आळस केला तर आपली काम वेळेवर होत नाही. सकाळी लवकर उठणे, वेळच्या वेळी काम करणे, नियमित व्यायाम , अभ्यास करणे या सवयींचा कंटाळा करणे म्हणजेच आळस.
पण हाच आळस जर आपण योग्य ठिकाणी वापरला तर चांगल असेल.जस की, आपल्याला सतत मोबाईल वापरण्याची म्हणजेच सतत फोनवर बोलणे, गेम खेळणे अशी सवय लागली असेल तर अशा सवयींचा आळस करणे उत्तम म्हणजेच सतत आपण तेच करतोय आता मला त्या मोबाईल वर बोलायचा , गेम खेळायचा कंटाळा आलाय अस झाल तर चांगलच.
कोणी बळजबरी एखाद चुकीचं काम आपल्याला सांगत असेल तर अशा कामांचा आळस असेल तर ते उत्तम. आळस हा योग्य ठिकाणी वापरता येणे महत्त्वाचं.
राग येणे, तिरस्कार करणे, आळस करणे, चिंता करणे, भिती या सर्वांची गणती आपण कायम वाईट सवयींमध्येच केली. पण या सवयी सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्यात कुठेतरी फायदा देणाऱ्या असतात. गुण/ सवयी हे चांगले असो वां वाईट ते वापरण्यावर ठरत असतात.
त्यामुळे ज्यांना आपण कायम वाईट गुण/ सवयी म्हणतो त्या आपण योग्य त्या ठिकाणी वापरल्या तर त्यांचा कोणताही त्रास आपल्याला न होता कायम उपयोगच होतो.



Very Nice.