Skip to content

हळवे मन लवकरच नकारात्मक भावनांच्या आहारी जाते.

हळवे मन लवकरच नकारात्मक भावनांच्या आहारी जाते.


मेराज बागवान


‘हळवे मन’ म्हणजे काय? हळवे मन म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींविषयी, घटनेविषयी खूप जास्त विचार करून त्याचा स्वतःवर खूप जास्त परिणाम करून घेणे. हे , हळवे मन खूप नाजूक असते.अत्यंत संवेदनशील असते.आणि खूप भावनिक असते. ते खूप लवकर काळजीत पडते.

छोट्या छोट्या गोष्टींचा,खूप लवकर आणि जास्त ताण घेते. हळवेपणा म्हणजे ‘कोमल मन’ असेही म्हणता येईल. थोडा हळवेपणा जरूर असावा.कारण थोड्या बहुत प्रमाणात हळवे मन असणे म्हणजे ‘माणूसपणाचे’ लक्षण असते. हेच हळवे मन एखाद्याची खूप चांगल्यारित्या काळजी घेते.प्रेम करते.आपुलकीने चौकशी करते.आणि एखाद्याला जीवापाड जपते देखील.पण अति हळवेपणा त्या व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मकता देखील घेऊन येतो.

हळवे मन असलेल्या व्यक्ती काही जरी झाले तरी खूप ताण घेतात.काहींना तर रडू लगेच कोसळते.मग नको नको ते विचार त्यांच्या डोक्यात येतात.जसे की , समजा एखादी हळवी मुलगी आहे आणि तिच्या अत्यंत जवळची व्यक्ती आई-वडील किंवा तिचे पती काही करणांनिमित्त बाहेरगावी गेले आहेत आणि त्यांच्याशी तिचा संपर्क होऊ शकत नाहीये.

मग अशा वेळी ,त्या मुलीच्या मनात नको नको ते नकारात्मक विचार येऊन जातात.जसे की , काही अपघात तर झाला नसेल ना ? कोणी आजारी तर पडले नसेल ना ? असे अनेक विचार हळव्या मनात डोकावतात आणि नकारात्मकता ओढवून घेतात.

हळव्या व्यक्ती खूप काळ स्वतःच्या मनात घडून गेलेल्या गोष्टी धरून बसतात.आणि त्यावर अति विचार करतात.पण याने काय होते. परिस्थिती बदलत नाहीच पण फक्त आणि फक्त नकारात्मकता वाढीस लागते आणि मग अशा व्यक्तींचे आयुष्य लवकर पुढे जात नाही.एखाद्याविषयी जिव्हाळा, हळवेपणा जरूर असावा पण त्यामुळे जर का स्वतःच्या आयुष्यावर विपरीत परीणाम होत असेल तर हा स्वभाव थोडा नियंत्रित करता आला पाहिजे.

काही हळव्या व्यक्ती अशा असतात की , कोणी त्यांच्याशी अगदी हळुवार पणे बोलले , म्हणजेच ‘सॉफ्ट कॉर्नर’ दाखविला , तरी देखील हळव्या व्यक्तींना असे वाटते की त्या व्यक्तीचे अपल्यावर ‘प्रेम’ आहे. पण प्रत्येक वेळी वास्तव या पेक्षा खूप वेगळे असते.इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी त्या हळव्या व्यक्तीचा काही अंशी ‘उपायोग’ करून घेत असतात. आणि हे जेव्हा त्या व्यक्तींच्या लक्षात येते , तेव्हा त्या व्यक्ती खूप दुखावल्या जातात.आणि नकारात्मक भावनांना त्यांना सामोरे जावे लागते.मग ते विचार करू लागतात की , “सगळे माझ्याशी असेच वागतात”.

काही हळव्या व्यक्तींना असे वाटत असते की, कोणी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली तर तिने कायम आपली साथ द्यावी , कधीच मला अंतर देऊ नये.आणि काही कामांमुळे जर का त्यांना ह्या व्यक्तींकडून पाहिजे तसा सहवास मिळाला नाही की , ह्या व्यक्ती पुन्हा नकारात्मक भावनांकडे वळतात.

जसे की , ‘माझ्याशी कोणीच बोलत नाही, मी कुणालाच आवडत नाही, कोणी माझे हट्ट पुरवित नाही, कोणाचेच माझ्याकडे लक्ष नाही, मला दुर्लक्षित केले जात आहे’ इत्यादी. पण वास्तव असे नसते.पण हळव्या व्यक्ती खूप जास्त इतर जणांशी जवळीक साधून असतात.आणि त्यामुळेच त्यांच्या मनात असे विचार येतात.

हळव्या व्यक्ती फारशा कुणाला दुखावत नाहीत.कोणाच्या मनाला लागेल असे ते कधी वागत नाहीत.त्यामुळे चुकून कोणी त्यांच्यावर रागावले, ओरडले तर ते त्या गोष्टी खूप भावनिकरित्या घेतात आणि स्वतःलाच जास्त त्रास करून घेतात. त्यांचे डोळे लगेच पाणावतात.

काही वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत देखील असे घडते.म्हणजे, जस जसे वय वाढत जाते तस तसे , “माझ्याशी कोणीतरी सारखे बोलावे,माझ्याबरोबर वेळ व्यतीत करावा” असे त्यांना वाटत असते. वृध्द झालेल्या आईला वाटत असते, “माझ्या मुलाने माझ्याशी भरभरून बोलावे, मला वेळ द्यावा, मनातले माझ्यापाशी येऊन सांगावे”.पण कामाच्या, करिअर च्या व्यापात मुलगा हे सगळे प्रत्येकवेळी नाही करू शकत.मग त्या आईचे डोळे लगेच पाणावतात.वयानुसार , हळवेपणा येतोच स्वभावात.पण त्याचे प्रमाण ,आयुष्यात नकारात्मकता येण्याइतपर्यंत नसावे.

म्हणूनच, भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे असते , खासकरून हळव्या मनाच्या व्यक्तींनी. कारण , आयुष्य हे सुख -दुःखांनी भरलेले असते.विविध रंग आयुष्यात उधळण करीत असतात.कोणत्या एका गोष्टीमुळे , मग तो जवळच्या व्यक्तीचा मृत्यु का असेना , आयुष्य थांबत नाही आणि कोणी ते थांबविले देखील नाही पाहिजे. जर हळव्या मानामुळे, अनेक नकारात्मक विचार मनात फेरा धरत असतील तर त्याक्षणी मन थार्यावर ठेवले पाहिजे.त्याला नजरात्मकेत भरकटू दिले नाही पाहिजे.

कारण, आयुष्य आपल्याला वाटते तितके मोठे ही नसते. कोणता दिवस शेवट असेल माहीत नाही. म्हणून, हळव्या मनांनो, इतरांची काळजी घेता तशी स्वतःच्या मनाची देखील काळजी घ्या , स्वतःला नकारात्मक भावनांपासून दूर ठेवा आणि इतरांबरोबर , स्वतःलाही जीवापाड जपा आणि थोडे स्वतःसाठी देखील भरभरून जगा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “हळवे मन लवकरच नकारात्मक भावनांच्या आहारी जाते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!