हे करून पहा, आयुष्य चुकल्यासारखं वाटणार नाही.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
मी घालतो गवसणी
मनातल्या वेढ्यालाही….!!
मन…खरतरं मन वगैरे काही नाही मी उगाच जाऊन एक फेरफटका मारून येतो.खरच वेढा पडलाय मनाला की मनही नाटक करतय ते पहायला मी एकदा जाऊन येतोच.जायच नसतच मुळी तिथे पण मनाला मनाची लागलेली हुरहूर काही आपल्याला स्वस्थ बसू देत नाही म्हणून हा सगळा अट्टाहास…!!
आपल्या रोजच्या जगण्यातही आपण असच करतो , असच वागतो.मुळातच कित्येकांना स्वतःच्या आयुष्याची दिशा माहीत नसते.आणि कित्येकांना ती लवकर सापडतही नाही.आयुष्यात आपल्या दिशा अशा सहजासहजी ठरवता येत नाहीत.खरतर कुठे जायचय कुठे नाही हेच आपल्याला समजत नाही. आणि जर जिथे जायचही नाही त्या ठिकाणी जायचा आपण खूप विचार करतो.कळत नाही कधीकधी आपण असे का वागतो…? जि दिशा नकोय तिच्याच मागे का धावायच…?
आपण लहानपणी हे ऐकलच असेल की ‘ ज्या गावाला जायचच नाही त्या एसटीत बसायचच कशाला….? अगदी आयुष्याला तंतोतंत लागू होणारं हे वाक्य खूप काही सांगून जातं.
पण अनेकदा आपण ज्या दिशेला जायचच नाही त्याच दिशेचा खूप विचार करत बसतो. करिअर म्हणू नका की आयुष्यातील दुसरी कोणतीही गोष्ट असूद्या आपण सतत असाच विचार करतो.
आता करिअरच्या बाबतीत सांगायच झालं तर आपल्या करिअरच्या दिशा ठरवताना आपली आणि आपल्याबरोबर इतरांचीही दमछाक होते. कुणी सांगतं हे कर कुणी सांगत ते कर.त्याला भविष्यात जास्त स्कोप आहे. आणि तु करशीलच यात काही वाद नाही वगैरे वगैरे गोष्टी आपण ऐकतो.
पण अनेकदा आपल्याला मेडिकल / इंजिनिअरिंगला जाण्यात काहीच रस वाटत नाही.आपली इच्छा आपली आवड दुसऱ्याच क्षेत्रात असते.तरीही आपण इतर लोक काय सांगतात ते एकतो आणि त्याच दिशेने जायचा विचार करतो.तिथे गेलं तर खरच असं होईल का…तसं होईल का…? असं करत करत आपण विचारांच टोक गाठतो.पण शेवटी मात्र एकच असतं की मला त्या दिशेला जायचच नाही हे मत ठाम असतं.कदाचित आपल्याला स्वतःला नक्की काय हवय हे समजण्यासाठीच आपण कळत नकळतपणे ज्या दिशेला जायचच नाही त्या दिशेचा विचार करत असणार असं वाटतं.
करिअर व्यतिरिक्तही आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात.असंख्य अडचणींना आपण सामोरे जात असतो.कुणाचे प्रॉब्लेम्स काय असतील हे ठामपणे आपण सांगू शकत नाही. कारण प्रॉब्लेम्स कोणत्याही प्रकारचे असू शकतात. कुणाचे आर्थिक , सामाजिक , वैयक्तिक , व्यावसायिक अगदी कोणतेही प्रॉब्लेम्स असू शकतात. पण अशा अडचणी आल्यानंतर कधीकधी आपण दुसऱ्याच दिशेने विचार करतो.खरतर त्या दिशेला जायच नसतच पण का कोणास ठाऊक आपण तसाच विचार करतो.आपल्याला अनेकदा माहीत असतं की या या दिशेने गेलं तर हे हे शक्य होईल पण तरीही आपण तिथेसुद्धा माघार घेऊन दुसऱ्या बाजूने विचार करतो.
आपण कधी असा विचार करतो का…की आपल्याला ज्या दिशेला जायचच नाही त्या दिशेचा आपण विचार करतो.त्यामध्ये आपला कितीतरी वेळ खर्च होतो.मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताकद आपण त्यामध्ये “invest” करत असतो.पण शेवटी खरं हेच असतं की आपण तिथे जाणारच नसतो.तरीही एवढा खोलात जाऊन विचार करण्याचा आपण प्रयत्न का करतो… केलाय का हा विचार कधी…?
असा विचार करू नका असं म्हणणं मुळीच नाही पण किती विचार करावा याला काहीतरी प्रमाण असावं.कारण अनेकदा असं होतं या अशा वागण्यामुळे आपल्याला ज्या दिशेला जायचय त्या दिशेला जायच राहून जातं.किंवा त्या दिशेला जायला आपल्याला थोडा उशीर होतो. पण जर तोच विचार करण्यात घालवलेला वेळ जर आपण आपल्याला ज्या दिशेने जायचय तिथे घालवला तर गोष्टी वेळेत पूर्ण होतील. असा विचार का करत नाही आपण…?
सांगायचा उद्देश ईतकाच की , ज्या दिशेने आपल्याला जायचच नाही त्या दिशेचा जास्त विचार करण्यात वेळ खर्च करू नका.त्यापेक्षा ज्या दिशेने जायचय त्या दिशेचा विचार करण्यात तोच वेळ खर्च करा.आयुष्य चुकल्यासारखं वाटणार नाही. आणि आपल्या आयुष्याच्या योग्य दिशेला अगदी ‘perfect’ वेळेवर पोहोचाल यात काही शंकाच नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


