Skip to content

स्व-आनंद बाजूला ठेऊन जी कृती केली जाते, त्यालाच प्रेम असं म्हणतात.

स्व-आनंद बाजूला ठेऊन जी कृती केली जाते, त्यालाच प्रेम असं म्हणतात.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


“प्रेम”…म्हणजेच स्नेहभाव..! असं म्हणतात की प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे . या जगातील सर्वांगसुंदर गोष्टीचे अर्थातच प्रेमाचे विविध पैलू , विविध पदर आहेत.प्रेम हे काही केवळ एका बंधातच बांधल गेलेलं नाही. ते वेगवेगळ्या बंधात अगदी हळूवारपणे बांधल गेलय.
प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या ह्या भिन्न स्वरूपाच्या आहेत. आणि कित्येकांना तर प्रेम म्हणजे नक्की काय हेच कळत नाही. स्वार्थीपणाने केलेलं प्रेम कधीच प्रेम नसतं.प्रेम म्हणजे निखळ ,निःस्वार्थ भावना..!

कित्येकजण प्रेमात स्वतःच सुख कसं शोधता येईल , स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल हेच बघतात. तर कित्येकजण स्वतःचा आनंद , स्वतःच सुख इतरांच्या सुखात शोधतात.स्वतःचा आनंद बाजूला ठेवून एखादी गोष्ट करतात. कदाचित यालाच प्रेम म्हणत असावं…!

कारण हल्ली निःस्वार्थी प्रेमाचा समुद्र आटत चालला आहे. स्वार्थाच्या अगणित लाटा या समुद्रात निर्माण होताना दिसत आहेत.स्वतःच्या सगळ्याच गोष्टी “compromise” करायला हव्यात असं मी मुळीच सांगत नाही. माणूस जरी “multitalented” असला तरीही त्याला कधी कधी काही गोष्टी एका वेळी करणं शक्य होत नाही. ‘एकतर हे करेन नाहीतर ते करेन’ अशी त्याची भूमिका असते.अनेकदा त्या दोन गोष्टीमधील समतोल माणसाला/आपल्याला साधताच येत नाही.

पण इतकच की आपल्याला कधी कधी स्वतःचा आनंद बाजूला ठेऊनही इतरांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे. आयुष्यात आजवर कित्येकांना हे जमलय….? कदाचित फार थोडीथोडकी फुलं असतील असा प्रेमाचा सुगंध पसरवणारी…!

नाहीतर हल्ली कसं झालय तर…”माझा आनंद कशात आहे , ओह्हहहहो ….त्याने तर माझ्यासाठी हे केलं ते केलं…त्यांचच माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून माझंपण त्यांच्यावर….” असा हा विचार किती तार्किक असावा…?

आपण केवळ आपलं बघायच…दुसऱ्याचा थोडाफारही विचार नाही करायचा याला काय अर्थ आहे….? कारण आजही असे अनेकजण आहेत ज्यांना प्रेमाची खूप गरज आहे. त्यांनी कधी प्रेम अनुभवलच नाही. प्रेमाचा हात कधी त्यांच्या डोक्यावरून फिरलेलाच नाही.

अशांसाठीही कधीतरी जगून पहा.आपला आनंद काही क्षण बाजूला ठेवून एखादी गोष्ट त्या प्रेमाने आसुसलेल्या जीवांसाठी करून पहा. कदाचित प्रेम म्हणजे काय याची जाणीव तुम्हाला त्या क्षणी नक्की होईल. कारण प्रेमात असते ती माया-ममतेची हिरवीगार छाया नी काळजीचा दरवळणारा सुगंध नी जबाबदारीची एक सुखद जाणीव ..!

आपला आनंद कशात असतो तर…कुणाचा फिरण्यात , नाचण्यात , एखाद्याची मस्करी करण्यात ,खाण्यात-गाण्यात अगदी कशातही आनंद असू शकतो.कधी कधी तर आपण या आनंदाची कल्पनाही करू शकत नाही. पण मग अनेकदा अशी परिस्थिती येते की तिथे दुसऱ्याला (आपल्या जवळच्या व्यक्तीला) एखाद्या गोष्टीची गरज असते.

अशावेळी मात्र कितीजण तो स्वानंद सोडून इतरांसाठी एखादी कृती करतो….? अहो अशावेळी खरतरं जो समजूतदारपणा दाखवतो , ज्याला जाणीव असते इतरांची तोच असा स्वतःचा आनंद सोडून एखादी कृती करायला अगदी मनापासून तयार होतो.खरतर हेच खरं प्रेम असतं.नाहीतर “वर वर माया नी काय करू राया” असे करणारेही या आपल्या सभोवताली काही कमी नाहीत.

या वरवरच्या मायेला प्रेम तरी कसं म्हणावं….? वर वर दाखवलं म्हणजे प्रेम आहे असं नाही. आणि प्रेम ही दाखवण्याची गोष्ट मुळीच नाही. ती अंतरात असावी लागते. इतरांच्या सुखासाठी धडपडनं , त्यांच्या सुखात नाही पण दुःखात मात्र सोबत असणं , वेळप्रसंगी कठोर होऊन योग्य वाटेवर आणनं म्हणजे प्रेम असतं.कारण स्वतःचा आनंद सोडून एखाद्यासाठी काही करायच म्हणजे कित्येकांच्या अनेकदा अगदी जीवावर येतं.याला प्रेम नाही तर निव्वळ स्वार्थासाठी जोडलेल नातं असच म्हणता येईल.

म्हणूनच.., कधी कधी स्वतःचा आनंद सोडून इतरांसाठीही काहीतरी नक्कीच करायला शिका.तुमचं मन जर निःस्वार्थी असेल तर त्यातून निश्चितच तुम्हालाही दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याच समाधान वाटेल.त्यांच्या आनंदाने तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणूनच इतरांसाठी मनात थोडा मायेचा निखळ झरा वाहता ठेवा…वर वर दाखवण्यापेक्षा निःस्वार्थी मनाने /हेतूने त्यांच्यावर प्रेम करा….कधी स्वानंद सोडून इतरांसाठी सुखाची बाग फुलवूया…आयुष्य सुंदर आहे… त्याला थोडं प्रेमाने झुलवूया….!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!