हाक आणि हात दिल्याशिवाय कोणतंही नातं पुन्हा बहरत नाही.
सोनाली जे
हा खूप मोठा पण इंटरेस्टिंग विषय आहे. जसा आपण घेवू , बघू तसा. सरडा जसा रंग बदलतो तसा.
नातं हाच किती सुंदर आणि सखोल विषय आहे. माझे नाते आहे हुं यात एक गर्व आहे. आपलेपणाची भावना आहे. काही नाती सहज जाता जाता ही जुळतात. तर काही खूप प्रयत्नपूर्वक जुळतात. काही वेळेस अनोळखी किंवा नुसत्या परिचयात असलेल्या व्यक्तींनी दिलेली हाक ओळखून , काही आपली माणुसकी आणि कर्तव्य समजून आपण साद देतो ..परिस्थिती ओळखून हात देतो.
काही वेळेस सुसंवाद साधून , काही वेळेस धावपळीची मदत करून , काही वेळेस आर्थिक मदत करून तर काही वेळेस रोज तुमचे अस्तित्व , तुमचे असणे ही मानसिक आधार , आपलेपणाची जाणीव करून देणारे , किंवा तुम्हाला तुमच्या पडत्या काळात , तणाव , चिंता युक्त वातावरणात त्यांचे अस्तित्व आपल्याला रिलॅक्स करते. संकटाना सामना करताना कोणी तरी आपल्या सोबत कायम आहे या जाणिवेतून , भावनेतून , जिद्दीने तोंड देण्याची , लढण्याची नवीन ताकद , ऊर्जा देते. आपल्या पाठीशी , सोबत असणे हाच आधार असतो.
स्वामी समर्थ यांचे एक वाक्य ” भिवु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” यातूनच किती सामर्थ्य , शक्ती आणि मनाची उभारी मिळते.
सहज कुणाशी कधी नातं जुळेल हे सांगू शकत नाही आपण. कधी कधी रक्ताची नाती फिकी पडतात पण कमावलेली नाती प्रसंगी जवळची ठरतात. वेळ निभावून नेतात. नात्याच्या बाबतीत “आदर्श” असं काहीच नसतं. आदर्श हा शब्दच मुळी फसवा आहे आणि त्याहीपेक्षा तो सापेक्ष अधिक आहे. असं सापेक्ष नातं ज्याच्या सुरुवातीपासूनच अपेक्षा आहे,
ते आदर्श असूच शकत नाही. त्यापेक्षा नात्यात आनंद किती आहे हे महत्वाचं. नातं मग ते कोणतंही असो, नातं फुलवणं ही एक कला आहे. नवरा बायकोचं असो, मैत्रीचं असो वा पालकत्वाचं असो, नात्यात आणि फुलात म्हणलं तर साम्य आहे. नातं आणि फुल यांचा बहर असताना त्याच्या सुगंधात आपण न्हाऊन आणि मोहरून जातो, कालांतराने फुल कोमेजतं , बहार संपतो आणि सांभाळलं नाही तर नातंही. पण नातं सदाबहार आणि टवटवीत ठेवणं आपल्या हातात आहे !
नातं हे लाजाळूच्या झाडासारख असावं. दुखावलं गेलंच कधी तर आतल्या आत मिटून घेतं स्वतःला. त्रागा नाही, भांडाभांडी नाही, आदळ आपट नाही, काही वेळ गेला की आपणहून तरतरीत होऊन पूर्वीइतकेच फ्रेश ! नातं म्हणजे संधी प्रकाशा सारख्या वेगवेगळ्या छटा. एखादा रंग अगदी मनोहर, तर एखादा अगदी विसंगत !
एखादा एकदम vibrant , एखादा नजर , मन पटकन आकर्षित करून घेणारा, कधी कधी आकाश ही निळ्या रंगा ऐवजी कधी उगवणाऱ्या सूर्याची कोवळी सोनेरी किरणे दाखवून दिपवून टाकणारे. एखादा रंग आवडला नाही तर ते सांगण्याइतकही नातं मोकळं हवं आणि एखादा रंग आवडला नाही म्हणजे आख्खं चित्रच टाकाऊ आहे असे मानण्याइतके बालिशही नको. खूप प्रयत्न करूनही सतत मतभेद , वाद , posesiveness , अपेक्षा वरचढ होत असतील तर तडजोड करून नाते टिकविण्याची च धडपड ही नको. मग प्रत्येकाला त्यांची स्पेस द्या. वेळ द्या. विचार करण्याकरिता संधी द्या. अलिप्त व्हा.
नातं हे कधीच केवळ व्यक्ती सापेक्ष हे नसते. नातं सजीवांशीच जडतं असं नाही. एखादा शांत रस्ता, एखादा सुंदर पाषाण , अगदी देवळात आपण जातो तेव्हा ती मूर्ती असते. तो फोटो असतो पण देवाचे अस्तित्व त्यात मानून आपण देव आणि भक्त या नात्याने त्याला आपल्या मनातले मोकळेपणाने सांगतो.आपण रहातो ती वास्तू आणि आपल्या आवडत्या वस्तू यांच्याशी सुद्धा आपलं नातं जुळलेलं असतं.
घरात माणसांबरोबर रहाणारी असोत किंवा रस्त्यावरची , पाळीव नसली तरी रोज दारात येणारी त्यांच्या भुकेच्या म्याव किंवा भू भू भुंकने , तर कधी प्रेमाने डोक्यावरून , पाठीवरून हात फिरवणे या हाकेला समजून घेवून कधी खावू , दूध पिण्यास दिले , तर कधी मायेचा स्पर्श यांचा हात दिला तर मांजरं, कुत्री काय कमी लळा लावतात का ?
आयुष्यात ते कधी ही हे नाते , प्रेम , माया विसरत नाहीत. नुसत्या वासाने , स्पर्शाने गोठ्यातल्या गाईचं प्रेमाने चाटणं असो किंवा बाहेरुन आल्या आल्या कुत्र्याने आपल्या दिशेने घेतलेली झेप असो सहवासाच्या आणि स्पर्शाच्या आणि हाकेला दिलेल्या हाताच्या मायेवरच ही नाती टिकून असतात.
एक मुलगा असतो त्याची आई एका डोळ्याने आंधळी असते. ती आई त्या मुलाला शाळेत सोडायला जाताना त्या मुलाला आपल्या आईची लाज वाटत असते. तो तिला टाळत असतो , तिच्यावर चिडून माझ्या सोबत येवू नको असे म्हणत असतो. तोच शिक्षण पूर्ण करून गाव सोडून शहरात जातो. तिथे लग्न करून आपल्या फॅमिली सोबत राहत असतो . त्या दरम्यान कधी ही तो आईची चौकशी करत नाही, तिला भेटायला जात नाही.
एके दिवशी अचानक त्याची आई त्याला भेटायला , नातवंडांना बघायला त्याच्या घरी येते. तो दारातूनच आईला तू कशाला आली आहेस असे म्हणतो मुले बायको विचारतात कोण आहे विचारतात तेव्हा कोणी नाही , चुकून दुसऱ्या पत्त्यावर आली आहे असे म्हणून आपल्या आईला निराश करून दारातूनच परत पाठवितो.
काही दिवसांनी शाळेचे reunion असते तेव्हा सगळे आग्रह करतात म्हणून तो गावी जातो. Reunion attend करतो . त्याला काय वाटते काय माहिती एकदा घरी जावे असा विचार करून तो आपल्या घरी जातो. तिथे कुलूप असते घराला. शेजारी बघतात आणि लगेच त्याला म्हणतात आम्हाला आणि तुझ्या आईला खात्री होती तू येणार ..आई कुठे आहे असे विचारल्यावर ती नाही.
तिने चिठ्ठी ठेवली आहे तुझ्या करिता असे ते शेजारी सांगतात. त्याला वाटते आई जवळपास गेली असेल . ते म्हणतात नाही आई तुझी मागच्या महिन्यातच देवाघरी गेली. आम्ही तिचे अंत्यसंस्कार ही केले. त्या मुलाला थोडे वाईट वाटते.
तो चिट्ठी उघडुन वाचायला घेतो. त्यात आईने लिहिले असते. बाळा मी तुझी आई आहे आणि मी तुझ्यावर कायमच प्रेम केले , माया दिली , पण तू माझा कायम तिरस्कार केलास , तुला माझी लाज वाटली , कारण मी एका डोळ्याने आंधळी होते.
पण तू लहान असताना तुझा खेळताना एक डोळा गेला आणि तेव्हा तुला दोन्ही डोळ्याने दिसावे म्हणून मी माझा डोळा तुला बसविला.
त्या मुलाला हे वाचून धक्काच बसतो ..आणि आपण आपल्या आईने आपल्याला दिलेली हाक आपल्याकडे ती केवळ प्रेमाच्या आशेने आली होती, आपल्या नातवंडांना भेटायला , बघायला तरी तिला प्रेमाचा हात दिला नाही , माया दिली नाही आणि बाहेरून घालवून टाकले.
आता किती ही झाले , समजले , तिच्याविषयी आदर , प्रेम निर्माण झाले तरी मी माझ्या आईला आता कधीच भेटू शकत नाही, तिला नात्याची ऊब देवू शकत नाही. उसवलेली नात्याची वीण परत शिवून , आनंदाची , प्रेमाची ठिगळे लावून परत शिवू शकणार नाही.
म्हणून आपल्याच माणसांची हाक वेळीच ऐकायला शिका आणि वेळीच हात द्या.. वेळ, व्यक्ती , परिस्थिती एकदा हातातून निसटली की परत येत नाहीत. कॉम्प्युटर हँग झाला तर परत रिस्टार्ट करतो आपण , मोबाईल मध्ये memory संपली की काही गोष्टी delete करतो , तसे कॉम्प्युटर मध्ये नको असलेल्या फाईल्स , फोल्डर delete करतो , आणि नकोच असतील तर recycle bin मधून ही कायमच्या काढून टाकतो. तसे कधी तरी नात्यात ही रिस्टार्ट मारून बघा. नको असलेल्या गोष्टी , वाद , अपेक्षा सगळे क्लिअर करून परत नवीन मनाने , कोऱ्या पाटीसारखे परत आपले नाते सुरू करा सुंदर असे फुलवा.
बरेचदा असे होते की एखादं नातं घट्ट व्हायला लागलं की दोघांपैकी एक समोरच्याला गृहीत धरायला लागतं. आपल्या अपेक्षा वाढत असतात. कदाचित ते त्याला / तिला कळतही नसतं, फक्त समोरच्याला जाणवत असतं. अशावेळी बोललो तरी पंचाईत आणि नाही बोललो तरी पंचाईत अशी समोरच्याची अवस्था होते. आपल्याला ते नातं तर हवं असतं, पण ते गृहीत धरणं नको असतं. नातं जर खरं असेल तर समोरच्याच्या लक्षात येतंच ते, पण नाहीच आलं लक्षात तर ते नात्याचं दुर्दैव म्हणावं लागेल.
कधी तरी असंही होतं, एखाद्या नात्यात आपली जितकी involvement आहे तितकी समोरच्याची आहे की नाही अशी शंका यायला लागते. अशावेळी छोटासा लपंडावाचा किंवा आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळावा. आपण लपून बसून समोरचा शोधतोय का आपल्याला ? याचा शोध घ्यायचा. समोरच्याच्या डोळ्यावर पट्टी असताना त्याला हाक देऊन दिसेनासं व्हायचं. आजूबाजूला वावरत असतो आपण,
पण हाती मात्र लागत नाही. समोरची व्यक्ती येतेच अंदाजाने आपल्याजवळ आणि नेमकं आपण उभे आहोत तिथे समोर येऊन उभी रहाते. त्यावेळी त्याच्या नकळत आपणहून out होण्यात सुद्धा एक मजा आहे. “नातं दोघांनाही हवय” ही भावना खूप उबदार आहे.
प्रत्येक नात्याला त्याची स्वत:ची स्पेस द्यायला हवी. काहीतरी चुकायला लागलयं हे चटकन ओळखता यायला हवं. आपल्या परीने आपण धग टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा – दुसऱ्यासाठी आणि स्वत:साठीही. सांभाळता येईल तेवढी गोधडी सांभाळायची. आनंदाने जमतील तेवढी ठिगळं लावायचा प्रयत्न करायचा पण फाटायला द्यायची नाही.
असंही होईल कधी, एखाद्या नात्याची वीण इतकी उसवेल, घडी इतकी विस्कटेल की ठिगळं लावायला जागाही शिल्लक रहाणार नाही. अशावेळी शांतपणे त्या गोधडीची घडी करून मनाच्या कपाटात बंद करून ठेवायची आणि काढायची थोड्या दिवसांनी परत बाहेर काढून , बघायची पुन्हा एकदा अंगावर पांघरून बघायची .
पुन्हा प्रकर्षाने तीच ऊब जाणवली तर ते नातं खर आहे, मग अशावेळी विचार नाही करत बसायचा माघार कोण घेणार..तू की मी ? पुढाकार घेऊन बघायचं. समोरच्यालाही जाणवली ऊब तर येईलच हात पुढे. नाहीच आला, तर आहे का काही अडचण ? कोणाच्या आयुष्यात कशाला करायची लुडबुड ??
घ्यायचं समजून आपणहून…आणि समोरून हाक आली तर हात द्यायचा नाही तर जड मनाने विसरून जायचं सगळं. नात्याची कवाडं , मनाची दारे बंद करून घ्यायची . पण नात्याचं ओझं दुसऱ्याला वाटू द्यायचं नाही.त्याच्या आयुष्यातली आपली भूमिका संपलेली आहे हे शांतपणे accept करायचं. कधी काळी या ऊबेने आपल्याला माया लावली होती हे मात्र आपल्यापुरते तरी विसरायचे नाही.
आयुष्य सुंदर आहे. नात्याचा बहर ओसरला तरी जसे झाडाला खत – पाणी घालत असतो, तसे नात्यांना ही जपा. सिझन बदलला आपलेपणाची हाक आली तर नक्की आणि हात द्या .. त्या शिवाय कोणतंही नातं पुन्हा बहरत नाही. आयुष्य सुंदर आहे .. नाती निर्माण करा, फुलवा आणि त्याच्या बहराचा आनंद ही मिळवा. आणि तो वाटताना मिळणाऱ्या सुखाची , आपल्या आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरची आनंदाची मजा लुटा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


