Skip to content

हक्काच्या व्यक्तीने साथ सोडली की एकटेपणाची व्याख्या कळते.

हक्काच्या व्यक्तीने साथ सोडली की एकटेपणाची व्याख्या कळते.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


सांज बिलगून गेली…
मनाला रडवून गेली…
तीच होती सोबतीला
पण तीही एकटं सोडून गेली…

आयुष्यात कितीतरी सांजवेळा अनुभवल्या पण ती सांजवेळ काही वेगळीच होती.नेहमीप्रमाणे मी समुद्रकिनारी फेरफटका मारायला गेले. ती थंडगार बर्फाच्या गोळ्याची गाडी, तो भेळवाला नी पाणीपुरीवाला , तो ऊधाणलेला समुद्र , त्या सळसळत्या लाटा , आणि क्षितीजापल्याड लपत चाललेला तो सुर्य ….

हे सारं काही त्या किनाऱ्यावर होतं.पण पूर्वीसारखी ती संध्याकाळ वाटत नव्हती. कशाची तरी उणीव भासत होती. राहून राहून मन मनालाच खात होतं.का कोणास ठाऊक खूप एकटं एकटं वाटत होतं. खरतरं इतक्या एकटेपणाची मला सवयच नव्हती.प्रत्येकाच्या आयुष्यात जशी काही जवळची , हक्काची माणसं असतात तशीच माझ्या आयुष्यातही काही जवळची माणसं होती. त्यातील काही खूप “special” होती.जणू माझं आयुष्यच…!

“देवांश”….देवांश जणू माझं आयुष्यच होता.इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे तोही एक चांगला मित्र होता.खरतरं आम्ही आमच्या नात्याला असं कोणतच “specific” नाव कधीच दिलं नाही. नाव नसलेलं हे नातं माझ्यासाठी खरच खूप म्हणजे खूप “special” होतं. आयुष्यातील सगळे रस्ते जेव्हा माझ्यासाठी बंद झाले होते तेव्हा या देवांशनेच मला नव्या वाटा शोधायला मदत केली.आयुष्यात सुखाची जणू बरसात होत होती.

आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात तो माझ्या सोबतच असायचा.पण अचानक एक दिवस असा आला की तो माझ्या सोबत क्षणाक्षणाला असणारा देवांश मला कायमचा सोडून गेला.खरच तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आम्ही दोघं नेहमीप्रमाणे त्या समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो आणि अचानक तिथे कुणीतरी समुद्राच्या पाण्यात बुडतय असा भास झाला.

म्हणून आम्ही मागे वळून पाहिलं तर खरच एक मुलगा त्या पाण्यात गटांगळ्या खात होता.मदतीसाठी तो आरडाओरडा करत होता.देवांशला सवयच होती पटकन कुणाच्या तरी मदतीला धावून जायची.त्यादिवशी सुद्धा त्याने धैर्य दाखवत त्या मुलाला कसंबसं वाचवलं.पण अचानक समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली होती आणि किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांनी त्याला सहज घेरलं.आणि तो त्या लाटांसोबत सहजपणे वाहत वाहत लांब गेला.त्यावेळी त्याला वाचवणं मात्र कुणालाही शक्य झालं नाही.

खरतरं तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील “स्विमर” होता.कितीतरी खाड्या त्याने सहज पार केल्या होत्या.पण त्या दिवशी मात्र तो हरला.मला सोडून कायमचा निघून गेला. माझी अवस्थाही समुद्रात बुडाल्यासारखीच झाली होती. तो परत येणार नाही हे कळत होतं पण मन मात्र हे मानायला मुळीच तयार नव्हतं.त्याच्या आठवणीत रडण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता.

मग काय त्या दिवशी त्या संध्याकाळी ह्याच साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. आणि एकटेपणा काय असतो हे प्रकर्षाने जाणवलं. माझ्या हक्काच , माझ्या जवळचं फुल आज माझ्यासोबत नाही हे मनाला पटतच नव्हतं.तो असा अर्ध्यावर साथ सोडून गेला ….जिवंतपणीच मी मृत्यूला कवटाळलय असा मला भास होत होता.एकटेपणाची व्याख्या काय असते ते ती सांजवेळ शिकवून गेली.

खरचं , आयुष्यात कितीतरी हक्काची माणसं असतात जी आपल्या खूप जवळ असतात. ती आपल्याला हसवतात , रडवतात आणि वेळ पडली तर मदतीला धावून येतात. चुकलं तर कान पिळतात.आपल्याला ते जीव लावतात आणि आपणही त्यांना जीव लावतो.पण कधी कधी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ही माणसं आपली साथ कळत नकळतपणे सोडून जातात.

माणसांशिवाय हे आयुष्य आयुष्य वाटतच नाही. आणि त्यातल्या त्यात अशी “देवांश” सारखी काही जवळची ,हक्काची माणसं जर आयुष्याची साथ सोडून गेली तर ते उरलेलं आयुष्य जगावसही वाटत नाही. नकोनकोस वाटतं जगणं.इतके दिवसाची सोबत तुटली की एकटं एकटं वाटतं.एकटेपणाची व्याख्या आपण कधी अनुभवलेली नसते.सतत आपल्या हक्काच्या व्यक्तींभोवती आपण भुंग्यासारखच पिंगा घालत असतो.आणि हीच माणसं जेव्हा सोडून जातात तेव्हा मात्र त्याच एकटेपणाची व्याख्या हळुहळू समजायला सुरुवात होते.

पहा नं… आई थोडावेळ जरी बाहेर गेली तर घर खायला उठतं.तिचा तो आवाज , सततची बडबड , जेवायला वाढलय , उठा उठा….हे सारं काही त्या तिच्या थोड्यावेळ नसण्यानेही आठवत राहतं.बाबा बाहेरगावी गेले तर त्यांची ऑफीसची तयारी वगैरे सगळं आठवत राहतं. बहीण-भावंड यांचा दंगा , प्रेम ते नसल्यावर सतत जाणवत राहतं.

आणि मित्र मैत्रिणी किंवा आयुष्यात भेटलेली कितीतरी अनोळखी माणसं आपली होऊन जातात. त्यांच्याशी एक वेगळेच बंध तयार होतात. ते आजुबाजुला नसण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला ते जमतच नाही. अहो पण धरलेला हात कधीतरी सुटायचाच…! होय..

हा धरलेला हात कधीतरी सुटतो.कधी गैरसमजामुळे हक्काची माणसं सोडून जातात.तर कुणी अपघातात मरण पावतं तर कुणी देशासाठी बलिदान देतं तर कुणी असच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे साथ सोडून जातं.आयुष्य जगणं फार कठीण होतं जात नंतर…सोबत घालवलेले प्रत्येक क्षण तेव्हा आठवत राहतात.मन कोपऱ्यात आतल्या आत रडत राहतं.जेवणात आणि जीवनात कशातही लक्ष लागेनास होतं.एकटेपणा म्हणजे काय खऱ्या अर्थाने जाणवू लागतं.

तुमचही असचं होत असणार….कारण कुणी हक्काच सोडून गेलं तर ती उणीव सहजासहजी भरून निघण्यासारखी नसते.आणि त्या व्यक्तीची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही.असं म्हणतात , आठवणी आणि वेदना कधीच आपल्याला एकटं सोडत नाहीत. त्या कायम आपल्यासोबत असतात.

म्हणून आपली हक्काची माणसं जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत प्रत्येक क्षण दवबिंदूप्रमाणे सजवा.नव्या आठवणी निर्माण करा.कारण माणसं सोडून गेल्यावर एकटेपणात त्या आठवणीच साथ देतात…..म्हणून म्हणते धरला हात सुटायचाच पण जोपर्यंत तो हात हातात आहे तोपर्यंत तो हात सोडू नका. आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ कशी सुंदर करता येईल ते पहा..नाहीतर अशी एक संध्याकाळ येतेच जी एकटेपणाची जाणीव पुन्हा पुन्हा करून देते….जीवाला पुन्हा पुन्हा जाळते..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!