“स्व सोडून सगळ्यांचा विचार करून जगणं म्हणजेच इमोशनल कचरा”!
मधुश्री देशपांडे गानू
सर्व सजीवांमध्ये सर्वात प्रगत आणि बुद्धिमान असा मानव “सर्व सजीवांमध्ये ईश्वराचा अंश असतो” असे मानणारा आहे. अशा या मानवाने स्वतःचा आणि इतर सजीवांचा आदरच केला पाहिजे. अनेक संतांनी अगदी पुराणकाळापासून स्वाभिमानाचे महत्व सांगून ठेवले आहे.
आता स्वाभिमान, “स्व” म्हणजे काय? तर स्वतःला स्वतःची असलेली, झालेली जाणीव. स्वाभिमान म्हणजे “स्वत्वाची” जाणीव. स्वतः मध्ये असलेले गुण आणि दोषही ओळखण्याची, समजून घेण्याची क्षमता म्हणजे “स्व”. या जगात एकही व्यक्ती परफेक्ट नाही. गुणदोषांसहितच बनली आहे. आणि माणूस आहे तर चुका होणारच. पण त्या मान्य करून, स्वीकारून स्वतःमध्ये योग्य सकारात्मक बदल करण्याची इच्छा, कृती म्हणजे स्वत्वाची जाणीव.
प्रत्येक व्यक्तीमध्ये बहुतेक स्वतःबद्दल काही नकारात्मक भावना असतात. कोणी स्वतःच्या दिसण्याबद्दल समाधानी नसतं, तर कोणी स्वतःच्या स्वभावाबद्दल. समाजात, चारचौघांमध्ये वावरताना बऱ्याच जणांना स्वतःबद्दल कमीपणाची भावना असते. यामुळे आत्मविश्वास कमी असतो. असुरक्षित वाटतं. स्वतः बद्दल प्रेरणाहीन वाटू शकतं.
यामुळे होतं काय की तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेतात. उदा. लहानपणी शाळेत अशा भीडस्त मुलांना मुद्दाम त्रास दिला जातो. कारण विरोध करण्याचे धैर्य त्यांच्यात नसतं. काहीवेळा अशी एखादी घटना मनात खोलवर घर करून राहते. आणि कायमस्वरूपी आत्मविश्वास गमावतो. ” लोक काय म्हणतील?” हा असाच एक इमोशनल कचरा.
याचाच अतिविचार करून आपण आयुष्यातील कित्येक निर्णयांना, आनंदाला मुकलेले असतो. कारण आपण स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार अकारण करत असतो. मोठेपणीही नैराश्य, दडपण, भीती, छोट्या छोट्या गोष्टींनी मनावर ताण येणे, अकारण चिंता अशा नकारात्मक गोष्टींनी ती व्यक्ती ग्रासली जाते. तिच्या बाबतीत घडणाऱ्या कोणत्याही घटनेला ती स्वतःला दोषी ठरवते. याचा तिच्या संपूर्ण आयुष्यावर, नातेसंबंधांवर, करियर वर परिणाम होतो. हा इमोशनल कचराच आहे. इथे समुपदेशकाची गरज भासते.
अगदी नेहमीचं उदाहरण घेऊ. “घरातील गृहिणी”. खरं म्हणजे गृहिणी ही घराचा कणा असते. 24 तास कमी पडतील इतकी कामं असतात घरात. पण एकूणच एखादी स्वत्वाची जाणीव नसलेली स्त्री असेल किंवा तिला स्वतःबद्दल न्यूनगंडाची जाणीव असेल तर सगळं घरदार तिला अतिशय अपमानास्पद वागणूक देतं. सासू सासरे जात करतातच. नवऱ्याच्या लेखी तिला गरजेपुरतंच महत्त्व असतं. मुलांनाही नकळत अशीच शिकवण मिळते.
तिला एक माणूस म्हणून आदर, सन्मान कोणाकडूनही मिळत नाही. घरातील कोणत्याही निर्णयात तिला स्थान नसतं. अगदी हक्काची मोलकरीण एवढीच तिची जागा असते. आणि हे वर्षानुवर्ष चालत असतं. संधी मिळेल तिथे घरातील सर्व सदस्य तिचा अपमान करतात. अगदी मुलांच्या लेखी तिला काही किंमत नसते. आणि ती मात्र मनाने, भावनेने सगळ्यांमध्ये गुंतलेली असते. नवरा कुंकवाचा धनी, मालक..
मुलं वंशाचे दिवे असं म्हणून ती सगळं सहन करत राहते. बाहेर काही मनाविरुद्ध घडलं तरी सगळा राग तिच्यावर काढला जातो. आणि ती मात्र माझं कुटुंब, माझी प्रेमाची माणसं म्हणून हसतमुखाने सगळं सहन करते. अगदी पोतेरं झालेलं असतं तिचं.. तिची घुसमट झाली, कुचंबणा झाली, हे चूक आहे हे तिला कळत असलं तरीही ते बदलण्याची तिच्यात हिंमत नसते.
तिचा इमोशनल कचरा झालेला असतो. ती स्वतःचा विचार अजिबात न करता फक्त दुसऱ्यांचा विचार करत असते. ही उदाहरणे अगदी सर्रास आपल्या आजूबाजूला दिसतात. अशाच कारणांसाठी एक 65 वर्षाची स्त्री, “मला घटस्फोट मिळेल का?” असं विचारत होती. म्हणजे आयुष्यात इतक्या उशिरा तिला स्वत्वाची जाणीव झाली. काय उपयोग याचा??
एखादं नातं मग ते कोणतेही असो एकाची अगदी भरभरून गुंतवणूक असते, प्रेम असतं, काळजी असते, विश्वास असतो. पण दुसरा मात्र स्वतःचा फायदा असेल तरच ते नातं निभावतो. प्रेमाच्या नात्यांमध्ये दोन्ही कडून समान संवाद, देवाण-घेवाण हवी. फक्त एकाने जीवापाड ते नातं जपायचं णि दुसर्याने फक्त स्वतःच्या कंफर्ट झोन मध्ये ते नातं जिवंत ठेवायचं.
एकाने स्वतःच्या मनाला हवे तसे नात्याला नियम, अटी लावायच्या आणि दुसऱ्याने मात्र त्या निमूटपणे मान्य करायच्या. मान्य आहे ते नातं, ते प्रेमाचं माणूस तुम्हाला महत्त्वाचं आहे पण काय किंमत देऊन? तुमचा स्वाभिमान गहाण ठेवून?? त्यांच्या मनात आलं तुम्हाला जवळ केलं, त्यांच्या मनात आलं तुम्हाला दूर लोटलं.. आणि तुम्ही प्रेमाचं लेबल लावून हे चालवून घेता.. लक्षात ठेवा तुमचं मन तुम्हांला एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती चूक आहे हे सांगत असतं.
काहीतरी चुकतंय असा तुम्हांला आतून आवाज येत असतो. पण तुम्ही दुर्लक्ष करता. स्वतःच्या मनाचा कौल घेत नाही. असू दे, जाऊदे म्हणून सोडून देता. आणि सहन करत राहता. दुसऱ्याचा विचार करत राहता. अशावेळी स्वतःच्या मनाचा कौल जरूर घ्या. दुसऱ्यासाठी “इमोशनल फूल” होऊ नका. याचा ते गैरफायदा घेतात. स्पष्ट शब्दांत तुमच्या भावना, तुम्हांला न आवडणाऱ्या गोष्टी वेळीच सांगा. तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत हे त्यांना कळू दे.
स्वाभिमानाचा अभाव असणारी माणसं असं स्पष्ट बोलत नाहीत. मग अति विचार करणे, नकारात्मक विचार करणे, स्वतःला दोष देणे, मनस्ताप आणि मनातून इच्छा नसतानाही ते नातं ओढत राहतात. याने कोणताही टोकाचा मानसिक त्रास होऊ शकतो. स्वतःबद्दलची कमीपणाची भावना वाढीस लागते. हा इमोशनल कचराच आहे की! जो वेळीच काढून मन साफ करायला हवं. अशी नाती वेळीच थांबवायला हवीत.
स्वतःची इतरांशी तुलना करत क्षमतेपेक्षा जास्त स्वतःकडून अपेक्षा करणं आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यावर नैराश्यात जाणं हा ही इमोशनल फूल असण्याचाच प्रकार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची स्वतःला होणारी खरी ओळख. कोणाशीही तुलना न करता स्वतःची स्वतःशी कुवतीनुसार तुलना करून स्वतःमध्ये प्रगती घडवून आणणे म्हणजे “स्व”. एखाद्या नात्यात तुम्हांला सतत गृहित धरले जात असेल, तुमचा सन्मान होत नसेल, तुमच्या भावना, तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर असं नातं गंगेवर सोडून येणं म्हणजे “स्व ची जाणीव”.
कोणत्याही नात्यात “इमोशनल डस्टबिन” “कचरापेटी” बनू नका. म्हणजे माणसं त्यांना त्यांचं दुःख, त्यांच्या विवंचना सांगायच्या असतील, स्वतःचा इमोशनल कचरा काढून टाकायचा असेल तेव्हाच त्यांना तुमची आठवण येते. कारण तुम्ही ऐकून घेता. तुमच्या भावना समजून न घेता फक्त स्वतःच्या विवंचना सांगणाऱ्याला तुमची काळजी, तुमची कदर नसते. अशा नात्यातून शांतपणे बाहेर पडा. हा बदल सकारात्मकतेने स्वीकारा.
ज्या गोष्टी, परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्याची व्यर्थ चिंता करू नका. जो बदल तुम्ही करू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा. लोकांचे वागणे तुम्ही बदलू शकत नाही पण तुम्ही त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे तुम्ही निश्चित बदलू शकता. सातत्याने स्वतःमध्ये सकारात्मक बदल करा. आनंद मिळेल अशा छोट्या छोट्या गोष्टी करा. छोटे छोटे आनंद साजरे करा.
स्वतः मधली एखादी प्रगती लिहून काढा. स्वतः स्वतः ला शाबासकी द्या. “स्वसंवाद अत्यंत गरजेचा आहे.” आत्मपरीक्षण, आत्मचिंतन नक्की करा. स्वतःबद्दल आवडणाऱ्या गोष्टी लिहून काढा. शारीरिक व्यायाम, खेळ, नृत्य, एखादा छंद, एखादी आवड यात मन रमवा. याने आनंदही मिळतो आणि आत्मविश्वासही वाढतो. गरजूंना मदत करा, त्यानेही आनंद मिळतो. स्वतःचा स्वतःला असा खास वेळ द्या.
जाणीवपूर्वक सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा. “स्वतःचा आत्मसन्मान पायदळी तुडवून कोणतेही नातं निभावू नका.” माणसाला नाती, प्रेमाची माणसं हवीच असतात पण त्या बरोबर स्वाभिमान, आदर-सन्मान हेही तितकेच आवश्यक आहे. अशी मोजकी प्रेमाची प्रेमाची माणसे जोडा आणि आनंदाची, सुयोग्य भावनांची बाग फुलवा…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


