Skip to content

ही जिंदगी आहे. बिघडल्याशिवाय घडणार कशी…!!

ही जिंदगी आहे. बिघडल्याशिवाय घडणार कशी…!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


‘आम्ही बि—घडलो तुम्ही बि–घडाना’….हे ऐकलय का कुणी…?? घडण्या आणि बिघडण्याचा समतोल कसा अगदी या गाण्याने राखून ठेवलाय. आयुष्याचही तसच आहे. बिघडल्याशिवाय घडणं अशक्यच आहे.आपण म्हणतो हा फार बिघडलाय,याचं काही खरं नाही वगैरे.पण त्याच व्यक्तीला आपण नंतर कधीतरी पाहतो आणि बघतच राहतो.त्याची जडणघडण इतकी सुंदर झालेली असते की आपणच विचारात पडतो.अरे किती बिघडला होता हा…आणि अचानक असं…………..

अहो पण लोकं हेच विसरून जातात की बिघडल्यावरही एखादी गोष्ट व्यवस्थित होऊ शकते.आपलही तसच आहे.बिघडल्याशिवाय हे आयुष्य पूर्णपणे घडत नाही. आपलं हे आयुष्य बिघडत राहतं आणि घडत राहतं.सहज सोप साध आयुष्य कधीच नसतं.आयुष्य आहे म्हणजे खाचखळगे , अपयश , कठीण प्रसंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारचं.त्यांच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. आणि त्यांच्यामुळेच आयुष्य काय असतं हे खऱ्या अर्थाने समजतं.

संकटांचा डोंगर कोसळल्याशिवाय या आयुष्यात मजा नाही. संकटं आल्यावर आयुष्य अगदी बिघडून जातं. कधी तर स्वतःच्याच चुकीमुळे एखादी गोष्ट बिघडते.पण त्यातून शिकताना काहीतरी नवीन आपण शिकत असतो.चालता चालता कधीतरी पाय अडखळणारच आहे. धावताना आपण धडपडणारच आहोत. बोरीच्या बनात गेलात तर काटे हमखास टोचणारच…पण मग यातून जे काही शिकायला मिळेल,जो काही अनुभव मिळेल त्यातूनच ही ‘आपली जिंदगी’ घडणार आहे.हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवं.

स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बिघडला तर आपण काही तो टाकून देत नाही. त्याला काहीही करून नीट करतोच.पुन्हा एकदा त्याला नव्याने घडवतोच.अगदी तसच आपण आपलं बिघडलेल आयुष्य घडवत असतो.आणि तसच ते प्रत्येकाने घडवायला हवं. नैराश्य, अंधःकार,कलकलाट हे सगळं येतच रहातं. पण आपण त्यांना हसत हसत स्वीकारून पुढे जायच असतं.गोष्टी विस्कटतात,बिघडतात पण त्याला दुरूस्ती हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.

जिंदगी बिगड़ी हुई सी लग रही हैं…… इसे थोडा सुधरना चाहता/चाहती हूँ…!! हे बिघडल्याशिवाय खरच समजत नाही. जे चाललय, जसं चाललय तस आपल्याला चांगलच वाटत असतं.पण एखादं अचानक खाचखळगं आयुष्यात आलं नी त्यात पाय अडकला की आयुष्य समजायला लागतं.आयुष्यात काहीच नीट घडत नसतं.सगळं काही एखाद्या यंत्रासारखं बिघडलेल वाटतं. इकडचा स्क्रू तिकडे झाला की काय असं वाटायला लागतं.पण खरं सांगायचं झालं तर….यातूनच तर आपलं आयुष्य घडत असतं.

“जिंदगी गी की यही रित हैं , हार के बाद ही जीत हैं….” या गाण्याच्या ओळी अशा वेळी आठवल्याशिवाय राहत नाही. “जिंदगी हैं…एक ना एक दिन बिगड सकती हैं… एक बार ही सहीं जिंदगी बिगडना जरूरी हैं…और बेशक इसे सुधरना भीं उतनाही जरूरी हैं…” तर असा आपल्या आयुष्यात बिघाड झाला तर कधी गांगरून जाऊ नका.हताश होऊन जगणं सोडू नका. बिघाड झालेल यंत्रसुद्धा नीट होऊन कितीतरी दिवस टिकतं.आपण प्रयत्न केले तर हे बिघडलेल आयुष्य पण नीट होऊ शकतं.जाता जाता एक सगळ्यांच्या आठवणीतल एक कायमस्वरूपी ताजतवानं रहाणारं उदाहरण सांगते—–ते असं की ,

सायकल सगळ्यांना परिचयाची असावी. लहानपणी ती शिकण्यासाठी किती नी काय काय सहन केलं असेल प्रत्येकाने.आणि हे ज्याचं त्यालाच माहीत. सायकल चालवायचीच आहे. काहीही होऊदे पण मी आज सायकल चालवायला शिकणारच……असं म्हणून सायकल शिकता शिकता कितीतरी जणांनी ढोपराला नी कोपराला लागून घेतलय.इतकं लागलेलं असतं त्यादिवशी की काही कळतच नसतं.लागलं म्हणून किती ते धुमसून धुमसून रडत असतो आपण.

पण दुसऱ्यादिवशी जेव्हा सायकल परत चालवतो…त्यादिवशी ती हळूहळू जमायला लागलेली असते.असच या आयुष्याचं….बिघडल्याशिवाय काही मजाच नाही. मित्रांनो , सगळं अगदी हसतखेळत झेलायला शिका. काही बिघडल तर बिघडूद्या….कारण ही जिंदगी आहे. बिघडल्याशिवाय घडणार कशी…!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!