Skip to content

स्वीकारणं आणि नाकारणं हे दोन्ही सोडून जे उरतं ते म्हणजे गुदमरणं!!

स्वीकारणं आणि नाकारणं हे दोन्ही सोडून जे उरतं ते म्हणजे गुदमरणं!!


सौ. मिनल वरपे


व्यक्ती तितक्या प्रकृती.. कोणीच कोणासारख नसते.. कोणाचं वागणं वेगळं तर कोणाचं बोलणं वेगळं.. राहणीमान वेगळं तर कोणाच्या सवयी वेगळ्या.. प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्त्व असते. आणि या सर्वांचा परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो. म्हणजेच बघाना ज्याचा जसा स्वभाव तसे त्याला प्रश्न, अडचणी येतात. जीवनात येणाऱ्या सुख दुःखांकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो.

आपल्याला येणाऱ्या सुखांचा उपभोग कसा घ्यायचा.. येणाऱ्या अडचणी दुःख कशा प्रकारे सोडवायच्या हे प्रत्येक जण जस आपल्या अनुभवानुसार ठरवतो अगदी तसच आपल्या जीवनात कसला स्वीकार करावा कोणती गोष्ट नाकारावी हे सुद्धा प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार सोयीनुसार आणि अनुभवानुसार ठरवतो. पण ज्यांना काय स्वीकारावं आणि कशास नकार द्यावा यामधे योग्य ठरवता येत नाही त्यांना त्यांच्या आयुष्यात मोकळं जगता येत नाही.. सगळं असून सुद्धा अडकल्यासारख त्यांना जाणवते.

मग अशावेळी काय केलं पाहिजे.. कोणते निर्णय घेण्याची गरज आहे.. हे कस ठरवावं?? यामधे अनेकांची गफलत होते..

एखाद्या नातेवाईकाने गरजेच्या वेळी मदत केली पण आज त्या व्यक्तीने अस काही मागीतल जे नाकरायच आहे पण त्याने केलेल्या मदतीची जाणीव म्हणून त्याला नकार देता येत नाही. मग अशावेळी मनाविरुद्ध काहीजण वागतात पण मनात मात्र सतत सल राहून जाते.

कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव म्हणा नाहीतर जॉब जाण्याची भीती म्हणा अशी एक वेळ येते की जिथे वरचे अधिकारी म्हणतील ते करावं लागते.. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकावी लागते तर काहीवेळेस त्यांचा होणारा त्रास सुद्धा निमूटपणे सहन करावा लागतो.

एखाद्या नात्याचा स्वीकार करताना सुद्धा काहीवेळेस इच्छा नसताना सुद्धा त्या व्यक्तीला वाईट वाटायला नको.. समोरची व्यक्ती आपल्या नकाराने दुखवायला नको.. त्या व्यक्तीला नकार दिला तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून कायमची दूर जायला नको या सगळ्या भावनेतून एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यात स्वीकार केला जातो.

या सगळ्यांचं मूळ कारण काय असेल… याचा आपण कधीतरी विचार करावा. मदत तर सगळेच एकमेकांना करतात पण त्या मदतीची जाणीव ठेवून नको असलेल्या गोष्टीचा स्वीकार आपल्यालाच का करावा लागतो.???

कामाच्या ठिकाणी आपल्यासोबत अनेक सहकारी असतात..आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे वागणे सगळ्यांशी सारखं नसेल पण आपल्यालाच का बळी व्हावं लागतेय.???

नात म्हटलं की आयुष्यभरासाठी एखाद्याचा स्वीकार असतो पण जी व्यक्ती आपल्या मनातच नाही.. आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही.. आपल्या कल्पनेत सुद्धा आपण त्या व्यक्तीला आपला जोडीदार म्हणून विचार केला नसेल पण तरीसुद्धा आपण त्या व्यक्तीला भावनेत अडकून स्वीकारतो. याच नक्की कारण काय आहे..??

तर कारण हे फक्त एकच ते म्हणजे स्पष्ट बोलण्याची सवय नसणे.. आपल्या वागण्यात आपल्याला आपलं म्हणणं स्पष्ट मांडता येत नसेल तर अशावेळी नक्कीच आपल्याला काय स्वीकारावं आणि कस नाकाराव यामधे गोंधळ उडतो आणि कोणत्याही दबावाखाली.. चुकीच्या भावनेत अडकून.. नकोत्या भितीमधे राहून आपण नकार द्यायला घाबरतो आणि नको ते स्वीकारतो.

जेव्हा आपण मनापासून काही स्वीकारलेले नसेल किंवा अगदी ठामपणे एखाद्या गोष्टीला नकार दिला नसेल तर या स्वीकार आणि नकारामध्ये अडकून आपण एक चुकीचं आयुष्य जगतो, ज्या आयुष्यात सगळं असून सुद्धा आपलं अस काही नसते…आपण जिवंत असतो पण जगत नसतो..

आपल्याला स्पष्ट वागण्याची भीती वाटत असते.. आपल्या स्पष्ट वागण्याने किंवा बोलण्याने कोणी दुखवयला नको.. दूर जायला नको.. आपल्या हातून महत्वाच्या गोष्टी निसटून जायला नको म्हणून.. पण या सगळ्या भीती बाजूला सारून आपल्याला काय हवं आहे याकडे लक्ष देऊन बघा…एकदा स्पष्ट वागून बघा नक्कीच आनंद मिळेल स्पष्ट वागण्याचा… मनाप्रमाणे आयुष्य जगता येईल… स्वीकार आणि नकार याच्यात अडकून आपला गुदमरलेला जीव मोकळा होईल…. फक्त स्पष्ट वागण्याचा प्रयत्न करा…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!