Skip to content

हळव्या मनाला सर्वकाही अगदी पटकन बोचत राहतं.

हळव्या मनाला सर्वकाही अगदी पटकन बोचत राहतं.


हर्षदा नंदकुमार पिंपळे


मन….! जे शरिरातील कोणत्याही एखाद्या अवयवासारख स्पष्टपणे अजिबात दिसत नाही.ना त्याला कोणता आकार आहे ना कोणता रंग ….!
तरीदेखील आपण कित्येकदा सहज म्हणून जातो की मनाचा पसारा अथांग असतो.मन नाजूक असतं वगैरे वगैरे.खरतरं मन ही एक अवस्था, प्रवृत्ती आहे.मानसशास्त्रात सांगितल्याप्रमाणे या मनाच्या चार प्रवृत्ती आहेत. वर्तमान, अनुःपस्थित ,एकाग्र आणि दुहेरी अशा चार प्रवृत्ती आहेत. आणि आपण या अशा मनासोबतच सातत्याने जगत असतो.

या ना त्या कारणांमुळे आपलं मन त्या त्या प्रवृत्तीमध्ये शिरत असतं. आणि याच बरोबर प्रत्येकजण हा काही सारखा नसतो.प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो.कुणाचा कठोर तर कुणाचा मृदु स्वभाव असतो. आणि त्या त्या स्वभावानुसार प्रत्येकाच वागणं असतं.कुणाला एखाद्याच्या दुःखाची-सुखाची जाणीव ही अगदी सहज होते तर कुणाला ती होत नाही. काहींच मन तर इतकं हळवं असतं की एखादं येऊन पार त्या हळव्या मनाला सहज इजा करू शकतं.

पहा……

“मिताली…..” तुमच्या माझ्या सर्वसाधारण वयाचीच एक तरूणी. स्वभावाने अतिशय शांत होती. कधी कुणाला ती उलट उत्तरं द्यायची नाही. सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून प्रेमाने ती वागायची. पण मनाने मात्र ती खूप हळवी होती. घरात साधं कुणी तिच्यावर ओरडलं तरी तिच्या मनाला ते फार लागायचं. भाऊ म्हणू नका की शेजारच्या काकू…..

अगदी ती शांत म्हणून तिला सगळेच डिवचायचे. तिची सतत थट्टा मस्करी करायचे.थोडं थोडकं मिताली समजूनही घ्यायची. पण त्या गोष्टीही तिला अशा सहन व्हायच्या नाही. ती सगळ्यांच बोलणं ऐकून घ्यायची . आणि मनातील एका कोपऱ्यात अशा प्रत्येक गोष्टी ती साठवून ठेवायची. तिला अशा सगळ्या गोष्टी मनात साठवून ठेवायची कालांतराने सवयच जडली होती. सगळं साचलेल एकट्यातच रडून रडून मोकळं करायची.

मला का बोलतात सारखे सारखे…? मी कुणाला उलट उत्तर दिलं तर काय होईल…? कुणी मला पुन्हा काही बोलेल का…? अशा अनेक प्रश्नांशी ती दोन हात करत होती. छोट्या छोट्या गोष्टींचे मितालीवर खूप मोठे आघात झाले होते.नंतर नंतर तर तिला एकूण एक गोष्ट सलायला लागली.आपणच चुकतो अशी भावना तिच्या मनात रेंगाळत राहिली.तिच्या हळव्या मनाकडे कुणी फारसं लक्षच दिलं नाही. काही लोकांनी तर ती अशीच आहे फार हळवी. अगदी “emotional fool’ ….! तिला काय सगळच टोचतं वगैरे असं बोलून बोलून तिचं अजूनच मानसिक खच्चीकरण करायला सुरुवात केली. त्यात ती आधीच हळवी असल्याने या सगळ्या गोष्टींचा विपरीत असा परिणाम मितालीवर झाला.आणि गोष्टी नंतर अधिकाधिक अवघड होत गेल्या.

तिची ही अवस्था तिच्या आईला मात्र फार काळ पाहवत नव्हती. आईच मन किती हळवं असतं हे आपल्याला माहीतच असेल.अशातच आईने मितालीची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

इतकं हळवं असून चालत नाही गं मितू….! असं म्हणत मितालीच्या डोक्यावरून तिने मायेचा एक हात फिरवला. मितूला जरा त्या मायेच्या स्पर्शाने बरं वाटतं होतं.मितू एकाएकी आईच्या कुशीत रडायला लागली. तिच्या सगळ्या साचलेल्या गोष्टी त्यावेळी बाहेर पडल्या.त्यावेळी आईने मितूला सांगितलं की मितू….. नेहमीच इतकं हळवं असून चालत नाही. कधीतरी समोरून वार करणं गरजेच असतं.कधी कधी गोष्टी सहज सोडून देणही तितकच आवश्यक असतं. सगळ्याच गोष्टी मनाला लागून घेतल्या तर कसं चालेल…? आणि अशा किती आणि किती काळ गोष्टी मनात धरून ठेवायच्या….? वेळप्रसंगी मनाला कठोर होता आलं पाहिजे. नाहीतर गोष्टी बोचत राहतात आणि आपलं हळवं मन अधिकाधिक कमजोर होत जातं.त्यामुळे शक्य होईल तितकं हळव्या मनाला सावरताही आलं पाहिजे.

अगदी अशीच काहीशी हळवी मनं असणारी कित्येक जणं आपण आपल्या आयुष्यात रोज पाहतो.कधीकधी तर आपण स्वतःच त्यापैकी एक असतो. आणि हे हळवं मन म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. या हळव्या मनाला सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे बोचत राहतात.दुसऱ्याच्या जखमाही या हळव्या मनाला सहजासहजी सहन होत नाही.दुसऱ्याच्या वेदनाही या हळव्या मनाला हेलावून टाकतात. ईतकच नाही तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीही या हळव्या मनाला सहजपणे टोचतात. छोट्या छोट्या गोष्टींमुळे टचकन यांच्या डोळ्यात पाणी येतं.कुणी मुळातच शांत नी हळव्या स्वभावाच असतं तर कुणी अगदी चंचल नी कठोर स्वभावाच असतं.

आता कठोर स्वभावाच्या व्यक्तीला भावभावना नसतात असं नाही. भावभावना या प्रत्येकाला असतात. फरक इतकाच की कुणी फार हळवं असतं तर कुणी एकदम याच्या अगदी विरूद्ध असतं.आपल्या घरातच अशा व्यक्ती असतात. त्यांना थोडंफार काही बोलल तरी ती हळव्या मनाची लोकं सहज दुःखावली जातात.त्यांना असं क्षणात वाईट वाटत असतं.एखादी गोष्ट टोचली की ह्या व्यक्ती अक्षरशः आतल्या आत कुढत बसतात. स्वतःच्या मनाची घुसमट करून घेतात.

“सुटका हवे आता या जीवनातून….
जीवनाच्या नैराश्यातून….जीवनाच्या अंःधकारातून….
सुटका हवे आता या जीवनाच्या गोंधळातून….
कलकलाटातून….

सुगंधी गारव्यातील ओल्या मृदेत त्या मरणाच्या
जरा निवांत पहूडाव वाटतय…
त्या ढगांच्या मऊमऊ गादीवर मनसोक्त लोळावस वाटतय…
लुकलुकणाऱ्या त्या चंद्रचांदण्यांना हळूवार स्पर्श करावासा वाटतोय…

नसेल अस्तित्व..नसतील आठवणी
ना जखमा असतील ना वेदना असतील..
ना जखमा होतील ना वेदना होतील…

भळभळणाऱ्या जखमांचीही खपली निघून जाईल…
मेंदूतील ज्वलंत पेटता कोष कायमचा विझून जाईल…
माझ्यातील मी…अन् मी दोन्ही मोकळा होईल…
आयुष्यातील एक गुंता कायमचा सुटून जाईल…
मरणाला मिठी मारता श्वास देखील तुटून जाईल…!!

अगदी या ओळींप्रमाणे एखाद्या हळव्या मनाची अवस्था होते.त्यामुळे शक्य होईल तितकं हळव्या मनाला सांभाळून घ्या.वेळीच अशा व्यक्तींना समजून घ्या.हळव्या मनाला “strong” बनवण्याची जबाबदारी कधीतरी स्वतः उचलून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टीही टोचतात या हळव्या मनाला….. फुलपाखरासारख त्याला जपायला शिका….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “हळव्या मनाला सर्वकाही अगदी पटकन बोचत राहतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!